Aathvan : गुलाबजाम एक गोड आठवण


#गुलाबजाम .... !

#आठवण

22.04.2018

©सौ. सुचिता वाडेकर...✍️




       काल माझ्या लेकीचा वाढदिवस म्हणून गुलाबजाम बनवले. तिला खूप आवडतात गुलाबजाम.... माझी लेक नऊ वर्षांची झाली... ही नऊ वर्ष किती भूर्कन गेली कळलेदेखील नाही.

        आर्या आमच्या आयुष्यात येण्याआधी एक प्रश्न मला पडला होता... आई म्हणजे नक्की काय?... आईच्या आपल्या मुलांविषयी नेमक्या काय भावना असतात?.... मलाही होता येईल आई?.... मी जरा सांशकच होते. परंतु आर्या आमच्या आयुष्यात आली आणि कित्येक गोष्टी हळू-हळू उलगडत गेल्या.... नव्याने समजल्या आणि खर्या अर्थाने समजली ती 'आई'!

       अजारी पडल्यावर रात्र-रात्र जागणारी ती 'आई'.... स्वतःच्या तोंडचा घासही काढून स्वतःच्या मुलांना देणारी ती 'आई'... दिवस-रात्र कष्ट घेणारी ती 'आई'.... जिच्या मनात सदैव स्वतःच्या मुलांचाच विचार असणारी ती 'आई'..... अशा कितीतरी गोष्टी जाणवल्या.

       आई म्हणजे 'ममता'..... आई म्हणजे 'प्रेम'.... आई म्हणजे 'वात्सल्य'..... आई म्हणजे 'विश्व'.... आई म्हणजे 'सागर'.... हे सगळं वाचलं होतं आणि वाचण्यापुरतंच मर्यादीत होतं. वास्तवात याचा कधी विचारही केला नव्हता किंबहुना त्यादृष्टीने पाहण्याचा प्रयत्नही केला नव्हता. परंतु आर्या आल्यानंतर या सगळ्या गोष्टी जाणवल्या आणि खर्या अर्थाने समजली ती म्हणजे 'आई'.... मग ती जन्म देणारी असो.... किंवा तिच्या इतकीच महत्वाची माझी दुसरी आई म्हणजे माझी काकू असो.... किंवा लग्नानंतर ज्यांना मी आई मानते त्या माझ्या सासूबाई असो.



        आज मागे वळून पाहताना वाटतं की इवलसं माझं पिलू किती पटकन मोठं झालं....  आत्ता तर एवढसं होतं. तिचं पहिल्यांदा हसणं... पहिल्यांदा पालतं होणं... रांगणं.... तिचं पहिल्यांदा बोलणं... तिनं 'आई' म्हणून मारलेली पहिली हाक ज्यासाठी कान अगदी आतू...र झाले होते.... तिनं टाकलेलं पहिलं पाऊल.... तिचा आलेला पहिला दात.... तिचं पहिल्यांदा शाळेत जाणं..... ती अजारी असताना रात्र - रात्र तिच्या उशाशी बसून जागणं..... थोड्या थोड्या वेळाने ताप कमी झालाय का ते थर्मामीटरने चेक करणं.... गार पाण्याने अंग पुसून घेणं.... कधी ती न जेवता झोपली तर जीवाची होणारी उलघाल...  झोपेतून उठुन 'आई'..... अशी मारलेली हाक ऐकून नकळत तिच्याकडे वळणारी माझी पावले .... हे सगळं.... सगळं  डोळ्यासमोरून गेलं.

       यादिवसात मी माझी नव्हतेच मुळी.... माझं सर्व विश्व तिने व्यापलं होतं. पण खरं सांगू या काळात खर्या अर्थाने समृध्द झाले मी. आई म्हणजे नक्की काय ?... कशी असते आई ?.... आईच्या मनात नेमक्या काय भावना असतात आपल्या पिलाविषयी?.... या माझ्या मनातील प्रश्नांना पूर्णविराम मिळाला होता. 'आईची' खर्या अर्थाने ओळख झाली मला अन नव्याने उमगल्या त्या म्हणजे माझ्या 'सासूबाई', ते याच काळात.

       सासू-सूनांमधला वाद... मौन... अढी कुठल्याकुठे पळून गेली. आपण जे आपल्या पिलासाठी करतोय ते 'सर्व', काही वर्षांपूर्वी आपल्या आईने 'आपल्यासाठी'... आणि सासूबाईंनी आपल्या 'नवर्यासाठी' केलंय याची जाणीव झाली. माझ्यातली 'आई'... माझ्या आईतली 'आई'..... आणि माझ्या सासूबाईंमधली 'आई' ही वेगळी नसून एकच आहे हे कळले आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला माझा. 

       माझ्याही नकळत मी त्यांना समजून घ्यायला लागले.... का कोण जाणे पण माझ्यात झालेला हा बदल मला सतत अस्वस्थ करायचा... मनात असंख्यं विचार यायचे.... शेवटी त्या विचारांना आणि भावनांना पत्र रूपाने वाट मोकळी करून दिली आणि त्या भावना चार वर्षापूर्वी 'मदर्स डे' ला माझ्या तिनही आईंपर्यंत ते पोहोचवल्या.... दुर्दैवाने आज माझ्या सासूबाई हयात नाहीत मात्र आनंद एका गोष्टीचा वाटतो की त्या हयात असताना माझ्या मनातील या भावना मी त्यांच्या पर्यंत पोहोचवू शकले याचे. 

        माझी तिसरी आई म्हणजे 'माझी काकू', जीने ११ वी - १२ वी दोन वर्ष तिच्या प्रतिकूल परीस्थितीतही मला सांभाळलं... माझ्या जडणघडणीत तिचाही मोलाचा वाटा आहे....


"जीने आई म्हणून मला समरुध्द केलं ती 'माझी मुलगी' आणि 'माझ्या तीन आई' (आई, सासुबाई आणि काकू)" यांना समर्पित.




सोबत 'गुलाबजाम रेसिपी' ⤵️

साहित्य :

• चितळे गुलाबजाम मिक्स 200g
• दूध 1 कप
• तूप 2 चमचे
• साखर 5 कप
• पाणी 5 कप 
• केशर पाकात घालण्यासाठी
• तेल तळण्यासाठी

कृती :

1. प्रथम गुलाबजाम साठी पाक करून घ्यावा. एका मोठ्या पातेल्यात 5 कप साखर आणि तितकेच पाणी घालून उकळी आणावी.

2. साखर विरघळे पर्यंत मिश्रण सतत चमच्याने हालवत रहावे. उकळी आल्यावर गॅस बारीक करावा व पाच मिनिटांनी बंद करावा.

3. तयार झालेल्या पाकात केशर घालावे.

4. यानंतर चितळे गुलाबजाम मिक्स एका भांड्यात घेऊन दूध घालून मळून घ्यावेत.

5. आवश्यकता वाटल्यास एक चमचा तूप घालून चांगले मळून घ्यावे व याचे छोटे छोटे गोल गोळे बनवावेत.

6. तयार झालेले गोळे तेलात तळून घ्यावेत व तयार पाकात सोडावेत.




7. आपले गुलाबजाम तैयार झाले.




• दुसऱ्या दिवशी सर्व्ह करावेत.

कसा वाटला ब्लॉग...

• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
22.04.2018 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या