#Marathi_Kavita “चिमणीचं घरटं” एक जिद्दीची नाजूक गोष्ट

 


🕊️ “चिमणीचं घरटं” एक जिद्दीची नाजूक गोष्ट

✍🏻 सुचिता वाडेकर


कधी कधी निसर्ग अगदी साध्या प्रसंगातूनही जीवनाचं खोल तत्त्व सांगतो. एक लहानशी चिमणी, तिचं घरटं, आणि त्याचं मोडणं.. हे सगळं दिसायला क्षणभंगुर, पण त्यातून उमटणारा संदेश मात्र दीर्घकाळ मनात राहतो. ही कविता त्या क्षणाची साक्ष आहे.. जिथे दुःख आहे, पण त्यापेक्षाही मोठी आहे.. ‘उभं राहण्याची ताकद’.


कविता : “चिमणीचं घरटं”


वादळ आलं, घरटं मोडलं

ती सैरभैर झाली..

इकडून तिकडे तिकडून इकडे,

घिरट्या घालू लागली.


तिची अगतिकता, तिची तडफड,

काळजाला चिर्रर्र करत होती..

असं कधी घडू नये कोणाबबतीतही,

मनोमन प्रार्थना मी करत होती.


का कोणास ठाऊक, पण त्या चिमणीचा

आर्त स्वर, काळजाचा ठाव घेत होता..

मोडून पडलेल्या घरट्याकडे पाहून,

मन विचलित करत होता.


पण चिमणीनं सारं स्वीकारलं,

पुन्हा ती कामाला लागली..

काडी काडी जमा करून,

पुन्हा घरटं बांधू लागली.


कितीही आला वारा तरी,

मागे ती हटत नाही..

तिची जिद्द, तिची चिकाटी

हार तिला मान्य नाही.


मोडले जरी मन,

उभं राहणं ती शिकते..

काडी काडी जमा करून,

घरटं ती विनंते.


जीवन मोडलं तरी थांबत नाही

जणू शिकवण ती देते..

माणसाला त्याच्या दुःखावर,

मात करायला शिकवते.


चिमणी सारखं छोटं हृदय,

पण त्यात अपार धैर्य..!

माणसानेही शिकावे नेहमी,

तिच्यासारखे शौर्य..!


चिमणी सारखं मन असू दे

नेहमी नाजूक, पण उडण्यासाठी सज्ज..

माणसानेही राहावे नेहमी,

तिच्यासारखे दक्ष.


©सुचिता वाडेकर ✍🏻


🌿 विचारमूल्य :

चिमणीचं घरटं हे केवळ निसर्गचित्र नाही तर ते आहे.. 'आपल्या मनाचं प्रतीक.' 

वादळ येतात, घरटं मोडतं, पण जग थांबत नाही.

मन पुन्हा उभं राहतं, स्वप्नं पुन्हा विणली जातात.

आणि त्या प्रत्येक प्रयत्नात “जीवन मोडलं तरी थांबत नाही” ही जिद्द झळकते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या