Parenting : पालकत्व निभावताना... (भाग-४) "शैशवावस्था".

 पालकत्व निभावताना... (भाग-४) "शैशवावस्था".


©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️

१७.०४.२०२०




मागील भागापासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पहात आहोत.


मागील भागात(भाग-३) आपण

"नवजातावस्था" पहिली... ⤵️


पालकत्व निभावताना भाग - 3 "नवजातावस्था"


या भागात आपण तिसरी अवस्था पाहणार आहोत ती म्हणजे "शैशवावस्था".


३. शैशवावस्था - 

(कालावधी : २ आठवडे पासून ते २ वर्षे)


जन्मानंतरचे २ आठवडे नवजातावस्थेचे संपले की अर्भकाची शैशवावस्था सुरु होते,  ती त्याच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत असते. नवजातावस्थेला शास्त्रज्ञ आयुष्यातील विश्रांतीचे स्थान संबोधतात. अर्भकाच्या वाढीला खरी सुरुवात शैशवावस्थेत होते. जन्मत: अर्भकाचे वजन साधारणता ५ ते ७ पौनड आणि उंची साधारणता १९ इंच असते,  यात पहिल्या वर्षी अत्यंत जलद गतीने वाढ़ होते.


बाळ ५ महिन्यांचे होते त्यावेळी त्याचे वजन जन्म महिन्याच्या दुपट्ट झालेले असते. पहिल्या वाढदिवसापर्यंत ते टिप्पट होते.  दुसऱ्या वर्षी मात्र ही गती काहीशी मंदावते.  दुसऱ्या वाढदिवसापर्यंत शिशुचे वजन हे जन्म वजनाच्या चौपाट होते. अर्थात प्रत्येक शिशु मध्ये याची बरीच विशेषतः दिसून येते. 


वजनासारखीच उंचीत देखील झपाट्याने वाढ होते. जन्मावेळी साधारणता शिशुची उंची १९ इंच असते...  वर्षाअखेरीस यात १ फुटाने वाढ़ होते आणि दुसऱ्या वाढदिवसापर्यंत बाळाची उंची ३ फूट होते. 


अर्भकाची वाढ़ डोक्यापासून पायाकडे होते. जन्माच्या वेळी अर्भकाचे डोके शरीराच्या मनाने मोठे असते..  कालांतराने शरीराच्या इतर अवयवांची वाढ होते आणि डोके नॉर्मल दिसू लागते. सुरुवातीला डोक्याची व शरीराच्या वरच्या भागातील  इंद्रियांची वाढ़ होते..  नजर स्थिर होते, मान सावरता येते.


जस जशी स्नायूंची शक्ती वाढते तसतशा विविध हालचाली ते करू लागते.  टाचा जमिनीवर रोवून, शरीराला रेटा देऊन शरीर हव्या त्या दिशेला फिरवते. ६ महिन्याचे झाल्यावर कुशीवर वळणे, पालथे पडणे, पुढे सरकणे, हव्या त्या वस्तू पर्यंत पोहोचने त्यांना सहज साध्य होते. ८ व्या महिन्यानंतर रांगणे, ९ व्या महिन्यानंतर धरून उभे राहणे,  १० व्या महिन्यानंतर धरून धरून चालणे व पहिल्या वाढदिवसापर्यंत ते सुटे सुटे चालू लागते. 


• कौशल्ये - 


बोटांनी वस्तू पकडता येते, वस्तू उचलण्याची क्रिया आठव्या महिन्यात माहित होते. 

सव्वा वर्षाच्या मुलाला बरेचसे सांडत परंतु चमच्याने खाता येते. शैशवावस्था पूर्ण होताना मात्र मुल न सांडताही चमच्याने खाऊ लागते.


मुल वर्षाचे झाल्यावर टोपी, मोजे काढू लागते तसेच दीड वर्षाचे झाल्यावर टोपी घालण्याचा प्रयत्न करू लागते. शैशवावस्थेच्या अखेरीस मुलांना सर्व कपडे काढता येऊ लागतात व शर्ट घालता येऊ लागतो. अंघोळ करणे, पाणी अंगावर घेणे, साबण हातावर लावणे करू लागतात.


एक वर्षाची मुलं पेन्सिल किंवा रंगीत खडूने रेघोटया मारू लागतात. चेंडू फेकणे, बाटलीचे झाकण उघडणे, पुस्तकाची पाने उलटणे, ठोकळयांची रचना करणे, मोठे मणी दोऱ्यात ओवणे इत्यादी गोष्टी शैशवावस्था पूर्ण होताना मुल करू लागते.


रांगणे,  सरपटणे, चालणे या क्रियेनंतर बालके जीना चढायला शिकतात,  तीन चाकी सायकल चालवायचा प्रयत्न करतात. लपाछपी हा खेळ त्यांना आवडतो तसेच गाणी म्हणून दाखवलेली,  गोष्टी सांगितलेल्या त्यांना आवडतात. त्यामुळेच या वयात ती टीव्ही कडे आकर्षित होतात. साधारणता दुसऱ्या वर्षी मुल सभोवतालील व्यक्तीचे अनुकरण करू लागते.


जन्मानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात मुल हुंकार द्यायला सुरुवात करते. कानावर पडणाऱ्या भाषेला हुंकारमार्फत प्रतिसाद द्यायला सुरुवात करते. हळूहळू भाषेचा विकास सुरु होतो. ६ महिन्याच्या वयापासून याचा प्रभाव दिसून येऊ लागतो. ज्यावेळी पहिल्यांदा आई, बाबा हे शब्द जेव्हा बाळ बोलते त्यावेळी आई-बाबांना परमानंद होतो. बाळाचा पहिला शब्द हा केवढा आनंदाचा क्षण असतो घरामध्ये! १ ते २ वर्षादरम्यान मुले बोलायला लागतात. बोललेले त्यांना समजू लागते.


• शैशवावस्थेतील खेळाचे मूल्य आणि खेळातील धोके -(घ्यावयाची काळजी)


खेळामधून बालकाला अनेक प्रकारच्या अध्ययनाची संधी मिळते. खेळातून शिशुला भोवतालच्या परिस्थितीची, वस्तुंची, लोकांची माहिती दिली जाते. अनेक खेळण्यामुळे शिशुला लागू शकते, कापू शकते. जी खेळणी सुट्या मण्याच्या स्वरूपात येतात ती तोंडात घातल्यावर अडकू शकतात अशावेळी शिशु गुदमरूण्याची शक्यता असते. अशावेळी सावधानी आवश्यक ठरते.


दूरदर्शन(टीव्ही)मुळे लहान मुलांना एकाजागी सांभाळता येते परंतु यामुळे शिशुचा खेळात सहभाग होत नाही साहजिकच त्याची क्रियाशीलता कमी होते. बऱ्याचदा मुल खेळत असताना जिंकण्याचा मान दिला जातो.. परिणामत: मोठेपणी त्याला पराभव स्वीकारने अवघड जाते. यासाठी इतर मुलांमध्ये खेळणे आवश्यक आहे. इतरांशी खेळल्यामुळे शिशुचा आत्मकेंद्रीपणा कमी होऊन सहनशिलता वाढिस लागते.


अशाप्रकारे जन्मानंतर २ आठवड्यांपासून ते २ वर्षा पर्यंतच्या या कालखंडात अर्भकाची वाढ, कौशल्ये, खेळाचे मूल्य व खेळाचे धोके ही  "शैशवावस्थेची" वैशिष्ट्ये आपण पाहिली.


• भेटूयात पुढील भागात..  


४. पूर्व बाल्यावस्था - 

(कालावधी : २ वर्षे पासून ते ६ वर्षे)


• कसा वाटला ब्लॉग...

• आवडला का... 


• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 

• फॉलो करा. 


धन्यवाद ! 🙏


©सौ. सुचिता वाडेकर...✍️

१७.०४.२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या