Aathavn : गोड आठवणी

"गोड आठवणी"

©सौ. सुचिता वाडेकर....✍️





       लग्नानंतरची पहिली पाच वर्ष आम्ही आई-आण्णांजवळ (माझे सासू सासरे ज्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे) होतो. त्यानंतर मुलांनी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, आम्ही सर्वांकडेही राहू असे सांगून त्यांनी सर्वांना वेगळे रहायला सांगितले आणि तसे केले देखील. या पाच वर्षात मी त्यांना, त्यांनी मुलांवर केलेल्या संस्कारांना खूप जवळून पाहिलं. मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर वेळप्रसंगी आई वडिलांना कठोर व्हावं लागतं हे त्यांच्याकडे पाहून समजले.

          मी एका लहानशा खेडेगावातून आले होते. ग्रामीण भाग आणि शहरी वातावरण यात खूप फरक होता. कॉलेज शिक्षण जरी शहरात झाले असले तरी त्या आयुष्यात खूप तफावत होती. आमच्या गावी पुरूष 'सत्ताक पध्दती' आणि इकडे वाडेकरांकडे 'स्त्री सत्ताक' पध्दती होती त्यामुळे सुरूवातीला मला खुप जड गेले. कारण माझ्या माहेरी माझे वडिल, माझे आजोबा यांचा निर्णय अंतीम असायचा आणि इकडे सासरे सासुबाईंशी बोलून निर्णय घ्यायचे.



       माझ्यासाठी हे सगळं नविन होतं. या काळात आई(सासूबाई) मला खूप रागीट आणि हट्टी वाटायच्या, आपलं तेच खरं करणार्या. मुलं देखील आईची बाजू घेऊन सासऱ्याना बोलायचे त्यावेळी खूप विचित्र वाटायचे. कारण याउलट माझ्या वडिलांसमोर 'ब्र' शब्दही काढायची कोणाची हिम्मतही नसायची;  त्यामुळे की काय सासऱ्यानविषयी माझ्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर होता. 

         मला मदतही करायचे ते, भाजी निवडू लागायचे, गप्पा मारायचे, एखाद्या प्रश्नावर माझं मत विचारायचे, बेटा म्हणून हाक मारायचे; माझ्यासाठी हे सगळं नविन होतं. खूप विरोधाभास होता दोन्ही जीवन पद्धतीत. त्यामुळेच की काय आईंचा सुरूवातीला मला खूप राग यायचा. अर्थात घबरायचेही त्यांना मी खूप; पण कालांतराने त्या दिसतात तेवढ्या कठोर नाहीयेत याची खात्री पटली.

       याकाळात सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या तसेच घरी मोड आणलेली सर्व प्रकारची कडधान्ये, सॅलेड, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या (शेंगदाणा, लसून-खोबरे, ओल्या नारळाची चटनी), वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी (काकडी, गाजर, कांदा-टोमॅटो, बिट, मुळा) हे सर्व आलटुन पालटून व्हायचं. रोज संध्याकाळी कंपल्सरी पालेभाजी असायची.

        रविवारचा नाष्टा इडली, मेदू वडे, आप्पे, उपमा, फ्रेंच टोस्ट यापैकी एक असयचा आणि दुपारी जेवायला नॉनव्हेज (मटन, चिकन, मच्छी यापैकी एक) तसेच बुधवार आणि शुक्रवार सुकट-सोड्यांपैकी एक आणि अंडी असा बेत असायचा. सर्व काही पोटभर पण मोजून मापून असायचं कारण अन्न वाया जाऊ नये हा उद्देश. जो कोणी रात्री जेवायला नसेल त्याने स्वयंपाक करण्याआधी स्वयंपाक करणार्याला सांगून जावे हा अलिखित नियम होता.

       जो कोणी जेवण बनवण्याधी सांगणार नाही किंवा नसांगता बाहेर जेवायला जाईल त्याला दुसर्या दिवशी पोळीचा चिवडा आणि परतलेला भात नाष्टयाला मिळायचा. सुरूवातीला या गोष्टीचे माझ्या भिडस्त स्वभावामुळे मला कसेतरी वाटायचे आणि मी ते सर्वांना न देता स्वतः खायचे; पण लवकरच ती गोष्ट माझ्या सासऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी ज्याच्यामुळे ते अन्न उरलंय त्याला तो नाष्टा देण्यास सांगून खरंच तो दिला जातोय का याकडेही बारकाईने लक्ष दिले.

       दुसरा अलिखित नियम म्हणजे उरलेल्या भाज्या ताज्या भाजीसोबत सर्वांना समान वाढायच्या, त्या घरातील स्त्रीने एकटीने खायच्या नाहीत. त्यामुळे बर्याचदा मोजून मापूनच असायचं. तर असे हे वरून शांत वाटणारे आण्णा, संस्कार आणि शिस्तीच्या बाबतीत कठोर व्हायचे आणि नातवंडांसोबत खेळताना त्यांच्यातीलच होऊन जायचे.

       आमचं लग्न झालं तेव्हा माझ्या मोठ्या दिरांची मुलगी अक्षदा आणि माझ्या नणंद म्हणजे आमच्या ताईंचा मुलगा अमेय खूप लहान होते. अक्षदा दुसरीत आणि अमेय सिनिअर के. जी. मध्ये होता. ताई ऑफिसला जायच्या त्यामुळे अमेय अमच्याकडे यायचा. शनिवार, रविवार अक्षदा, अमेयला सुट्टी असायची. ताईंनाही हाफ डे आसायचा त्यामुळे त्याही दुपारी एक-दिड पर्यंत यायच्या. मुलांचं आणि आण्णांचं(सासरे) जेवण झालं की त्यांचा लपाछपीचा खेळ सुरू व्हायचा घरातच. आण्णांवर राज्यं असायचं आणि हे दोघे बेडरूम मध्ये लपायचे. आण्णा किचन मध्ये येऊन १०, २०,....... १०० बोलायचे. तेव्हापासूनच माझी हसायला सुरूवात व्हायची.

       या खेळात इस्टॉप म्हटलं की आऊट आणि आऊट करू शकलो नाही तर धप्पा मिळायचे चान्सेस असायचे. इथे मात्र आण्णा नेहमी उलट करायचे म्हणजे आऊट करताना नाव घेऊन धप्पा म्हणायचे आणि अक्षदा, अमेय जोरात कल्ला करायचे आणि शेवटपर्यंत आण्णांवरच राज्यं रहायचं. हे पाहून तर माझी हसता-हसता पुरेवाट व्हायची. कारण मी पहिल्यांदाच असे अजोबा बघत होते जे नातवंडांशी खेळत होते आणि त्यांना आनंद मिळवा म्हणून शेवटपर्यंत स्वतः डेन घेत होतेे.

       तर असा हा दर शनिवारी ठरलेला कार्यक्रम असायचा. या काळात मी प्रचंड मनसोक्त हसलेय जणूकाही माझं बालपण मी पुन्हा नव्याने जगले. मला हसताना पाहून ताई ही हसायच्या. आता आठवलं तरी खूप... छान वाटतं. दिवस, वर्ष सरत असतात, वय वाढत जाते, वाढणाऱ्या वयासोबत प्रगल्भताही येते आणि अशात सोबत असते ती या गोड आठवणींची... ज्या आठ्वल्यावर चेहऱ्यावर आपोआप स्माईल येते. 😊😊

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
आवडल्यास Like करा... फॉलो करा.

धन्यवाद ! 🙏 
©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या