Parenting : पालकत्व निभावताना... (भाग-७) "उत्तर बाल्यावस्था"

 पालकत्व निभावताना... (भाग-७)

©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️
२०.०४.२०२०




मागील भागांपासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पहात आहोत.

मागील भागात(भाग-६) आपण "पूर्व बाल्यावस्थेतील धोके" पहिले.. खालील लिंकवर.. ⤵️




या भागात आपण "उत्तर बाल्यावस्था" पाहणार आहोत

५. उत्तर बाल्यावस्था - 
(कालावधी : ६ वर्षेपासून ते १२ वर्षे पर्यंत)

बालकाचा वयाच्या ६ वर्षेपासून ते १२ वर्षे पर्यंतचा वाढीचा जो काळ असतो त्याला "उत्तर बाल्यावस्था" म्हणतात.

• उत्तर बाल्यावस्थेतील शारीरिक विकास - 

वयाच्या ५ व्या वर्षांपर्यंत मुलांची जलद वाढ़ होते. ६ ते १२ वर्षे या काळात अतिशय संथपणे तरीही सातत्याने वाढ होत असते.

• उंची - या कालखंडात मुलां पेक्षा मुली अधिक उंच असतात. मुलींची पौगंडावस्था(१० ते ११ वर्षांपासून) व किशोर अवस्थाही मुलांपेक्षा १-२ वर्षांनी लवकर सुरु होते. 

• वजन - या काळात मुलांमुलींचे वजन दरवर्षी साधारण पणे २ ते ३ किलोनी वाढते. पूर्व बाल्यावस्थेतील बाळसे पूर्णपणे नाहीसे होते,  गोबरे गाल, गुबगुबीतपणा जाऊन मुले बारीक दिसू लागतात. मात्र ती अशक्त होत नाहीत, उलट त्यांचे स्नायू चांगले बळकट होऊ लागतात, त्यांची शक्ती वाढते.

असे असले तरी एकाच वयाच्या दोन मुली किंवा दोन मुले यांच्या उंचीत फरक असू शकतो. या काळात शारीरिक वाढ संथ होत असल्याने उंची व वजनात खूप प्रकर्षाने वाढ़ होत नाही. मात्र १०-११ वर्षांपासून मुलींच्या शारीरिक आकारमानात आकस्मिक वाढ़ होऊ लागते. त्या समवयस्क मुलांपेक्षा मोठया दिसू लागतात.

• आहाराचा वाढीवर होणारा चांगला वाईट परिणाम -

• पौष्टीक आहार- बालकाला मिळणाऱ्या पौष्टीक आहाराचा आणि त्याच्या आकारमानाचा निश्चित संबंध असतो. तसेच पौष्टीक आहाराचा संबंध सामाजिक आणि भावनिक वातावरणाशी देखील असतो. ज्या बालकांना पौष्टीक आहार मिळतो, ती समवयस्कांबरोबर अधिक मिसळतात, अधिक सकारात्मक भावना दर्शवतात. त्यांच्यात चिंताभाव कमी असतो. ज्या बालकांचे अतिपोषण होते तेही चांगले नाही, यामुळे बाल्यावस्थेत लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.

• बाल्यावस्थेतील लठ्ठपणा - काही बालकात अनुवंशीकतेमुळे लठ्ठपणा येण्याची शक्यता असते तर काही बालकात ब्रेड, बेकरी उत्पादनाचे सेवन, पास्ता,  पिझ्झा, नूडल्स, केक,  आईस्क्रीम, मद्य, मांसाहार  याच्या अति सेवनाने  देखील लठ्ठपणाचे प्रमाण वाढताना दिसतो. बहुतांश मुले भाज्या व फळे यांना हात लावत नाहीत व केवळ चमचमित, तळलेले तिखट व गोड पदार्थ यांचेच अधिक सेवन करतात... त्यामुळेही लठ्ठपणा वाढतो.

खरे तर हे वय मैदानी खेळ खेळण्याचे वय! परंतु बहुतांश बालके टीव्ही पाहान्यात गर्क असतात,  संगणक,  मोबाईल वरील गेम्स त्यांना अधिक आवडतात. सतत बिस्किटे, भेळ, चिवडा इ. चरणे, खाणे चालूच असते... यामुळे  बाल्यावस्थेतील लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. बाल्यावस्थेतील हा लठ्ठपणा आयुष्यभर टिकण्याची शक्यता असते.

• उत्तर बाल्यावस्थेतील प्रकृती स्वास्थ्य आणि अस्वास्थ्य - 

पूर्व बाल्यावस्थेच्या तुलनेत उत्तर बाल्यावस्थेत मुलांना फारसे आजार होत नाहीत. सर्दी, खोकला, ताप इ. नेहमीचे आजार झाले तरी त्याचे स्वरूप सौम्य असते. ५ वर्षांपर्यंत प्रतिबंधक लसिंचा उपाय केल्यामुळे बालकांची प्रकृती कणखर बनलेली असते.

या वयात बालके सायकल चालवणे, पोहणे शिकतात यावेळी काळजी घेतली नाही तर अपघाताची शक्यता असते. खेळताना, पाळताना डान्बरी रस्त्यावर पडल्यावर गुडघ्याना, कोपराना, कपाळावर, वेळप्रसंगी ओठावर लागू शकते.. बऱ्याचदा खोक पडल्यावर टाकेही घालावे लागतात.

• उत्तर बाल्यावस्थेतील कौशल्ये - बालक पुढील चार प्रकारची कौशल्ये कुशलतेने करू शकते.

१. क्रीडात्मक कौशल्ये - चेंडू फेकणे-झेलणे, दुचाकी सायकल चालवणे, पोहणे इ.

२. स्वावलंबनात्मक कौशल्ये - स्नान, स्वच्छता, पोशाख, केस इ.  मध्ये गती व सफाई येते.

३. शालेय कौशल्ये - लेखन, वाचन, संगणक वापर, नृत्य, गायन, चित्रकला, रंगकाम इ. कौशल्ये विकसित होतात.

४. सामाजिक कौशल्ये - मदत करणे, सहकार्य वृत्ती वाढते. उदा. अंथरून घालणे व काढणे, केर काढणे, पाय चेपून देणे, कुणाला जखम झाल्यास मलम पट्टी(banded) करणे इ. कामातून सामाजिक वृत्ती विकसित होते.

• इतर कौशल्ये - बालकाच्या वजन, उंची, स्नायू बरोबर इतर सर्व अवयवांचा विकास होतो. पेन आणि पेन्सिलने वळणदार अक्षर काढता येते. ८ व्या वर्षा पर्यंत पोळीचा तुकडा एका हाताने करता येतो. ११-१२ व्या वर्षांपर्यंत सर्व गोष्टी प्रौढासारख्या जमू लागतात.

• उत्तर बाल्यावस्थेतील भाषिक विकास - 

शालेय वयात शब्दभांडार जलद वाढत जाते. मुलांना संभाषणाचे नियम माहीत असले तरी कुठे वळायचे, कुठे बदलायचे याचे फारसे आकलन झालेले नसते. मात्र हळूहळू त्यांच्या संवादात सुसुत्रता दिसून येते. भाषेच्या विकासामुळे विचारात लवचिकता येते. वाचन केल्याने शब्दांचे आकलन होते तसेच अक्षर ओळखने, उच्चार नीट करणे सोपे जाते. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी सुरुवातीला मातृभाषेतून शिक्षण दिले तर बालकाचा स्वआदर वाढतो.

• स्व-विकास - उत्तर बाल्यावस्थेत मुलांचा स्वतःबाबतचा दृष्टीकोन बऱ्यापैकी बदलतो. त्यांना नवीन मित्र-मैत्रिणी मिळतात. या अवस्थेत मैत्रीचे महत्व वाढते. मैत्री मुळे मुलांना जगाबद्दल आणि स्वतःबद्दलही माहिती मिळते. मित्रांमुळे मुलांना भावनिक आधार मिळतो त्यामुळे त्यांना प्रभावीपणे ताणाला  सामोरे जाता येते.

मैत्रीमुळेच स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन आणि अर्थ लावायला मुले शिकतात. इतरांशी संवाद कसा साधायचा, इतरांशी कसे वागायचे हे मैत्रीच मुलांना शिकवते. मैत्री मुळे  मुलांच्या भावविश्वाच्या कक्षा रुंदावून बौद्धिक विकास वाढीस लागतो. या मैत्रीमध्ये वैयक्तिक विचार, वैयक्तिक भावना एकमेकांजवळ व्यक्त होऊन जवळीक निर्माण होते.

या काळात मुले आपापल्या सवंगडयासोबत गट तयार करतात. या गटात स्वतःला स्थान मिळावे म्हणून धडपडतात, वेळप्रसंगी यासाठी पालकांशी मनाविरुद्धही वागतात... म्हणूनच शास्त्रज्ञानच्या मते हे 'टोळीवय' असते. तसेच या काळात मुले बराच वेळ खेळ खेळण्यात व्यतित करतात म्हणून काही मनसशास्त्रज्ञ याला 'क्रीडा वय' असेही म्हणतात.

अशाप्रकारे या भागात आपण "उत्तर बाल्यावस्थेतील शारीरिक विकास, शरीर स्वास्थ्य, कौशल्ये, भाषिक विकास, स्व:विकास पाहिला.

• भेटूयात पुढील भागात..  

६. पौगांडावस्था - 
(कालावधी १२ वर्षेपासून ते १५ वर्षे पर्यंत)

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 


धन्यवाद ! 🙏 
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
२०.०४.२०२०  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या