Family is most important in our life : बंध नात्यांचे....

#बंध_नात्यांचे

#आठवण 
22.09.2018

©सौ. सुचिता वाडेकर... ✍️






       लग्नानंतर किती गुंतून जातो ना आपण आपल्या संसारात. नवे आयुष्य, नवी नाती  सगळं कसं अगदी अंगवळणी पडून जातं. दिवस भराभर निघून जातात पण बालपणातील ते दिवस, त्या आठवणी, ती नाती मात्र मनातील बंद कप्यात कुठेतरी वाट पहात असतात, या आशेवर की कधीतरी हि, हा कप्पा उघडेल आणि आमच्याशी बोलेल पण आपण मात्र आपल्या आयुष्यात मश्गुल असतो. 

या बंद कप्यातील एखादी व्यक्ती जेव्हा हरवते तेव्हा मात्र हा कप्पा आपोआप उघडतो आणि सारा जीवनपट डोळ्यासमोरून जातो. आज माझेही अगदी असेच झाले आहे.

        माझी काकू कै. कांचन मुरलीधर टपळे (जीला आम्ही भावंड आईच म्हणायचो) जाऊन काल बारा दिवस पूर्ण झाले. माझी काकू घरातील सर्वात मोठी सून. मोठी धीराची, सर्वांचं आवडीनं करणारी, सासर-माहेरचे बंध सांभाळणारी, सर्वाना जीव लावणारी आणि प्रेमानं बांधून ठेवणारी. प्रेम कसं करावं हे तिच्याकडून शिकावं.

       आम्हा मुलांवर देखील तिने अगदी निस्वार्थ प्रेम केले. आई इतकीच ती आम्हा भावंडांच्या जवळची होती. मोठी म्हणून अधिकार वाणीने बोलायची आणि पुढे होऊन सर्व जबाबदाऱ्याही पार पाडायची. काकांच्या नोकरी निमित्ताने बाहेरगावी असली तरी अगदी मोठया भावाचे लग्न होईपर्यंत प्रत्येक सणाला ती घरी यायची. घरातील प्रत्येक सण, सर्वांची लग्नकार्य अगदी सर्व कार्यक्रम तिच्यामुळे यशस्वी पार पडले. 'बायसाब' आल्या की माझी आई निवांत व्हायची. माझ्या काकूला माझी आई 'बायसाब' म्हणायची. दोघींना कधी भांडलेले मी पाहिले नाही.

       अकरावी, बारावी दोन वर्षे साताऱ्याला  तिच्या प्रतिकूल परिस्थितीतही तिने मला सांभाळले. या दोन वर्षात मी तिच्याकडून खूप काही शिकले. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा, काटकसर हे मी माझ्याही नकळत तिच्याकडून शिकले. चांगल्या गोष्टींचे कौतुकही ती अगदी मनापासून आणि तोंडभरून करे. खऱ्यार्थाने स्वयंपाक मी तिच्याकडूनच शिकले. ती भाकरी करत असताना त्यावर उमटलेली हाताची बोटे, तिची दोन्ही हाताने भाकरी उलटण्याची पद्धत अगदी सर्व मी आवडीनं बघत असायचे, त्यावेळी हे मनात कुठेतरी कोरले जात होते आणि काही वर्षांपूर्वी मी देखील तिच्यासारखीच हाताने भाकरी उलटतेय हे माझ्या लक्षात आले.

       पोहे, उपिट तर तिचा हातखंडाच होता, इडली-सांबर, आप्पे, ढोकळा, साबुदाणा वडे हे देखील ती अतिशय सुंदर बनवायची. खास यासाठी माझ्या काकांनी ग्राइंडर घेतला होता.  जेवणात मसाले वांगे, पाटवडी-रस्सा, भरले कारले, सुधारस, श्रीखंड, चनुऱ्या पावट्याची आमटी, मटण, माशाचा रस्सा ती अतिशय सुंदर बनवायची. आम्ही मुली माहेरी गेल्यावर तर तिला कोण आनंद व्हायचा, जेवण तर आमच्या आवडीचंच असायचं पण ते तितक्याच प्रेमानेही बनवलेलं असायचं. सुनांचादेखील लाड तिने केला पण सासू म्हणून एक दराराही होता.

        फावल्यावेळात ती शिवण, भरतकाम, विणकाम करायची. स्वतःच्या हाताने सर्वांसाठी तिने स्वेटर विणले. यातही तिची व्हरायटी असायची. अगदी सासरचे, माहेरचे सर्व नातेवाईकांच्या मुलांसाठी तीने स्वेटर विनले. तिच्या आजारपणातही नऊ वर्षांपूर्वी माझ्या मुलीसाठीही तिने स्वेटर, टोपी, पायमोजे विणले होते. अजूनही तो सेट मी जपून ठेवलाय.



       ती मनाने खूप खंबीर होती. माझे काका गेले त्यावेळी ती चाळीस वर्षांचीच असेल, माझा मोठा भाऊ BE च्या शेवटच्या वर्षाला, लहान भाऊ आर्किटेक्चरच्या दुसऱ्या वर्षाला आणि बहीण डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला होती. आकाशच कोसळलं होतं तिच्यावर पण ती डगमगली नाही. ती धिरता, ते बळ तिच्यात कुठून आलं माहीत नाही पण त्यानंतर ते कायम तिच्यात दिसलं. कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्याला धैर्याने तोंड कसं द्यायचं हे तिच्याकडून शिकावं.

       दिवसामागून दिवस जात होते, काळ बदलला, परिस्थिती बदलली, दुःखाचे दिवस जाऊन सुखाचे दिवस आले, मुलांची लग्न झाली, घरात नातवंडांची किलकारी घुमू लागली आणि एक दिवस या आनंदाला गालबोट लागले. काकुला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले. सर्वजण खूप काळजीत पडले पण अत्याधुनिक उपचारामुळे त्यातूनही ती बाहेर पडली. पंधरा वर्षांपूर्वी कॉलनीतील तिच्या मैत्रिणी, माझी आई अशा दहा-बाराजणी गुरुनाथ ट्रॅव्हल्सबरोबर काशी, प्रयाग, गया हि उत्तरभारताची पंधरा दिवसांची ट्रिप करून आल्या. पहिल्यांदाच एकट्या एवढ्या लांब बाहेर जाऊन आल्या होत्या, तेही पुढची ट्रिप कुठे करायची हे ठरवूनच. हा आनंद सर्वजणींच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वहात होता.

       या दहा-बारा जणींच्या ग्रुपची कॅप्टन माझी काकू होती. सर्वजणी खूप खुश होत्या पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक दिवस अचानक काकूचे दोन्ही पाय बधीर झाले आणि दोन दिवसात काकूचे दोन्ही पाय कमरेपर्यंत शक्तीहीन झाले, त्यानंतर ती कोमात गेली पण नशीब बलवत्तर म्हणून त्यातूनही ती बाहेर पडली. डॉक्टरी अथक उपचार, काकूची इच्छाशक्ती (मला परावलंबी व्हायचे नाही), तिच्या मुलांचे अथक प्रयत्न, सुनांनी घेतलेले कष्ट यामुळे ती दोन वर्षांनी यातूनही बाहेर पडली आणि स्वतःच्या पायावर चालू लागली. हा एक चमत्कारच होता. सगळे काही नीट होते न होते तोच चार वर्षांपूर्वी पुन्हा कॅन्सरने डोके वर काढले. पुन्हा ऑपरेशन, केमो ... त्यातूनही ती बाहेर पडली पण आता शरीर थकले होते. ते साथ देत नव्हते. सर्वजण भेटून गेले आणि एक दिवस तीही तृप्त मनाने शांतपणे निघून गेली.

        प्रत्येकजण जन्माला येतो तो एक ना एक दिवस जाणारच असतो हे जरी सत्य असले तरी जाणारी व्यक्ती ही पुन्हा कधीही दिसणार नाही ही जाणीव मन हेलावून टाकते आणि हा अनुभव आपण प्रत्येकजण आपल्या जवळची व्यक्ती जाते तेव्हा घेत असतो.

         आज या गोष्टीला बारा दिवस पूर्ण झाले अन मनातील या भावना व्यक्त झाल्या, हि माझ्यासाठी काकूला वाहिलेली श्रद्धांजली आहे.

ईश्वर काकूच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना ! 🙏🙏

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

•  Suchita's Recipe या FB पेजला भेट द्या.. आवडल्यास Like करा... फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️
22.09.2018

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या