Parenting : पालकत्व निभावताना... (भाग-५) "पूर्व बाल्यावस्था"




पालकत्व निभावताना... (भाग-५) "पूर्व बाल्यावस्था"


©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️

१८.०४.२०२०


मागील भागापासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पहात आहोत.


मागील भागात(भाग-४) आपण

"शैशवावस्था" पहिली.. खालील लिंकवर ⤵️


पालकत्व निभावताना (भाग-४) "शैशवावस्था"



या भागा आपण चौथी अवस्था पाहणार आहोत ती म्हणजे "पूर्व बाल्यावस्था".


४. पूर्व बाल्यावस्था - 

(कालावधी : २ वर्षे पासून ते ६ वर्षे)


बालपणीचा हा काळ आनंदाचा, सुखाचा काळ असतो. बालकाच्या वयाच्या वाढीचा २ वर्षेपासून ते ६ वर्षा पर्यंतचा जो कालावधी असतो त्याला "पूर्व बाल्यावस्था" म्हटले जाते.


• शरीरिक विकास - 


बाळ जन्माला आल्याबरोबर मुलगा की मुलगी या प्रश्नानंतर दुसरा प्रश्न बाळाचे वजन किती हा येतो. वजन चांगलं असणं बाळाच्या सुदृढतेचे लक्षण असते. जन्मत: वजन कमी असेल तर बाळाच्या जीवाला धोका असू शकतो.


बाळाचं वजन गर्भावस्थेत वाढण हे आईच्या वयावर, संपत्तीकं स्थितीवर, शारीरिक, मानसिक स्थितीवर, बाळंतपणाच्या खेपेवर,  तीला गरोदरपणी होणाऱ्या आजरांवर, त्यावेळी केलेल्या औषधउपायांवर,  तिने घेतलेल्या नको त्या पदार्थांवर उदा. दारू, तंबाखू,  सिगारेट इ. वर व गर्भाच्या संख्येवर अवलंबून असते.


मुलांची भूक ही वजन व उंची वाढण्याच्या गरजेनुसार असते. हे वजन अतिप्रमाणात वाढले तर लठ्ठपणा येतो. यात अनुवंशिकतेचाही मोठा प्रभाव असतो. आई वडिल दोघेही लठ्ठ असतील तर ७०% मुल जाड होण्याचे प्रमाण वाढते. एकजण लठ्ठ असेल तर ५०% प्रमाण असते आणि दोघेही लठ्ठ नसतील तरी आजकालच्या राहणीमानामुळे पुढच्या पिढीत लठ्ठपणा येण्याची  शक्यता असते.


अंगावर दूध पिणाऱ्या मुलांचं वजन सुरुवातीला छान वाढतं. पुढे वेळेवर वरचे पदार्थ चालू न केल्यामुळे वजन कमी वाढत.


साधारणत: २ वर्षे वयाच्या मुलाची उंची ८५.६ सेमी. असते तर ती वाढत जाऊन ६ वर्षे वयापर्यंत ११६.१सेमी.इतकी होते.


२ ते ६ वर्षांच्या लहान बालकाच्या केवळ उंची व वजन यातच फरक पडत नाही तर त्याच्या आकारमनातही फरक पडतो. लांबी पेक्षा मस्तकाची रुंदी वाढते, हातापायाची लांबी व आकार वाढतो. ५ वर्षापर्यंत तळपायाची कमानही उत्तम तयार झालेली असते. या मुलांचा गोलाकारपणा कमी होऊन ती अधिक सडपातळ होतात.


पूर्व बाल्यावस्थेत बालकाचे दुधाचे दात पडून दुसरे यायला सुरुवात होते. तसेच मल-मूत्र विसर्जन यावरही नियंत्रण येते. चालणं,  लिहिणे, कलरिंगचे कौशल्य याच काळात विकसित होते.


• कौशिल्ये - 


उंच उडी मारणे, दोन पायांची उडी, एका पायाने अडथळयावरून उडी,  झाडावर अथवा शिडीवर चढणे, पोहायला, नाचायला,   सायकल चालवायला शिकतात. चमच्याने खाणे,  कात्रिने कापणे,  बुटाची लेस बांधणे इ. हालचाली विकसित होतात.


तिसऱ्या वर्षांपासून बालकास वर्तुळ चौकोन काढता येतो. चौथ्या वर्षी त्याच आकृत्यांमधील नेमकेपणा कळतो. आकृती काढावयास लागलेला कमी वेळ आणि अचूकपणा यावरून बालकाचा विकास कळतो.


३ वर्षाची मुले १५ ते २४ इंच अंतरावर उडी मारतात, जिन्यावर एकाड एक पाय टाकून मदतीशिवाय चढतात, लंगडी घालू शकतात, त्यांना अचानकपणे थांबता वा चटकन वळता येत नाही.


४ वर्षाच्या मुलांचे थांबणे, वळणे  यावर नियंत्रण आलेले असते. २४ ते ३३ इंच अंतरावर उडी मारू शकतात. एका पायावर ४ ते ६ टप्पे लंगडी घालता येते.


५ वर्षाची मुले पळत येऊन लांब उडी मारू शकतात तसेच जवळजवळ १६ फूट अंतर सहज लंगडी घालतात.


• मेंदूची वाढ - 


इतर कोणत्याही शारीरिक अवयवांपेक्षा  मेंदूची वाढ या वयात फार वेगाने होते. दीड ते दोन वर्षामध्ये ज्यावेळी भाषेचा विकास जलद होतो तेव्हा मेंदूतील क्रिया वाढते हे सूचित होते. साधारणपणे 3 वर्षाच्या बालकाची समज,  अचूक प्रश्न विचारणे,  नेमकी माहिती देणे, चेहऱ्यावरील योग्य हावभाव पाहून आपण चकित होतो.


या काळात बालके तर्कसंगत विचार करू लागतात... उदा. आईने कपडे बदललेले पाहताच, 'मी योतो तूझ्याबरोबर' असे तत्परतेने सांगून टाकतात. आई बाहेर दुकानात चालली आहे.. गाडीवरून फिरायला मिळेल आणि येताना खाऊ आणता येईल एवढे सगळे विचार त्याच्या मनात येऊन जातात. भाषेचा विकास देखील याच काळात होतो.


• भावनिक विकास - 


मुले मौजमस्ती करण्यासाठी खेळतात. यांना खेळातूनच त्यांचे शिक्षण आणि विकास मोठया प्रमाणावर होत असतो. खेळण्यामुळे  त्यांचे ज्ञान, अनुभव व आत्मविश्वास वाढून कुतूहल जागृत होत असते. बऱ्याचदा या वयातील मुलांना राग येताना दिसतो. मारामारी करणे,  खोड्या काढणे, केस ओढणे, चिमटे काढणे यासारख्या कृती करतात. दुसऱ्याकडे असलेली वस्तू खेचून घेणे ही मत्सराची भावना त्यांच्यात दिसते.


भीती ही भावना सुद्धा त्यांच्या मध्ये असते. एखादा भीतीदायक सिनेमा त्यांना दाखवला तर त्यांना भीती वाटते, ती घाबरतात. तसेच आनंद, प्रेम, अति दुःख यांना भावना देखील ती व्यक्त करतात. उदा. त्यांना एखादे गिफ्ट दिले, आईस्क्रीम दिले किंवा बर्थडे रिटन गिफ्ट मिळाले की त्यांना अतिशय आनंद होतो. प्राण्यांसोबत खेळताना त्यांच्यातील प्रेम व्यक्त  होते.


• सामाजिक विकास - 


पूर्व बाल्यावस्था ही महत्वपूर्ण विकास अवस्था आहे. या वयोगटात मुले शाळेत जाण्यास सुरुवात करतात. यांना अवस्थेत मुल सामाजिक व्यवहार शिकू लागते. मुलांचा सामाजिक विकास कुटुंबापासून सुरु होतो. आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील इतर सदस्य,  शेजारी,  मित्रमंडळी तसेच शाळा देखील सामाजिक विकासासाठी मदत करते. जसजसे मुल कुटुंबापासून दूर जाऊ लागते तसतसा त्याचा सामाजिक विकास होऊ लागतो. आई-वडीलांवर अवलंबून न राहता ते बाहेरील लोकांसोबत,  मित्रांसोबत जास्त वेळ घालवते.


मुले मोठ्यांचे तसेच त्यांच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींचे अनुकरण करून त्यानुसार वागतात. चुकीच्या गोष्टींचे तर  लवकर अनुकरण करतात.त्यामुळे मुलांसमोर चांगले वागणे हे पालकांना आव्हान असते, नाहीतर चुकीचे संदेश मुलांपर्यंत पोहोचतात. मुलांच्या चुकीच्या वागण्या ला अप्रत्यक्ष पालकच जबाबदार असतात. निरीक्षण व अनुकरण यामधून मुले समाजात कसे मिसळावे हे शिकतात.


खेळताना एकमेकांना सहकार्य करणे किंवा कसे करावे हे मुल शिकत असते. हल्ली एकेरी कुटुंब पद्धती आणि एक मुल यामुळे मुलांना एकमेकांना सहकार्य कसे करावे ते कळत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट किंवा वस्तू फक्त मलाच हवी असा मुलांचा हट्ट दिसतो. परंतु बाहेरील जगात मुलांमध्ये मिसळल्याने त्याला सहकार्याची जाणीव होते.


मुलांच्या चांगल्या गोष्टीचे कौतुक केले की मुले ती गोष्ट पुन्हा करण्यासाठी तयार होतात, परंतु चांगल्या वर्तनाचे वेळीच कौतुक केले नाही तर मुले वाईट गोष्ट करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पालकांनी मुलांकडे लक्ष दिले नाही तर ती एक्कलकोंडी होण्याची शक्यता असते तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होऊ लागतो.  उलट उत्तरे करणे,  मारामारी करणे यासारखी आक्रमकता वाढीस लागते.. अहंकार वाढीस लागतो.


या भागात आपण बालकाचा शरीरिक विकास, कौशिल्ये, मेंदूची वाढ़, भावनिक विकास, सामाजिक विकास पाहिला. पुढील भागात आपण 'पूर्व बाल्यावस्थेतील धोके' पाहणार आहोत.


• भेटूयात पुढील भागात..⤵️


• पूर्व बाल्यावस्थेतील धोके  -  


• कसा वाटला ब्लॉग...

• आवडला का... 


• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 

• फॉलो करा. 


धन्यवाद ! 🙏 


©सौ. सुचिता वाडेकर...✍️

१८.०४.२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या