#१००शब्दांची_गोष्ट(विजेती कथा)
'आनंदी सरिता...!'
'आनंद' 25 वर्षांचा झाला पण बुद्धीने अगदी लहान बाळासारखा होता. दोन महिन्यांचा असताना तापाचे निमित्त झाले अन मेंदूची वाढच खुंटली.
खूप उपाय केले... यश आले नाही. तेव्हापासून सरिता आणि सासूबाईच करायच्या त्याचं सगळं.
खाणं-पिणं, शी-शू, फिरवून आणणं.. सगळं काही... तरीही सरिता नेहमी आनंदी असायची. दुःखाची पुसटशी रेषाही नव्हती तिच्या चेहऱ्यावर.
मी, "कसं जमतं गं तुला आनंदी रहायचं...?"
"ताई, जे वाट्याला आलंय त्याचा स्वीकार मी 25 वर्षांपूर्वीच केलाय. तेव्हाच मनाशी ठरवलं.. कधीही तक्रार करायची नाही, रडगाणं गायचं नाही.."
"आपण जे दुसर्यांना देतो तेच फिरून आपल्याकडे येत असते.. मग ते प्रेम असो, आनंद असो वा दुःख..."
"आणि हेच माझ्या आनंदी असण्याचं कारण आहे."
©सौ. सुचिता वाडेकर... ✍
'आनंदी सरिता' या माझ्या कथेविषयी बोलते..
मॉमस्प्रेसो या मराठी प्लॅटफॉर्मवर '#१००शब्दांचीगोष्ट' ही स्पर्धा घेतली जात असे. दर सोमवारी एक विषय दिला जायचा.. त्यावर १०० शब्दात लेखिकेने आपले विचार कथेतून व्यक्त करायचे असत. आठवडायच्या शेवटी याचा रिझल्ट लागायचा. आलेल्या कथानमधून पाच विजेत्या कथा निवडल्या जायच्या. अशाच एका स्पर्धेत माझ्या या कथेला विजेते पारितोषिक मिळाले होते. ती कथा आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेय.
#१००शब्दांमधून माझे विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या कथेमधून नेमकं काय सांगायचं आहे याचा तुम्हाला कथा वाचून अंदाज आला असेलच. तरीसुद्धा ही कथा लिहिण्यामागचा माझा दृष्टीकोन इथे मला नमूद करावासा वाटतो.. तो पुढीलप्रमाणे.. ⤵️
सरिता म्हणजे नदी आणि या नदीच्या प्रवाहाप्रमाणे प्रत्येकाने पुढे गेले पाहिजे. पाणी जर वाहिले नाही, ते साचून राहिले तर त्याचे डबके तयार होते आणि कालांतराने त्यात डासांची पैदास होते जी हानिकारक असते.
मानवी मन देखील असेच असते. या गोष्टीतील सरिताला देखील हेच सांगायचे आहे... दुःख हे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असते; पण त्याचा स्वीकार होणं महत्वाचं आहे. एकदा का तो केलात की त्या दुःखाचा सामना करण्याची शक्ती आपल्याला आपोआप मिळते.
आपण कितीतरी अशा सरिता बघतो ज्यांची मुले मतिमंद आहेत. त्या अविरत झगडताना दिसतात. त्यांना हि शक्ती मिळते कुठून..? तर ती असते त्यांच्या विचारात.
तुमचे विचार सकारात्मक असतील तर कितीही कठीण प्रसंग आला तरी तुम्ही त्यावर मात करू शकता आणि निसर्ग नियम देखील हेच सांगतो.
आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याला परत मिळते.. मग ते प्रेम असो, आनंद असो वा दुःख.
त्यामुळे तीच्या चेहऱ्यावर दुःखाची साधी रेषाही नाहीये... अशा सर्व स्त्रिया आनंदी सरिता आहेत.
तुम्ही देखील पहिल्या असतील ना अशा आनंदी सरिता..!
मग मला कमेंट करून नक्की कळवा.
धन्यवाद..! 🙏🏻
©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻
0 टिप्पण्या