संत बहिणाबाई चौधरी : "हृदयाचा हृदयाशी संवाद" याचे धावते समालोचन..."

 "हृदयाचा हृदयाशी संवाद" याचे धावते समालोचन..."

©सौ. सुचिता वाडेकर... ✍️


• पाच महिन्यापूर्वीची गोष्ट..

महिलादिनाचे औचित्य साधून १३ मार्च २०२० रोजी एसपीज योग स्टुडिओचे सर्वेसर्व्हा आ. सचिन पारूंडेकर सर यांनी धनलक्ष्मी क्रीडासंकुल आनंद नगर येथे "आनंदी जीवनाचा संजीवक मंत्र" -  डॉ. सौ. आरती दातार यांचा हृदयाचा हृदयाशी संवाद आयोजित केला होता त्याचे धावते समालोचन.



"संत बहिणाबाई चौधरी" या कवयित्रीने आपल्या ओव्यातून सांगितलेला" आनंदी जीवनाचा संजीवक मंत्र" याचे सुंदर विवेचन डॉ. सौ. आरती दातार यांच्या मुखातून ऐकताना मन आणि कान अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले.

Get together : एक अनोखे गेट टुगेदर

बहिणाबाईंच्या या ओव्या म्हणजे सुखी जीवनाचे सार आहे... सध्या सोप्या शब्दात त्यांनी मानवाच्या मनाचे सुंदर वर्णन केले आहे. ओवीचा अर्थ, त्यामागील भावना आणि मग ती ओवी आरती मॅडमच्या तोंडून ऐकताना त्या ओवीतून खऱ्या अर्थाने बहिणाबाई सर्वांपर्यंत पोहोचत होत्या.


• डॉ. सौ. आरती दातार आणि डॉ. अरुण दातार सर यांच्या बद्दल थोडंसं...

नुकतंच मी आरती ताईंचे "शून्यातून सूर्याकडे" हे अरुण सरांच्या आणि त्यांच्या खडतर जीवनप्रवासाचे आणि सुंदर सहजीवनाचे  पुस्तक वाचले. हे पुस्तक वाचताना प्रत्येक घटनेची मी देखील साक्षी आहे असेच वाचताना मला वाटत होते. हे पुस्तक वाचताना सहजीवनाचा खरा अर्थ मला कळला पण तरीही मनात काही प्रश्न निर्माण झाले होते... त्याची उत्तरे मला काल आरती ताईंनी केलेल्या  'हृदयाचा हृदयाशी संवाद' यातून मिळाली. 

Suryanamaskar : सूर्यनमस्कारांचे महत्व

 या पुस्तकाचे परीक्षण लवकरच तुमच्यापुढे सादर करीन.. मात्र इथे मला अरुण सरांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो कारण आज महिलादिनानिमित्त ठरवलेल्या या व्याख्यानाला अरुण सरही सोबत होते मात्र श्रोतावर्गात पुरुषांची उपस्थिती खूप अल्प असल्याचे जाणवले.. कदाचित प्रत्येकाची काही करणं असू असतील की त्यांना अनुपस्थित रहावे लागले.


सावली जशी सतत आपल्या सोबत असते त्याप्रमाणे हे दोघेही  एकमेकांची सावली आहेत हे कृतीतून अरुण सरांनी दाखवून दिले. एक पती असूनदेखील आपल्या पत्नीचे एक मित्र, सहचर बनून तिच्या प्रत्येक कार्यात तिच्यासोबत राहून त्यांना त्यांच्या आवडीचे काम करण्याची मुभा त्यांनी दिली हि खरं तर खूप खूप कौतुकाची बाब आहे.


आता येऊयात बहिनाबाईंकडे जीची ओळख खऱ्या अर्थाने आरती ताईंनी काल करून दिली. खरे तर सारं अभ्यासाचा एक भाग म्हणून अभ्यासलं होतं आणि तितक्याच सहजपणे ते विसरलं देखील होतं. पण काल आरती ताईंनी त्यावरील मळभ दूर केलं आणि आणि त्यांच्या सुंदर सहजीवनाचं रहस्य उलगडलं. खूप खूप धन्यवाद आरती ताई...😊


टाळी जशी एका हाताने वाजत नाही तसेच सहजीवन देखील एकमेकांच्या डोळस साथी शिवाय अपूर्ण आहे. आयुष्यात सुख दुःखे तर येतच राहणार.. त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असायला हवा... आणि त्याचबरोबर त्याचा स्वीकार देखील व्हायला हवा हेदेखील तितकेच महत्वाचे आहे असे आरती ताईंनी सांगितले.


त्या पुढे म्हणाल्या की त्यांना आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगाला... त्यातून बाहेर पडण्याला.. आणि एवढं सारं स्थीत्यनंतर होऊन देखील मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी जी खरी ताकद मिळाली ती या बहिणाबाईंच्या ओव्यांमुळे. काल बहिणाबाईंच्या ओव्यांची नव्याने ओळख झाली आणि खरी ताकद समजली. 


• थोडंसं बहिणाबाईंविषयी...



बहिणाबाईंचा जन्म असोदे ह्या गावी नागपंचमीच्या दिवशी म्हणजे ११ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडिलांचे नाव उखाजी महाजन होते. त्यांचे एकत्र कुटुंब होते... त्यांची स्वतःची भावंड... काकांची कुटुंब... विधवा आत्या.. त्यांची मुलं असं जवळजवळ ३०-३५ लोकांचं एकत्र कुटुंब होतं. त्यानी वयाच्या तिसऱ्या वर्षी स्वतः च्या आईविषयी काव्य केलं आणि वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांवर काव्य केले. बहिणाबाईंचे महेरचे नांव लाडली होते तर लग्नानंतर त्या बहिणाबाई चौधरी झाल्या. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.


बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता(रचना) काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपाण्याने (कविवर्य सोपानदेव चौधरी) यांनी बहिणाबाई बोलत असता टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांच्या सरोदे ता गावी ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या तरीही त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती.


शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे ओव्या व कविता रचून त्या गात असत. सोपानदेव चौधरी ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे त्या उतरून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबाईंची बोलीभाषा अहिराणी होती.. त्या भाषेतच त्या ओव्या रचत.


बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती... आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले अन भीतभीतच ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे स्वभावाप्रमाणे खोचक बोलले पण त्यांनी एक कविता वाचून दाखवायला परवानगी दिली. ती कविता ऐकल्यावर अत्रे जे मंत्रमुग्ध झाले की त्यांनी सोपानदेवांच्या हातून ते लिखित खेचून घेतले आणि अर्ध्या तासात आधाशा सारखे वाचून काढले.


त्यावेळी अत्र्यांच्या तोंडून उद्‌गार बाहेर पडले... “अहो हे तर बावनकशी सोनं आहे, हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे” आणि अत्र्यांनी त्या सर्व कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. त्याला त्यांनी  प्रस्तावनाही दिली..


अशाप्रकारे बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली अन बहिणाबाईंचे काव्य लोकांसमोर आले.


अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान बहिणाबाईंनी आपल्या काव्यातून व्यक्त केलेय आणि हे सोपेपण आरती ताईंनी अगदी अलगदपणे उघडून सर्वांसमोर मांडले.


बहिणाबाई स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग – या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती आणि तीच त्यांच्या काव्यातून दिसून येते.


तल्लख स्मरणशक्ती.. सूक्ष्म निरीक्षण आणि सरस्वतीची साथ त्यांना जन्मजात मिळालेली देणगी होती. जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहण्याचे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान त्यांच्या कवितांमधून पहायला मिळते. कमीत कमी शब्दात उच्च अर्थाची कमाल उंची गाठणारे शब्द हे त्यांच्या कवितेचे वैशिष्टय आहे.


बहिणाबाईंच्या काही ओव्यांचे विवेचन जे आरती मॅडमनी संवाद साधताना केले ते आपल्यासमोर मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न केलाय...  


१. बहिणाबाईंची ‘अरे खोप्यामधी खोपा’ ही प्रसिद्ध कविता.. यात एक आई आपल्या पिलांसाठी काय काय करते ते या कवितेत उत्तमरित्या रेखाटलं आहे. सुगरणीच्या खोप्याचं उदाहरण देऊन बहिणाबाई माणसांना सुंदर संदेश देऊन जातात.



"अरे खोप्यामधी खोपा

सुगरणीचा चांगला,

देखा पिलासाठी तिन

झोका झाडाले टांगला"

शेवटच्या कडव्यात बहिणाबाई सांगतात... तिची चोच उलूशीच आहे, दात हि तेच आणि ओठही तेच आहेत.. तरी ती एकाग्र चित्ताने आपले काम करते... तुला मात्र देवाने या तोंडाबरोबर दोन हात आणि त्याला दहा बोटं दिलीत 



"तिची उलीशीच चोच

तेच दात, तेच ओठ

तुला देले रे देवान

दोन हात दहा बोट" 


२. 'मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर' ही बहिणाबाईंची सुप्रसिद्ध कविता... अनेक पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला होता. माणसाचं मन किती चंचल आहे हे त्यांनी या ओवीतून सांगितले आहे... पिकातलं ढोरं ज्याप्रमाणे त्याला कितीही हाकलले तरी ते फिरून फिकमध्ये घुसते त्याप्रमाणे माणसाचे मन असते.. शेवटच्या कडव्यातून त्या देवाला प्रश्न विचारतात असं कसं रे मन देवा.. जागेपणी तुला असलं कसलं स्वप्न पडलं..


मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । 

किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । 

कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥


३.'अरे संसार संसार' बहिणाबाईंची ही कविता अजरामर कविता आजही लोकांच्या मनावर राज्य करते.


"अरे संसार संसार

जसा तवा चुल्ह्यावर,

आधी हाताला चटके

तव्हां मियते(मिळते) भाकर"


४. कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसते.. जन्माला येताना श्वास येतो आणि मृत्यू होतो तेव्हा श्वास जातो.. जगणं मरण हे एका श्वासच अंतर आहे.. भगवंता हि सारी तुझीच लीला आहे.


"आला सास गेला सास 

जीवा तुझं रे तंतर,

अरे जगनं-मरनं 

एका सासाचं अंतर!"


"अरे संसार संसार

आधी देवाचा ईसार,

माझ्या दैवाचा जोजार

मग जीवाचा आधार!"


६.‘माझी माय सरसोती’  ही बहिणाबाईंची प्रसिद्ध कविता. या कवितेत अशिक्षित स्त्रीची भावना मांडली आहे. त्या स्वतः अशिक्षित म्हणजे त्यांना लिहिता येत नव्हते तरीही त्यांनी कितीतरी कविता करून त्यातून जीवनाचे सार सांगितले आहे. याची करता करविता सरस्वती आहे.. तिनेच माझ्या तोंडात हि गुपितं पेरली आहेत. किती सुंदर विचार केलाय बहिणाबाईंनी... यात कुठेही मी पणा, अहंकार नाही. मी निमित्तमात्र असून करती करविती सरस्वती माझी माय आहे असेच त्या सांगतात.


"माझी माय सरसोती

माले शिकवते बोली

लेक बहिनीच्या मनी

किती गुपितं पेरली"


७. लेकीला महेर मिळावे म्हणून माय सासरी नांदते... किती अर्थपूर्ण विचार केलाय बहिणाबाईंनी.


"लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते"


यासारख्या छोट्या छोट्या ओव्यात देखील बहिणाबाईंनी किती अर्थपूर्ण अर्थ भरलाय याची ओळख आरती मॅडमनी करून दिली. बहिनाबाईं सारख्या निरक्षर स्त्रीने त्या काळात देखील किती उच्च विचार केला हे ऐकताना बहिणाबाईंचे साहित्य वाचण्याची ओढ प्रत्येकाच्या मनी लागून राहिली.. हे खरं तर या आयोजिलेल्या सत्राचे यश म्हणावे लागेल.


जवळ जवळ दोन तास हे ऐकताना वेळचे भान हरपून जणू हा कार्यक्रम इतक्यात संपू नये असेच तेथे उपस्थितांना वाटत होते.


कार्यक्रमाचा समारोप करताना श्रोत्यांच्या मनातील भाव ओळखून सचिन सरांनी डॉ. आरती मॅडम कडून पुन्हा संवाद साधण्याचे आश्वासन घेतले आणि रसपाणाने कार्यक्रमाची सांगता झाली.


डॉ. सौ. आरती दातार यांनी केलेले बहिणाबाईंच्या ओव्यांचे सुंदर विवेचन शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केलाय...आवडल्यास जरूर प्रतिक्रिया द्या.


धन्यवाद 🙏🙏

©सौ. सुचिता वाडेकर... ✍️


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

मनोगत म्हणाले…
धन्यवाद! 🙏
आवश्य..🙏