My Mother in law : माझ्या सासूबाई


"माझ्या सासूबाई"

#आठवण 

©सौ. सुचिता वाडेकर... ✍️





       

5 जून हा माझ्या सासू-सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस. दोन वर्षांपूर्वी 5 जूनला त्यांच्या लग्नाला 58 वर्षे पूर्ण झाली आणि त्याचदिवशी संध्याकाळी सासूबाईंचे देहावसन झाले. आज त्या हयात असत्या तर यावर्षी त्यांच्या लग्नाला 60 वर्षे पूर्ण झाली असती, असो.


त्यांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस मात्र आम्ही तिघी सुनांनी आणि त्यांच्या मुलांनी त्यांना सरप्राईज पार्टी देऊन साजरा केला होता, त्यांच्या भाऊ भावजयांना बोलावले होते मात्र ही गोष्ट त्यांच्या पासून गुपित ठेवली होती. त्यावेळी सगळ्यांना हॉल मध्ये उपस्थित पाहून त्यांना खूप आनंद झाला होता.


माझ्या सासूबाई मूळच्या मुरुडच्या. चार भाऊ आणि त्या स्वतः अशी ती पाच भावंड त्यामुळे माहेरी त्या सगळ्यांच्या खूप लाडक्या होत्या. त्याकाळी त्या मॅट्रिक पास झाल्या होत्या. हुशार तर होत्याच पण आधुनिक विचारसरणीच्या होत्या, वाचनाची त्यांना आवड होती. अगदी निगुतीने संसार केला त्यांनी म्हणजे सर्वकाही पोटभर परंतु अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली.


माझे सासरे डिफेन्स R&DE (Research And Development Engineer) मध्ये इंजिनिअर होते. माझे लग्न झाले त्यावेळी ते ऑफिसर लेवलला रिटायर्ड झाले होते, पण एकदम साधा माणूस. त्यांच्या पोस्टचा कधी त्यांना गर्व नव्हता, नेहमी सर्वांना मदत करायचे.


माझ्या सासू-सासऱ्यांना तीन मुलं आणि एक मुलगी, सर्वांवर चांगले संस्कार करून स्वावलंबी बनवले, वेळप्रसंगी कठोरही बनले.  मुलांचे शिक्षण संपून जस जसे ते जॉब करू लागले तसे सासऱ्यांनी त्यांना सेकंडहॅन्ड टुव्हीलर घेऊन दिल्या (लोन घेऊ नये यासाठी) आणि गाडी चे पैसे फिटेपर्यंत दरमहा ठराविक रक्कम मुले वडिलांना देतात का याकडे सासूबाईंनी बारकाईने लक्ष दिले.


त्यांच्या या कृतीमुळे मुलांनाही स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून वस्तू घ्यायची आपोआप सवय लागली. स्वतः तीन मजली घर बांधले असले तरी मुलांनी स्वकमाईतून फ्लॅट्स आणि फोर व्हीलर घेतल्याचा त्यांना आनंदच झाला. 


Aathavn : गोड आठवणी



सासूबाई चेहऱ्यावरून, बोलण्यातून कडक वाटल्या तरी मनाने प्रेमळ आणि सरळ होत्या हे कळायला मला थोडा वेळ लागला. म्हणजे लग्नानंतर त्या एक टिपिकल सासू आणि मी एक टिपिकल सून असेच आमचे नाते होते. म्हणजे त्या भूमिकेतूनच आम्ही एकमेकींकडे बघत होतो त्यामुळे बऱ्याचदा आमचे खटकेही उडायचे. दोघीही शेरास सव्वाशेर अगदी सारख्याला वारख्या होतो.


सून घरात आली की सासूला असुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे आणि नवीन घरी जाऊन नव्या, अनोळखी लोकांना आपलं मानून तिथं रहायचं हे सुनेसाठी देखील अवघड असते त्यामुळे मलादेखील सुरुवातीला जड गेले. त्यामुळे मला घरातील सर्वांना समजून घ्यायला थोडा वेळ लागला.



Aathvan : गुलाबजाम एक गोड आठवण



या काळात खरी मदत मला माझ्या सासऱ्यांनी आणि मोठ्या दिरांनी केली. हे दोघे घरातील वातावरण हलकं फुलक करण्याचा प्रयत्न करत असत त्यामुळे घरातील वातावरण कितीही खटके उडाले तरी गँभीर कधी झाले नाही. प्रत्येकाला स्वतःची अशी एक स्पेस हवी असते, ती स्पेस त्यांनी सर्वांना दिली.


स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ दिले, कधी कोणत्या निर्णयाला विरोध केला नाही किंवा हस्तक्षेप केला नाही. तुमचा संसार आहे तुमचा निर्णय तुम्ही घ्या असेच त्यांचे कायम मत होते.


लग्नानंतर मी जॉब करावा हा सासूबाईंचाच हट्ट. तशा त्या आधुनिक विचारसरणीच्या होत्या. लग्नानंतर त्यांना मी ड्रेस घालू का असे विचारले तेव्हा साडी पेक्षा ड्रेस मध्ये बाईचे सगळे अंग झाकले जाते असे म्हणत त्यांनी अगदी आनंदाने परवानगी दिली होती.


घरातील सर्व (स्वयंपाक) आवरून मी जॉबला जायचे आणि आल्यावरही सर्व करायचे त्यामुळे त्यांनी मला काही बोलावे अशी संधीच कधी मी त्यांना मिळू दिली नाही. मात्र काही दिवसांनी त्या रोज एकच तक्रार करु लागल्या,  "आल्यावर सांगत नाही, मी आले म्हणून". मी मात्र गप्पच कारण यावर काय आणि कसं बोलावं हे मला कळत नव्हतं. 


यावर माझ्या मोठ्या दिरांनी सोल्युशन काढलं, ते म्हणाले, "सुचिता, उद्यापासून तू घरी आलीस की दारातूनच आवाज दे, आई sss, मी आले sss !" आणि आम्ही सगळे प्रचंड हसलो. त्यानंतर मात्र त्या कधीही काही बोलल्या नाहीत.


स्वछता आणि टापटीपीची त्यांना अतिशय आवड आणि ती माझ्यातही होती त्यामुळे याबाबत आमचे कधी वाद झाले नाहीत. माझा एक कानमंत्र होता की ज्या गोष्टींसाठी त्या आपल्याला बोलू शकतात अशी गोष्ट करायचीच नाही आणि त्यांना बोलण्याची संधीच मिळू द्यायची नाही आणि घडलेही तसेच.


स्वतः च्या कमाईतून जेव्हा एखादी गोष्ट आपण  आपल्या जवळच्या व्यक्ती साठी घेतो तो क्षण आपल्यासाठी आणि त्या व्यक्तिसाठीदेखील खूप आनंदाचा असतो, असाच एक प्रसंग लग्नानंतर माझ्या आयुष्यातही घडला.


सासूबाईंच्या आग्रहामुळे लग्नानंतर मी जॉब करू लागले, त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचा वाढदिवस होता तेव्हा मी माझ्या मैत्रिणीसोबत जाऊन सासुबाईंसाठी साडी आणली आणि त्याच्या वाढदिवसादीवशी त्यांना भेट दिली तो क्षण माझ्या साठी सर्वात आनंदाचा होता. 


त्यानंतर काही महिन्यांनी जेष्ठ अधिक आला. जेष्ठ अधिक आला की मुलीने आईची ओटी भरायची असते असे माझ्या सासूबाईंनी मला सांगितले आणि माझ्या आईला बोलवण्यास सांगितले. माझी काकू देखील माझ्या साठी आई इतकीच महत्वाची होती त्यामुळे आई आणि काकू दोघींना बोलावले.


माझ्या स्वकमाईतून मी दोघींसाठी साड्या आणल्या आणि जेष्ठ अधिक महिन्यात दोघींना दिल्या.  हे तिन्ही क्षण मला खूप आनंद देऊन गेले.


याकाळात सासर्यांनीही खूप मदत केली, ते मला भाजी निवडू लागायचे, गवार, मेथी ते स्वतः निवडून द्यायचे, माझ्याशी गप्पा मारायचे त्यामुळे खूप हायसं वाटायचं. भाजी उरली असेल तर दुसऱ्या दिवशी घरातील स्त्रीने ती एकटीने न खाता सर्वांच्या ताटाला थोडी थोडी वाढून संपवून टाकायची हा त्याचाच नियम त्यामुळे मला फारसे जड गेले नाही.


माझा प्रॉब्लेम एकच होता तो म्हणजे घरातील संपलेली वस्तू लिहून ठेवणे किंवा किराणा सामानाची यादी करणे मला लक्षातच यायचे नाही कारण माझ्या माहेरी माझ्या वडिलांचे वडिलोपार्जित किराणा मालाचे दुकान होते त्यामुळे वस्तू संपली की दुकानातून घेऊन येत असू मात्र त्याला मोजमाप नव्हते. हे सगळं अंगवळणी पडायला थोडा वेळ जावा लागला.


या काळात सासुबाईंकडून मी खूप काही शिकले. मुख्य म्हणजे उद्याची पूर्वतयारी आदल्यादिवशी करून ठेवणे यामुळे जॉब करत असताना माझी धांदल उडाली नाही.


लग्नानंतर एम. ए. च्या exam साठी महिनाभर मी माहेरी राहिले होते, त्याकाळात मी त्यांना पत्र लिहिले होते. यानंतर त्या नेहमी म्हणायच्या की तू लिही आणि तुझे लेख सकाळ मध्ये पाठव पण त्याकडे मी कधी फारसे लक्ष दिले नाही. मध्यन्तरी काही महिन्यांपूर्वी 'सकाळ मुक्तपीठ' मध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला, खूप आनंद झाला आणि सासूबाईंच्या या शब्दांची आठवण झाली. त्या असत्या तर सकाळ मधील माझा लेख पाहून त्यांना नक्कीच आनंद झाला असता.


Story of Village : 'गोष्ट गावाची' सकाळ मुक्तपीठ मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख


आमच्या लग्नानंतर जवळ जवळ पाच वर्षांनी मुलांनी स्वतःची, स्वतःच्या बायका-मुलांची जबाबदारी स्वतः घ्यावी या उद्देशाने आम्हा सगळ्यांना वेगळे राहण्यास सांगितले आणि आम्ही सर्वांकडे राहू असे सांगितले आणि तसे केलेदेखील. आज आम्ही सर्व कुटुंबीय दूर असलो तरी गणपती, दसरा, दिवाळी हे सण तसेच प्रत्येकाच्या मुलांचे वाढदिवस, सर्वांच्या ऍनिव्हर्सरीज एकत्र साजऱ्या करतो. दूर असलो तरी हाकेच्या अंतरावर आहोत असेच भासते.


सासुबाईचा खरा स्वभाव कळायला मात्र मला आई व्हावं लागलं, म्हणजे मी आई झाले तेव्हा त्यांच्या भावना खऱ्या अर्थाने समजू शकले. माझी लेक आमच्या आयुष्यात येण्याआधी एक प्रश्न मला पडला होता. आई म्हणजे नक्की काय? आईच्या आपल्या मुलांविषयी नेमक्या काय भावना असतात? मलाही होता येईल आई? मी जरा सांशकच होते. परंतु आर्या आमच्या आयुष्यात आली आणि कित्येक गोष्टी हळू-हळू उलगडत गेल्या, नव्याने समजल्या आणि खर्या अर्थाने समजली ती 'आई'!


अजारी पडल्यावर रात्र-रात्र जागणारी ती 'आई'... स्वतःच्या तोंडचा घासही काढून स्वतःच्या मुलांना देणारी ती 'आई'... दिवस-रात्र कष्ट घेणारी ती 'आई'... जिच्या मनात सदैव स्वतःच्या मुलांचाच विचार असणारी ती 'आई' ... अशा कितीतरी गोष्टी जाणवल्या. आई म्हणजे 'ममता'.. आई म्हणजे 'प्रेम'... आई म्हणजे 'वात्सल्य'... आई म्हणजे 'विश्व'...  आई म्हणजे 'सागर'. हे सगळं वाचलं होतं आणि वाचण्यापुरतंच मर्यादीत होतं.


वास्तवात याचा कधी विचारही केला नव्हता किंबहुना त्यादृष्टीने पाहण्याचा प्रयत्नही केला नव्हता. परंतु आर्या आल्यानंतर या सगळ्या गोष्टी जाणवल्या आणि खर्या अर्थाने समजली ती म्हणजे 'आई'. मग ती जन्म देणारी असो किंवा तिच्या इतकीच महत्वाची माझी दुसरी आई म्हणजे माझी काकू असो जीने मला अकरावी-बारावी हे दोन वर्षे तिच्या प्रतिकूल परिस्थितीतही सांभाळलं किंवा  लग्नानंतर ज्यांना मी आई मानते त्या माझ्या सासूबाई असो.


Family is most important in our life : बंध नात्यांचे....


यादिवसात मी माझी नव्हतेच मुळी, माझं सर्व विश्व तिने व्यापलं होतं. पण खरं सांगू, याच काळात खर्या अर्थाने समृध्द झाले मी. आई म्हणजे नक्की काय? कशी असते आई? आईच्या मनात नेमक्या काय भावना असतात आपल्या पिलाविषयी? या माझ्या मनातील प्रश्नांना पूर्णविराम मिळाला होता. 'आईची' खर्या अर्थाने ओळख झाली मला आणि नव्याने उमगल्या त्या म्हणजे माझ्या 'सासूबाई', ते याच काळात.


सासू-सूनांमधला वाद, मौन, अढी कुठल्याकुठे पळून गेली. आपण आज जे आपल्या पिलासाठी करतोय ते 'सर्व', काही वर्षांपूर्वी आपल्या आईने 'आपल्यासाठी' आणि सासूबाईंनी आपल्या 'नवर्यासाठी' केलंय याची जाणीव झाली. माझ्यातली 'आई' ... माझ्या आईतली 'आई' ... आणि माझ्या सासूबाईंमधली 'आई' ही वेगळी नसून एकच आहे हे कळले आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला माझा.


माझ्याही नकळत मी त्यांना समजून घ्यायला लागले. का कोण जाणे पण माझ्यात झालेला हा बदल मला सतत अस्वस्थ करायचा. मनात असंख्यं विचार यायचे; शेवटी त्या विचारांना आणि भावनांना पत्र रूपाने वाट मोकळी करून दिली. माझ्या पत्राने त्यांना खूप मानसीक समाधान मिळाले, जो त्यांना भेटायला येईल त्याच्याकडून ते पत्र त्या वाचून घ्यायच्या.


शेवट पर्यंत ते पत्र त्यांच्या उशाशी होते. त्यांच्या शेवटच्या काळात त्या मला म्हणाल्या देखील की तुझ्याशी बोललं की मन कसं मोकळं झाल्यासारखं वाटतं, तू कशी सगळं ऐकून घेतेस आणि समजावून सांगतेस, त्यामुळे तू सांगितलेलं सगळं पटत, त्यांचे हे बोल त्यावेळी मनाला एक वेगळीच उभारी देऊन गेले.


● 'जेष्ठ प्रतिपदा' तिथीनुसार सासूबाईंचे दुसरे वर्षश्राद्ध यानिमित्त सासूबाईंना समर्पित ...


• कसा वाटला ब्लॉग...

• आवडला का... 


• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 

• फॉलो करा. 


धन्यवाद ! 🙏 


©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर...✍️

13 जून 2018



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या