Story of Village : 'गोष्ट गावाची' सकाळ मुक्तपीठ मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख

'गोष्ट गावाची'

#आठवण 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️




||श्री. पद्मावती देवी||

ओझर्डे  





   

       गांव सुटले पण गावाच्या आठवणी सुटत नाहीत, त्या बिलगून असतात मनाच्या अस्तराला. थोडा निवांतपणा मिळाला की ते अस्तर हलते आणि आठवणी चमकू लागतात... असंच काहीसं झालंय माझं. 


       माझं बालपण सातारा जिल्ह्यातील, वाई तालुक्यातील ओझर्डे गावात गेलं. गांव तसं छोटंसं, त्या काळी पाच हजार लोकवस्तीचं असेल. तेथील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता. त्यामुळे सर्वांचा दिवस लवकर उगवायचा. सकाळी अकरा वाजले की गावात शुकशुकाट पसरत असे ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत. पाच नंतर मात्र पुन्हा लगभग सुरु व्हायची ते रात्री आठवाजे पर्यंत. रात्री आठ नंतर पुन्हा सगळीकडे सामसूम व्हायची. 


       त्याकाळी आजच्या सारखे T.V. नव्हते कोणाकडेही. गावात फक्त ग्रामपंचायती मध्ये दूरचित्रवाणी संच होता आणि तो सर्वांसाठी खुला असायचा. त्यावेळी त्यावर दूरदर्शन चे कार्यक्रम लागत असत; बातम्या, चित्रहार, छायागीत, शनिवार रविवारी संध्याकाळी सिनेमा असायचा. हे कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पटांगणात ही... तोबा गर्दी होत असे कारण गावातील लोकांना त्यावेळी हे एकच करमणूकीचं साधन होतं. 


       तसे गावातील पद्मावती मंदिरात गावच्या विकास कामांच्या मदतनिधीसाठी पडद्यावर अधून मधून सिनेमा दाखवला जात असे; तीन ते पाच रुपये तिकीटही असायचे. अधून मधून गावात नाटक देखील व्हायचे. या नाटकांमध्ये गावातील काही हौशी कलावंत देखील भाग घ्यायचे. मी चौथीत होते त्यावेळी 'गुड बाय डॉक्टर' हे नाटक पहिले होते, त्यात माझ्या काकांनी मुनीमजींची भूमिका केली होती. तेव्हापासून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक काकांना 'मुनीमजी' नावानेच हाक मारत असत.


       गावात गणपती उत्सवही मोठ्या हौसेने साजरा केला जायचा. गावात दोन मंडळे होती, एक 'माळी आळी' आणि दुसरे 'साळी आळी'. दोन्ही कडे छान छान देखावे (पौराणिक, हलते) असत. या दहा दिवसांत दोन्ही मंडळांकडून पडद्यावर फ्री सिनेमे दाखवले जायचे. रात्री नऊ नंतर रस्त्यावर पडदा बांधला जायचा आणि पडद्याच्या दोन्ही बाजूला बसून गावातील मुलं, महिला, कुटुंबातील इतर लोक सिनेमा पहायचे. मजा यायची दहा दिवस.


       श्रावणात शेवटच्या सोमवारी 'सोनेश्वर' (महादेवाचे मंदिर) येथे यात्रा भरत असे. या दिवशी शाळेला सुट्टी असायची. गावापासून दूर सुमारे पाच किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे. रंगपंचमीच्या दिवशी इथूनच सुप्रसिद्ध बावधनच्या बगाडाला प्रारंभ होतो. गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील लोक इथे मिठाईची तसेच खेळण्याची दुकाने लावत असत; भरपूर गर्दी व्हायची.


       गावातील पद्मावती देवी मंदिरात हरिनाम सप्ताह देखील होत असे. या सप्ताहात ज्ञानेश्वरीचे पारायण केले जायचे. गावातील बऱ्याच महिला, पुरुष, या परायणात ज्ञानेशवरीचे वाचन करत असत. रोज पहाटे काकड आरती होत असे, त्यानंतर ज्ञानेश्वरीचे वाचन सुरु व्हायचे, दुपारी 5 वाजता प्रवचन असायचे आणि संध्याकाळी 7 वाजता हरिपाठ असायचा सात दिवस. 


       या हरिपाठासाठी गावातील सर्व लहान मुले मुली हजर असायची. तसेच रोज रात्री वेगवेगळ्या बुआंचे कीर्तन व्हायचे. माझी आजी रोज कीर्तनाला जायची, कधी कधी मीही तिच्या बरोबर जायचे. काल्याचं कीर्तन तर तिचा जीव की प्राण असायचा. शेवटच्या दिवशी गोपाल काल्याचं कीर्तन व्हायचं अन सप्ताहाची सांगता व्हायची. संध्याकाळी देवीची पालखी निघायची, गावात सगळ्या घरांच्या दारासमोर सडा रांगोळी केली जायची आणि रात्री सर्वांना महाप्रसाद असायचा.


       रंगपंचमीला गावात सोंगांचा कर्यक्रम होत असे, गावातील हौशी पुरुष यात भाग घेत असत. बैलगाडी, ट्रॅकटर वर जिवंत देखावे उभे केले जायचे. पहाटे चार वाजल्या पासून मिरवणुकीला सुरुवात होत असे. यात गावातील तरुण, सुदंर मुलांना स्त्री पार्ट दिले जात असे. रात्रभर त्यांचा मेकप, गाड्याची सजावट, टेंभे, लायटिंगचे काम सुरु असे. इथे देखील दोन पार्ट्या बरका गणपतीप्रमाणे. गावातील मंदिरासमोर दोन्ही पार्ट्यांची भेट होत असे आणि सकाळी सात वाजता त्याची सांगता होत असे.


        रामनवमीला गावातील राममंदिरात 'राम जन्मोत्सव' आणि हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात 'हनुमान जन्मोत्सव' साजरा केला जात असे. हनुमान जयंती नंतर चार दिवसांनी चतुर्थी - पंचमीला गावदेवी 'पद्मावती' देवीची यात्रा भरते. चतुर्थीला ताजी यात्रा आणि पंचमीला शिळी यात्रा असते. पौर्णिमेपासून गावात देवीच्या सवाष्ण घातल्या जातात घरोघरी. ताज्या यात्रेला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि संध्याकाळी गावातून देवीची पालखी निघते. घरासमोर पालखी आली की घरोघरी स्त्रिया पालखीची पूजा, आरती करायच्या मग पालखी पुढे जात असे आणि दुसऱ्या दिवशी कुस्तीच्या फडाने यात्रेची सांगता होत असे.


        तर असा हा माझा छोटासा गांव ज्याच्या अंगाखांद्यावर मी खेळले, बागडले, लहानाची मोठी झाले त्या गावाविषयी वाटणारी कृतज्ञाता आज शब्दातून व्यक्त होत आहे.


• कसा वाटला ब्लॉग...

• आवडला का... 


• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 

• फॉलो करा. 


धन्यवाद ! 🙏 


©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर. (टपळे)

पुणे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या