खुप सारे पूड (लेयर्स) सुटलेली खुसखुशीत पुडाची करंजीची अगदी सोपी पद्धत.
"पुडाची करंजी"
ही करंजी माझी आजी बनवायची. माझ्या लहानपणी मिक्सर, फ्रीज असे काही नव्हते. आई, आजी पाट्यावर वाटण, पुरण वाटायच्या. आम्ही बहिणी ही मदत करायचो. करंजी ची कणिक घट्ट भिजवावी लागते त्यामुळे करंज्या करण्यापूर्वी आजी ती कणिक पाट्यावर मुसळाच्या साहाय्याने चेचून घ्यायची त्यावेळी मुसळ पडू नये म्हणून आम्हा मुलांना ती एका हाताने धरायला लावायची. आम्हालाही खूप मजा यायची. ते मुसळ वर-खाली होताना मऊ होत जाणारी कणिक पाहून खूप गंमत वाटायची. त्यावेळी केलेले निरीक्षण आता कामास येतेय याची जाणीव होते आणि खूप छान वाटते. आता मिक्सर, फूडप्रोसेसर ने काम हलके केलेय पण त्यात ती मजा नाही जी आम्ही अनुभवलीय. असो.
या करंजीला बनवायला वेळ लागतो पण सोबतीला कोणी असेल तर मात्र झटपट होते आणि शिणही येत नाही. तर अशी ही आजी, काकू, आई आणि माझी मोठी बहीण यांचा हातखंडा असलेली माझ्या आईची रेसिपी 'पुडाची करंजी' आज तुमच्या साठी घेऊन आलेय....
● पुडाची करंजी
साहित्य :
• मैदा 1 वाटी
• रवा 1 वाटी
• 2 टे.स्पून गरम तेलाचे मोहन
• 3 टे.स्पून कॉर्नफ्लॉवर (साटा म्हणून वापरण्यासाठी)
• पीठ भिजवण्यासाठी पाऊण फुलपात्र पाणी किंवा दूध
• चिमुटभर मीठ
• तळण्यासाठी तेल
सारण :
1. एक वाटी खोबरे किस किंवा डेसिकेटेड कोकोनट
2. पाव वाटी बारीक रवा तुपात छान भाजून घेणे.
3. खसखस 2 टे स्पून भाजून मिक्सरला बारीक करुन घेणे.
4. पिठीसाखर दीड वाटी
5. वेलची पूड 1 टे स्पून
6. पाच ते सहा काजू व बदामाची पूड करणे
हे सर्व साहित्य एकत्र करून सारण तयार करावे.
टीप : कणिक मळून झाकून ठेवावी आणि चार-पाच तासानंतर फूडप्रोसेसर / मिक्सर मध्ये कणिक चांगली मऊ करून घ्यावी व नंतर करंजा बनवाव्यात.
कृती -
1. कॉर्नफ्लॉवर मध्ये तेल घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. लावता येईल तेवढे पातळ असावी जास्त पातळ नको.
2. मळलेल्या कणकेचे एकसारखे चार ते पाच गोळे करावेत.
3. त्याची लाटता येईल तेवढी पातळ आणि मोठी पोळी लाटून घ्यावी आणि त्यावर कॉर्न फ्लोअरची पेस्ट लावावी.
4. त्याचा रोल करावा.
5. आणि छोट्या लाट्या करून घ्याव्यात.
6. ही छोटी लाटी चौकोनी आकारात लाटून घ्यावी लाटताना उलटू नये.
7. कडेला दूध लावून सारण भरून घ्यावे. ही करंजी कापू नये.
8. गरम तेलामध्ये गुलाबी रंगावर तळावी.
9. आपली पुडाची करंजी तैयार !
कशी आहे रेसिपी? आवडली ना..!
मग तुम्ही ही बनवा आणि मला सांगा कशी झाली करंजी..!
सौ. सुचिता मिलिंद वाडेकर, पुणे.
0 टिप्पण्या