"साधी, सोपी, खमंग तीळ-गुळाची पोळी"

 



#तीळ-गुळाची_पोळी


"साधी, सोपी, खमंग तीळ-गुळाची पोळी"


       नुकतेच नवीन वर्ष सुरु झाले. या नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे 'मकरसंक्राती'. यादिवशी सूर्य मकरराशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाला प्रारंभ होतो. या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात आणि मनातील कटू भावना दूर करून सर्वांशी गोड बोलण्याचा निश्चय करत असतात.


         दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला सूर्याचे मकर राशीत मार्गक्रमण होते. जानेवारी महिन्यात थंडीही खूप असते, या थंडीच्या दिवसात ओला रानमेवा भरपूर प्रमाणात शेतात पिकतो. ओला हरभरा, ओला वाटाणा, वालाच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, गाजर, वांगी, गव्हा-ज्वारीच्या ऑब्या, ऊस, बोरं इ. घरोघरी संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला या सर्व भाज्यांची एकत्र भाजी केली जाते व सोबतीला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीला कुणी पुरणपोळी बनवतात तर कुणी तिळगुळाची पोळी बनतात.


          या थंडीच्या दिवसात शरीराची पचनशक्ती वाढलेली असते म्हणून आरोग्य उत्तम राहते; त्यामुळे पचनाला जड असलेल्या भाज्यांचे देखील व्यवस्थित पचन होते. बाजरी, तीळ हे उष्ण आहेत त्यामुळे थंडीमध्ये शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी बाजरीच्या भाकरीचे तसेच तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. घरोघरी गुळ घालून बनवलेले तिळाचे लाडू, तिळाची वडी तसेच तिळगुळाची पोळी ही बनवली जाते.


          संक्रांतीला माझ्या सासरी आणि आई पुरणपोळी करीत असत, मात्र माझी काकू तीळ-गुळाची पोळी बनवायची. ती ही पोळी अतिशय सुंदर बनवीत असे, मला खूप आवडायची तिच्या हातची हि पोळी आणि आता माझ्या मुलीलाही आवडते. त्यामुळे दर संक्रांतीला मीही बनवते. पूर्वतयारी केलेली असली की अगदी झटपट होते आणि बनवायला देखील एकदम सोपी आहे.


           अशी ही तिळगुळाची खमंग पोळीची सोपी रेसिपी घेऊन आलेय खास तुमच्यासाठी.... नक्की करून पहा आणि केल्यावर मला जरूर सांगा. 😊





           

"साधी, सोपी, खमंग तीळ-गुळाची पोळी"



◆ साहित्य : 


● पारी साठी : 


मैदा आणि गव्हाचे पीठ समप्रमाणात घेणे, कणीक भिजवण्यासाठी आवश्यक दूध, मीठ, मोहणासाठी तेल ... 


● गव्हाचे पीठ 2 वाटी

● मैदा 2 वाटी

● दूध दीड कप

● मोहणासाठी तेल 2 चमचे 

● मीठ आवश्यकतेनुसार 

● हळद अर्धा चमचा



● सारण : 


तिळाचा कूट, शेंगदाण्याचा कूट, गुळ बारीक चिरून समप्रमाणात घेणे... 


● दाण्याचा कूट 1 वाटी

● तिळाचा कूट 1 वाटी

● गुळ 1 वाटी 



◆ कृती : 

  

1. प्रथम गव्हाचे पीठ आणि मैदा चाळणीने चाळून घ्यावे.


2. नंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ, हळद आणि तेलाचे मोहन घालून दुधामध्ये कणिक भिजवावी व फूडप्रोसेसर मध्ये चांगली एकजीव करून घ्यावी.


3. तिळाचा कूट, शेंगदाण्याचा कूट व गुळ एकत्र करून सारण करावे.


4. हे सारण प्रथम हाताने एकत्र करावे आणि त्यात तूप घालून नंतर ते फूडप्रोसेसर मध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यात एकजीव होईपर्यंत फिरवावे. आपले सारण तयार झाले.


5. आता कणकेचे लहान लहान गोळे करावेत आणि सारणाचेही गोळे करावेत.


6. प्रत्येक गोळ्यात पुरणपोळी प्रमाणे सारण भरून पोळी लाटावी आणि तूप सोडून तव्यावर दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यावी.


7. आपली खमंग खुसखुशीत तिळगुळाची पोळी तैयार ! तुपासोबत सर्व्ह करावी. 





 

◆ ही पोळी अतिशय सुंदर लागते. 

तुम्हीही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली तीळ गुळाची खमंग पोळी.

• कसा वाटला ब्लॉग...

• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 

• फॉलो करा. 


धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या