Parenting : पालकत्व निभावताना... (भाग-१४) "समारोप" 13 भागांचे परावलोकन

 पालकत्व निभावताना... (भाग-१४)

©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️
३०.०४.२०२०

● समारोप -




मागील काही भागांपासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पहात आहोत. 

मागील भागात(भाग-१३) आपण 'वृद्धावस्थेतील समस्या' आणि 'वृद्धापकाळातील रिकाम्यावेळेचे नियोजन' पाहिले.. खालील लिंकवर ⤵️





या भागात आपण समारोप करण्यापूर्वी "परावलोकन" करणार आहोत. 

आतापर्यंत आपण 'पालकत्व निभावताना' या लेखाचे १३ भाग पाहिले. 
हे १३ भाग म्हणजे मानवाचा जन्मपूर्व आयुष्य ते मृत्यू पर्यंत चा प्रवास पाहिला. 
जन्म आणि मृत्यू मधील अंतर म्हणजे आयुष्य. 
हे आयुष्य कसे जगायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. 
हा प्रवास सुंदर करणं हे प्रत्येकाच्याच हातात असते.
ज्याला हे जमते तो आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकतो. 

या आयुष्यात काही गोष्टी अनुवंशिकतेमुळे मिळतात तर काही पूर्व कर्मानुसार मिळतात तर काही आपल्याला स्वतःला मिळवाव्या लागतात. बालकाला आयुष्य हे पूर्वकर्मा नुसार मिळाले असले तरी काही स्वाभाविक गुणधर्म अनुवंशिकतेमुळे मिळालेले असतात. मात्र बालकावर जास्तीतजास्त परिणाम हा ते बालक ज्या वातावरणात वाढते, त्याच्यावर जे संस्कार होतात, तसेच त्याचे मित्रमंडळी असतात यांचा होत असतो. 

हल्लीची बाळं मुळातच खूप हुशार आहेत... नजरेतून आणि आवाजाच्या चढउतारावरून त्यांना बरोबर समजतं. त्यामुळे आजचं पालकत्व हे बुद्धीचा कस लावणारे आहे. पालकत्वाचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नाही.

पालकत्वाचा हा प्रवास करताना आपण मानवी जीवनाच्या विकास अवस्था समजून घेतल्या तर हा प्रवास नक्कीच सुकर होईल. शालेय अभ्यासक्रमात आपण जन्मपूर्व अवस्थे बद्दल  माहिती शिकलेलो असतो, बऱ्याचशा गोष्टी माहितीही असतात पण त्याकडे कधी गांभीर्याने बघितलेले नसते.  

"पालकत्व निभावताना" या १३ भागांच्या मालिकेत आपण मानवी जीवनाच्या विकास अवस्थांची "जन्मपूर्व अवस्था ते मृत्यूपर्यंतचा प्रवास" याची माहिती पाहिली. 

प्रत्येक भागात एक अवस्था, तिची वैशिष्ट्ये, त्या अवस्थेचे धोके आणि त्यासाठी कसे सजग रहायला हवे हे पाहिले. आज या १३ भागांच्या मालिकेचा समारोप करताना मला अतिशय आनंद होत आहे. 

मागच्या वर्षी 'महर्षी कर्वे इन्स्टिटयूट' मध्ये "डिप्लोमा इन कॉन्सेलिंग सायकॉलॉजि" याचा अभ्यास करताना मानवी जीवनाच्या विकास अवस्थांची माहिती घेतली तेव्हा असे जाणवले की प्रत्येक अवस्थेत प्रवेश करणे म्हणजे एक अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत प्रवेश करणे सोपे नाही आणि कदाचित यामुळेच बरेचसे प्रश्न निर्माण होताना दिसतात. पण याबद्दल प्रत्येकाला या विकास अवस्थांची माहिती असेल तर हा प्रवास त्यांच्यासाठी निश्चित सुकर होऊ शकतो. निदान ती व्यक्ती त्याकडे डोळसपणे पाहू तरी शकेल आणि म्हणूनच यावर लिहिण्यास सुरुवात केली. 

आपलं बालपण, आपला भूतकाळ आपण बदलू शकत नाही पण मुलांचं बालपण, त्यांचा प्रत्येक स्टेज मधील प्रवास डोळसपणे पूर्ण करता यावा तसेच आपली सध्याची स्टेज जाणून इथून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक स्टेजकडे आपल्याला डोळसपणे कसे पाहता येईल हा विचार यामागे होता. 

प्रत्येकासाठी येणारी प्रत्येक स्टेज नवीन असते. काहींना ती लीलया पेलता येते किंवा सहज पेलता येते तर काहींची भांबेरी उडते. त्यात्या स्टेज नुसार अनेक प्रश्नही असतात मात्र त्याप्रश्नांना सामोरे जाण्यासाठी त्या स्टेजची वैशिष्टये, फायदे, तोटे माहित असतील की काही गोष्टी स्वीकारणे सोपे जाते आणि येणाऱ्या प्रश्नांवर मार्ग काढणे सोपे जाते. 

भाग-१ मध्ये आपण मानवी जीवनाच्या विकास अवस्था कोणकोणत्या आहेत याचा धावता आढावा घेतला. 

भाग-२ मध्ये आपण अर्भकाची जन्मपूर्व अवस्था पाहिली. जन्मपूर्व अवस्थेच्या अभ्यासावरून कळते की मुलगा किंवा मुलगी होण्यास त्याबाळाची आई जबाबदार नसूनअप्रत्यक्षरीत्या त्या बाळाचा बाबा जबाबदार असतो.. तसेच गर्भाची वाढ कशी होते, त्याच्या हालचाली, ९महिने ९दिवसांचा मातेच्या शरीरातील त्याचा प्रवास याची माहिती मिळते. 

भाग-३ मध्ये आपण अर्भकाची नवजातावस्था पाहिली. यात जन्मल्यानंतरच्या २ आठवड्यांच्या काळात बाळाला बाहेरील वातावरणाशी कसे जुळवून घ्यावे लागते हे पाहिले. 

भाग-४ मध्ये आपण "शैशवावस्था" पाहिली. ज्यात जन्मानंतर ३ आठवड्यांपासून ते २ वर्षा पर्यंतच्या या कालखंडात अर्भकाची वाढ, कौशल्ये, खेळाचे मूल्य व खेळाचे धोके ही  "शैशवावस्थेची" वैशिष्ट्ये पाहिली. 

भाग-५ मध्ये आपण "पूर्व बाल्यावस्था" पाहिली. बालकाचा २ वर्षेपासून ते ६ वर्षा पर्यंतचा बालपणीचा हा काळ आनंदाचा, सुखाचा काळ असतो. या भागात आपण बालकाचा शरीरिक विकास, कौशिल्ये, मेंदूची वाढ़, भावनिक विकास, सामाजिक विकास कसा होतो हे पाहिले.  

भाग-६ मध्ये आपण "पूर्व बाल्यावस्थेतील 'शारीरिक धोके' आणि 'मानसिक धोके' पाहिले. 

भाग-७ मध्ये आपण बालकाचा "उत्तर बाल्यावस्थेतील शारीरिक विकास, शरीर स्वास्थ्य, कौशल्ये, भाषिक विकास, स्व:विकास पाहिला. वयाच्या ६ वर्षेपासून ते १२ वर्षे पर्यंतचा वाढीचा जो काळ असतो त्याला "उत्तर बाल्यावस्था" म्हणतात. 

भाग-८ मध्ये आपण पौगांडावस्था(यौवनारंभ) पाहिली. १२ वर्षेपासून ते १५ वर्षे पर्यंतची हि पौगांडावस्था(यौवनारंभ) यात मुलांची शारीरिक वाढ, बदल पाहिले. 

भाग-९ मध्ये आपण किशोरावस्था (कुमारावस्था) पाहिली. ही अवस्था खूप महत्वाची मानली जाते. हे शारीरिक, मानसिक बदलाचे वय असते. बाल्यावस्थेतून प्रौढ अवस्थेमध्ये जाण्यासाठीची ही सुरुवात आहे. हे प्रॉब्लेमेटीक वय समजले जाते. या भागात आपण किशोरावस्थेची वैशिष्ट्ये आणि धोके पाहिले.  

भाग-१० मध्ये आपण "तारुण्यावस्था" म्हणजे पूर्व प्रौढाअवस्था, तिचा विकास, वैशिष्टये आणि धोके पाहिले. 

भाग-११ मध्ये आपण "प्रौढावस्था" (मध्यप्रौढावस्था), तिची वैशिष्टये, सृजनशीलता, समस्या आणि ताणतणाव पाहिले. साधारणतः वयाच्या चाळीशी नंतर वृद्धापकाळापर्यंतचा कालावधी(४० वर्षांपासून ते ६० वर्षापर्यंतच काळ) म्हणजे "मध्यप्रौढावस्था" होय. या अवस्थेत शरीरात हळूहळू होणारे बदल व्यक्तीला जाणवू लागतात. वर्धक्याच्या खुणा हळूहळू दिसू लागतात. म्हातारपण अद्याप दूर असले तरी त्याची अस्पष्ट चाहूल लागते. 

भाग-१२ मध्ये आपण "वृद्धावस्था" (उत्तरप्रौढावस्था), तिची लक्षणे, वैशिष्टये, शारीरिक बदल, मानसिक बदल, अभिरुचिमधील बदल आदी माहिती पाहिली. आयुष्याच्या उतरणीचा काळ म्हणजे "वृद्धावस्था"(उत्तरप्रौढावस्था) किंवा उतारवय. ६० वर्षानंतर मृत्यू पर्यंतचा काळ हा उतारवयाचा काळ होय.

भाग-१३ मध्ये आपण "वृद्धावस्थेतील समस्या" आणि "वृद्धापकाळातील रिकाम्यावेळेचे नियोजन" पाहिले. 


भाग-१४ समारोप 

अशाप्रकारे पालकत्व निभावताना आपल्याला जर या "मानवी जीवनाच्या विकास अवस्था" माहीत असतील तर जीवन-मृत्यू मधील अंतर म्हणजे हे "आयुष्य" जगताना जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी मिळते. 

तुम्हाला "पालकत्व निभावताना" हि १४ भागांची शृंखला कशी वाटली ते कंमेन्ट करून नक्की कळवा. मला जे ज्ञान मिळाले ते तुम्हाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या १४ भागांमधून केलाय, तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी पुढील लेखन प्रवासास प्रेरणा ठरतील. 

• कशी वाटली 14 भागांची मालिका...
• आवडली का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

• Suchita's Recipe या FB पेजला भेट द्या आणि आवडल्यास Like करा... फॉलो करा. 
धन्यवाद ! 🙏 


©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️
३०.०४.२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या