Parenting : अर्भकाच्या जन्मानंतरच्या लगेचच्या अवस्थेला नवजातावस्था म्हणतात. पालकत्व निभावताना... (भाग-३)

 पालकत्व निभावताना... (भाग-३) "नवजातावस्था"


©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️

१६.०४.२०२०





मागील भागापासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पहात आहोत. 


मागील भागात(भाग-२) आपण 

१.जन्मपूर्वावस्था - (गर्भधारणा ते जन्मापर्यंत) पाहिली... 


खालील लिंकवर ⤵️


पालकत्व निभावताना भाग - 2 जन्मपूर्वावस्था



या भागात आपण दुसरी अवस्था पाहणार आहोत ती म्हणजे "नवजातावस्था".


२. नवजातावस्था - (कालावधी : जन्मापासून ते २ आठवडे)


अर्भकाच्या जन्मानंतरच्या लगेचच्या अवस्थेला नवजातावस्था किंवा अर्भकावस्था म्हणतात. हि नवजातावस्था अर्भकच्या जन्मापासून २ आठवडे पूर्ण होईपर्यंत अशी अत्यंत लहान विकासावस्था असते. गर्भ मातेच्या शरीरातून बाहेर आल्यापासून नाळ कापून ती बांधली जाईपर्यंतच्या काळाला प्रारंभिक नवजातावस्था म्हणतात. हि जन्मापासून १५ ते ३० मिनिटांची असते. नाळ कापली जाईपर्यंत अर्भक मातेच्या शरीरात असल्यासारखेच असते.


नाळ कापली व बांधली गेल्यापासून ते पुढे दोन आठवडे होई पर्यंत अर्भकाची नवजातावस्था असते. या काळात मातेच्या शरीराबाहेरील परिस्थितीशी त्याला समायोजन(जुळवून घेणे) करावे लागते.


• अर्भकाला नवजातावस्थामध्ये करावी लागणारी समायोजने- 


१. बदलत्या तापमानाशी समायोजन - मातेच्या शरीरातील तापमान आणि बाहेरील तापमान भिन्न असते त्यामुळे अर्भकाला बाहेरील तापमानाशी जुळवून(समायोजन) घ्यावे लागते.


२. श्वसन करणे - नाळ कापल्यानंतर अर्भकाला मातेच्या शरीरातून होणारा प्राणवायू पुरवठा थांबतो त्यामुळे त्याला स्वतःचे स्वतः श्वसन करावे लागते.


३. चोखणे व गिळणे - जन्मापूर्वी गर्भाला नाळेमार्फत अन्न मिळत असते मात्र जन्मानंतर चोखणे, गिळणे या क्रिया करूनच अन्न मिळवावे लागते.


४. उत्सर्जन करणे - जन्मापूर्वी नाळेमार्फत उत्सर्जन होत असते मात्र जन्मानंतर लगेच अर्भकाची उत्सर्जन केंद्रे काम करू लागतात.


• नवजातावस्थेची वैशिष्ट्ये - 


जन्मपूर्व अवस्थेत जलद गतीने झालेली वाढ़ अर्भकाचा जन्म होताच एकदम थांबते. आठवड्यानंतर त्यात सुधारणा होऊ लागते. नवजाताच्या शरीराचे स्नायू लहान व मऊ असतात. हात, दंड यांच्या स्नायूंच्या विकासापेक्षा मान, पाय यांच्या स्नायूंचा विकास कमी झालेला असतो. स्नायूंप्रमाणे अस्थीही मऊ व लवचीक असतात.


डोक्यावर,  हातापायावर,  पाठीवर लव असते. जन्मावेळी मज्जासंस्था पूर्ण विकसित झाली नसल्यामुळे अर्भक शारीरिक समतोल ठेऊ शकत नाही. नवजात अर्भकाचे हृदयाचे ठोके जलद असतात. जन्मल्याबरोबर रडण्यामुळे फुफूसे मोठी होतात व श्वसन सुरु होते.


भुकेच्या वेळा, भुकेचे प्रमाण दोन्हीही अनियमित असते. उत्सर्जनाची क्रिया काही तासातच सुरु होते. जागेपणी शांत असताना अर्भक बऱ्याचवेळा मूत्रविसर्जन करते. खोकला येणे, शिंक येणे, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होणे यांना क्रिया नवजाताला जन्मजात आवगत असतात.


सुरुवातीला नवजाताच्या पचनसंस्थेतून हिरवट काळ्या रंगाचे उत्सर्जन होते. जन्मानंतर सुरुवातीलाच जवळ जवळ ५०% अर्भकांना शरीरावर व डोळ्यावर पिवळ्या रंगाची झाक येते. नवजातावस्थेतील ही कावीळ कमी वजनाच्या अर्भकांमध्ये दिसून येते, मात्र तितकीच ती धोकादायक नसते. नवजातावस्थेतील अर्भक दिवसातील २२-२३ तास झोप घेते.


नवजात बालके आंधळी निश्चितच नसतात मात्र त्यांचे दृकक्षेत्र प्रौढाच्या तुलनेत निम्मे  असते. स्नायूंच्या दुर्बलतेमुळे अर्भकाला दोन्ही डोळे एकाचवेळी एका वस्तूवर केंद्रित करता येत नाहीत.


नवजात अर्भकाचे श्रवणवेदन(ऐकणे) हे सर्वात कमी विकसित असते मात्र काही ध्वनीना अर्भके प्रतिक्रिया करू शकतात. उदा. आकस्मिक मोठा आवाज ऐकताच ती दचकतात. काही आवाज ते ओळखूही शकतात. उदा. इतर अर्भकांच्या रडण्याचा आवाज ऐकून ते आपले रडणे चालू ठेवते परंतु त्याचा स्वतःचा रडण्याचा ध्वनीमुद्रीत केलेला आवाज त्याला ऐकवल्यास ते बाळ रडायचे थांबते.


गंध(वास), रुची(चव) ही वेदन सुद्धा बऱ्यापैकी विकसित झालेली असतात तसेच स्पर्शाची वेदनक्षमता देखील चांगलीच विकसित झालेली असते.


अशाप्रकारे जन्मानंतर सुरुवातीच्या २ आठवड्यांच्या कालखंडात अर्भकाला कोणकोणती समायोजने करावी लागतात तसेच नवजातावस्थेची वैशिष्ट्ये आपण पाहिली.


• भेटूयात पुढील भागात.. ⤵️


३. शैशवावस्था - 

(कालावधी : २ आठवडे पासून ते २ वर्षे)


• कसा वाटला ब्लॉग...

• आवडला का... 


• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 

• फॉलो करा. 


धन्यवाद ! 🙏 


©सौ. सुचिता वाडेकर...✍️

१६.०४.२०२०



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या