Parenting : पालकत्व निभावताना... (भाग-६) "पूर्व बाल्यावस्थेतील धोके"

 पालकत्व निभावताना... (भाग-६) "पूर्व बाल्यावस्था"


©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️

१९.०४.२०२०


मागील भागांपासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पहात आहोत.


मागील भागात(भाग-५) आपण

"पूर्व बाल्यावस्था" पहिली.. खालील लिंकवर.. ⤵️








या भागात आपण पाहणार आहोत..

"पूर्व बाल्यावस्थेतील धोके"


• पूर्व बाल्यावस्थेतील शारीरिक धोके - 


२ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना काही शारीरिक धोके निर्माण होऊ शकतात. आता हे शारीरिक धोके कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात ते आपण पाहूयात.


१. आजार - या वयात जास्तवेळा आजारी पडू शकतात. त्यांना छोट्या छोटया गोष्टीचे इन्फेक्शन लवकर होते. ताप, सर्दी, खोकला हे एकाला झाले की दुसऱ्या मुलांना त्याचे इन्फेक्शन होते व मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. या वयात मुलांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असते. यात दोन प्रकार पडतात... एक शारीरिक आजार आणि दुसरा मनोदायीक आजार. शारीरिक आजार औषधाने बरे होतात तर मनोदायीक आजारांना उपचाराची गरज असते.


२. अपघात - २ ते ६वर्षे वयोगटातील मुलांना अपघाताचा धोका मोठया प्रमाणावर असतो. या वयोगटातील मुलांमध्ये भीती अजिबात नसते, त्यामुळे खेळताना, पळताना बऱ्याचदा अपघात होतात. कधी कधी फ्रॅकचर होऊ शकते, डोक्याला मार लागू शकतो, दात पडू शकतात, कधी कधी खोक पडल्यामुळे टाकेही घालावे लागतात. यासाठी वयोगटातील मुलांना लक्षपूर्वक सांभाळणे आवश्यक असते.


३. आकर्षक नसणे - बऱ्याचदा या वयातील मुलांना आपण इतरांसारखे आकर्षक दिसत नाही असे वाटते, त्यावेळी ते इतर मुलांमध्ये न मिसळता एकटे राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होऊ लागतो. यातही वेगवेगळी कारणे आहेत.


•शरीराचा आकार - काही वेळा काही मुले खूप लठ्ठ असतात त्यावेळी त्या मुलाला आपण आकर्षक नाही असे वाटते.


• केस चांगले नसणे - काही मुलांचे केस कुरळे असतात तर काहींचे खूप पातळ असतात अशावेळी या मुलांना आपले केस इतरांसारखे नाहीत असे वाटू शकते.


• दुधाचे दात पडणे - या वयात मुलांचे दुधाचे दात पडून नवीन दात येतात. त्यावेळी दात पडल्यावर आपण आकर्षक दिसत नाही असे वाटल्यामुळे ते न बोलण्याचा, न हसण्याचा प्रयत्न करतात.


• ऑकवर्ड वाटणे - या वयोगटातील मुलांची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. काही मुलांना काही गोष्टी चटकन लक्षात येतात तर काहींना वेळ लागतो. त्यामुळे इतर मुलांशी जर त्यांची तुलना केली तर त्यांना मी इतर मुलांसारखा नाही किंवा इतर मुलांसारखे मला जमत नाहीत म्हणून ऑकवर्ड वाटू शकते. त्यामुळे पालकांनी अशी तुलना करणे टाळावे.


• लठ्ठपणा - या वयोगटातील मुले  खरे तर सडपातळ असतात पण काही मुले लठ्ठही असतात. जास्त आणि अवेळी खाण्यामुळे  त्यांच्या शरीरात फॅटस तयार होतात आणि वजन वाढत जाते. गरज नसताना आणि ज्या पदार्थामुळे फॅटस वाढतात असे पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यामुळे लठ्ठपणा वाढू लागतो. याचा मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो.


• पूर्व बाल्यावस्थेतील मानसिक धोके - 


२ ते ६वर्षे वयोगटातील मुलांना काही मानसिक धोके निर्माण होऊ शकतात. आता हे मानसिक धोके कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात ते आपण पाहूयात.


१. बोलण्यातील धोके - या वयातील मुलांशी शुद्ध भाषेत बोलले तर ते शुद्ध बोलतील परंतु त्यांच्याशी बोबडे बोलले तर तेही बोबडे बोलू लागतील. त्यामुळे आई-वडील व घरातील इतर सदस्यांनी या वयातील मुलांशी शुद्ध भाषेत बोलावे.


२. भावनिक धोके - बऱ्याचदा  या वयातील मुलांना भावना कशा व्यक्त कराव्यात कळत नाही अशावेळी ते या धोक्याला बळी पडतात. मनासारखेघडले नाही तर राग व्यक्त करताना दिसतात. मुलांशी जवळीकता नसेल तर मुले भावना समजू शकत नाहीत याचाही परिणाम मुलांवर होऊ शकतो.


३. सामाजिक धोके - समाजामध्ये तुम्ही नीट बोललात तर तुम्हाला नीट उत्तर मिळते, म्हणजे तुमची भाषा चांगली असावी लागते. परंतु ती जर आरेरावीची,  आक्रमक असेल तर समोरच्याकडूनही तसेच उत्तर मिळते. अशावेळी या धोक्याला मुले बळी पडतात  उदा. बाल गुन्हेगार. यामध्ये पालकांचा सहभाग महत्वाचा असतो. मुलांना सारखे हे करू नको, ते करू नको,  याच्याबरोबर खेळू नको असे सांगितले जाते त्यावेळी मुले समाजात नीट पणे मिसळू शकत नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलांना नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांचे कौतुक केले पाहिजे.


४. खेळतानाचे धोके - मुलांना त्यांच्या वयोगटाची मुले खेळायला नसतील तर याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो. जर एखादे मुल शारीरिक दृष्टया अक्षम असेल तर ते इतर मुलांसोबत खेळू शकत नाही. कधी कधी जागा बदलली तरी मुले पटकन खेळायला जायला घाबरतात. काही मुले खूप आक्रमक असतात त्यावेळी अशा मुलांसोबत खेळायला मुल घाबरते.


५. विकासात्मक धोके - एखाद्या मुलाचा मेंदूचा विकास नीट झाला नसेल तर ते मुल इतर मुलांमध्ये मिसळू शकत नाही. त्यांच्या वयाच्या मुलांच्या तुलनेत जर ती मागे असतील, मंद असतील, इतर मुलांसारखी अभ्यासात हुशार नसतील तर हा धोका होतो.


६. नैतिक धोके - आई वडिलांमध्ये एक मत नसेल म्हणजे आई एक बोलते तर बाबा एक बोलतात तेव्हा कोणाचे ऐकायचे हा प्रश्न मुलांना पडतो.


पालक मुलांना नेहमी सांगतात की नेहमी खरे बोलावे आणि काहीवेळा पालक स्वतःच खोटे बोलताना दिसतात याचाही मुलांवर परिणाम होतो.


हुकूमशाही पद्धतीने वागणे म्हणजे तुला सांगितले आहे ना की हे असेच करायचे मग ते तसेच करायचे असे जेव्हा पालक सांगतात तेव्हा मुलाची विचार करायची बुद्धि खुंटते.


प्रेमळ व चांगल्या भाषेत मुलांना सांगितले तर त्यांची जडन-घडण चांगली होते अन्यथा नैतिक धोका निर्माण होतो.


७. लिंगविषयक धोके - काही घरात मुलांसाठी वेगळे व मुलींसाठी वेगळे नियम, बंधने  असतात. अशावेळी धोका होऊ शकतो.


८. कौटुंबिक संबंधातील धोके - ज्यावेळी पालकाकडून मुलाला सुरक्षा मिळत नाही अशावेळी हा धोका निर्माण होतो. उदा. मुले पाळणारात रहात असतील तर, आई मुलाला कमी वेळ देत असेल तर हा धोका होऊ शकतो. मुलांना आई वडिलांची किंमत रहात नाही, ती कशीही बोलू लागतात.


९. व्यक्तिमत्वातील धोके - २ ते ६ वर्षाच्या मुलाला स्वतःला ओळखता यायला हवे म्हणजे मी कोण आहे? माझ्या घरी कोण कोण आहे? ही स्व: ओळख असायला हवी. तसेच कोणी विचारल्यावर सांगता यायला हवे अन्यथा हा धोका होऊ शकतो.


अशाप्रकारे या भागात आपण "पूर्व बाल्यावस्थेतील 'शारीरिक धोके' आणि 'मानसिक धोके' पाहिले.


• भेटूयात पुढील भागात..  


५. उत्तर बाल्यावस्था - 

(कालावधी ६ वर्षेपासून ते १२ वर्षे पर्यंत)


• कसा वाटला ब्लॉग...

• आवडला का... 


• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 

• फॉलो करा.


धन्यवाद ! 🙏 


©सौ. सुचिता वाडेकर...✍️

१९.०४.२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या