मी सौ. सुचिता मिलिंद वाडेकर एक गृहिणी असून मराठी मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच 'बाया कर्वे' स्त्री शिक्षण संस्थे मध्ये 'डिप्लोमा इन कौन्सेलिंग सायकॉलॉजि' हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. बोलण्यापेक्षा लिखाणातून मी माझ्या भावना नेमकेपणाने व्यक्त करू शकते याची जाणीव मला काही वर्षांपूर्वी सासूबाईंना लिहिलेल्या पत्रमुळे झाली.
खरं तर त्या नेहमी म्हणायच्या की तू खुप छान लिहितेस.. लिहीत जा. पण कधी ते मी मनावर घेतले नव्हते. मात्र सासूबाईंना लिहिलेल्या पत्रपासून सुरुवात झाली अन अनेक आठवणी मी लिखाणातून व्यक्त करू लागले. याशिवाय लेख, कथा, कविता या माध्यमातून मी माझ्या भावना व्यक्त करू लागले. यातूनच अनेक रेसिपी देखील जन्माला आल्या. काही रेसिपी सासूबाईंनी तर काही आजी, काकू, आईने शिकवल्या तर काही मी स्वतः माझ्या मुलीसाठी तयार केल्या आहेत.
या रेसिपीसोबत अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. आपण कितीही मोठे झालो तरी या आठवणी आपल्याला नेहमी सोबत करतात, अगदी बिलगून असतात मनाच्या अस्तराला. थोडा निवांतपणा मिळाला की ते अस्तर हलते आणि आठवणी चमकू लागतात... असंच काहीसं झालंय माझं.
या आठवणी जपून ठेवल्यात मी माझ्या या डायरीमध्ये.. ही डायरी हळूहळू ओपन होतेय तुमच्यासमोर. मला खात्री आहे की यातील प्रत्येक पान तुम्हाला आवडेल
0 टिप्पण्या