Importance of Suryanamaskar : सूर्यनमस्कारांचे महत्व

"सूर्यनमस्कार महायज्ञाचे शब्दरूपी चलचित्र" आणि "सूर्यनमस्कारांचे महत्व..."


©सौ. सुचिता वाडेकर... ✍️
18.02.2020






दरवर्षी रथसप्तमीला जागतिक सूर्यनमस्कार दिवस साज केला जातो. त्यानिमित्त एस्. पी. योग स्टुडिओज् ने शनिवार दि.१५ फेब्रु. संध्याकाळी साडेसहा ते रविवार दि.१६ फेब्रु. संध्याकाळी साडेसहा या वेळेत सूर्यनमस्कार महायज्ञ(सुर्योथॉन)चे आयोजन केले होते. या महायज्ञात बहुसंख्य योगप्रेमींनी सहभागी होऊन हा महायज्ञ यशस्वी पार पाडला. या महायज्ञात माझा देखील खारीचा वाटा होता याचा मला निश्चितच आनंद आहे.

एस्. पी. योग स्टुडिओज् म्हणजे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या साधनेची तपस्या. एस्. पी. योग स्टुडिओज् या संस्थेची स्थापना ६ जून २००६ रोजी श्री. सचिन पारूंडेकर सर यांनी केली. सचिन सर स्वतः मेकॅनिकल इंजिनिअर असून योगामध्ये गोडी निर्माण झाल्यामुळे ते इकडे वळले आणि त्यांनी योगशिक्षक हि पदवी संपादन केली. 

योगासन स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे व पदके त्यांनी मिळवली. १९९५ पासून ते या क्षेत्रात कार्य करतात.  २००२ पासून सिंहगडरोड पुणे येथे त्यांनी योगाचे क्लासेस सुरु केले... याला २०१८ साली १६ वर्षे पूर्ण झाली. सचिन सरांनी आजपर्यंत १२,००,०००(बारा लाख) पेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

◆ सूर्यनमस्काराचे महत्व...

उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्काराचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रात सूर्याची वेगवेगळी नावे आहेत व त्या प्रत्येक मंत्राचा शरीरातील सप्तचक्रापैकी अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, स्वाधिष्ठान चक्र, आज्ञा चक्र, मणिपूर चक्र यांच्याशी संबंध असल्यामुळे आपल्या शरीरातील पेशी चांगल्याप्रकारे जागृत होऊन शरीरातील रक्त पुरवठा संपूर्ण शरीरभर संचार करतो... त्यामुळे आपले आजार बरे होतात व एकाचवेळी शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक शक्तीचा विकास होतो.

एक सूर्यनमस्कार घातला तर त्याचा परिणाम शरीरातील पेशी ९० दिवस व्यवस्थित कार्य करण्यासाठी मदत होते... शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. सूर्यनमस्कारामुळे मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कमरेचे स्नायू, मेरूदंड, पायाची बोटे, गुडघे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेली चरबी, ओटीपोटातील चरबी, थायरॉईड सारखे आजार, काही हाडांचे दोष, घशातील विकार नाहीसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबल वाढते, शुद्ध रक्ताचा संचार शरीरात सारख्या प्रमाणात होतो. सूर्यनमस्काराबरोबर पायी चालण्याचा व्यायाम, स्विमिंग, सायकलिंग केल्यास शरीर चांगल्याप्रकारे तंदुरुस्त राहते.

● सूर्यनमस्कारांचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचावे या हेतूने रथसप्तमीचे औचित्य साधून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सामुदायिक सूर्यनमस्कार घालण्याचा कार्यक्रम ते आयोजित करू लागले... त्याला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला. योगा क्लासेसला न येणारे देखील यात सहभागी होऊ लागले.

लोकांचा उत्साह पाहून या वर्षी त्यांनी सूर्यास्तापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत असा २४ तासांचा सुर्योथॉन उपक्रम राबवला आणि तो यशस्वीपणे संपन्न झाला. या उपक्रमाला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळ जवळ ४००च्या जवळपास योग प्रेमींनी यात सहभाग नोंदवला.

सूर्यास्तापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत २४ तासांच्या या उपक्रमात २६०० सूर्यनमस्कार घातले गेले. सहभागी प्रत्येक योग प्रेमीचे नमस्कार मोजले तर हा आकडा लाखाच्या घरात जाऊन पोहोचतो हि गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे.

या सुर्योथॉनमध्ये ५ वर्षाच्या मुलांपासून ते ७५ वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्व स्त्री पुरुषांचा समावेश होता. इथे आलेला प्रत्येकजण जास्तीत जस्त सूर्यनमस्कार घालण्याच्या प्रेरणेने भरलेला होता. कधीही सूर्यनमस्कार न घालणारे देखील उत्साहाने सूर्यनमस्कार घालत होते.

एक आनंददायी आणि मंगलमय वातावरणात सुर्योथॉन उपक्रम यशस्वी पणे पार पडला यात सचिन सरांसोबत त्यांना साथ देणारे त्यांचे अनुयायी यांचा सिंहाचा वाटा होता. सर्वजण अगदी आपल्या घरचे कार्य असल्याप्रमाणे आपापली जबाबदारी ओळखून स्वतःहून हा कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी झटत होते त्याबद्दल सर्वांचे खूप खूप कौतुक!

कोणतेही कार्य करीत असताना अडथळे हे येतच असतात परंतु तरीसुद्धा त्यावर मात करून जो पुढे जातो तोच खरा विजयी होतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. इथेही अगदी ऐनवेळी अडथळा आला... अगदी कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी कार्यक्रमाची जागा काही अपरिहार्य कारणामुळे बदलावी लागली...

त्यामुळे आलेले टेन्शन, नवीन जागा शोधण्यासाठी करावी लागलेली धावपळ, सर्वांना पुन्हा मेसेजेस पोहोचवणे, नवीन जागेचा पत्ता ऍड करून जागोजागी फ्लेेक्स लावणे... अशा बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला. पण म्हणतात ना...'जे होते ते चांगल्यासाठीच'.

नवीन जागाही खूप छान, प्रशस्त मिळाली... गेट मधून आत जाताच प्रसन्न वाटत होते... समोर गार्डन... बाजूला हिरवळ... मध्यभागी सूर्याच्या प्रतिमेला साजेसा गोल.. जणू या सुर्योथॉन कार्यक्रमासाठीच तयार केलाय की काय असा भासावा इतका समर्पक... भोवताली ऑडिटोरिअम सारख्या स्टेप्स आणि प्रशस्त हॉल पाहून 'जे होते ते चांगल्यासाठीच' याची खऱ्या अर्थाने प्रचिती आली आणि सर्वांची मने सुखावली. आमच्यातीलच काही हौशी योगप्रेमी महिलांनी सुबक रांगोळी काढून या कार्यक्रमाला चार चाँद लावले.. त्यांचेही खूप खूप कौतुक.

अडथळे अजून संपलेले नव्हते... कार्यक्रमाच्या उदघाटनाला बोलावलेले प्रमुख पाहुणे ऐनवेळी येऊ शकले नाहीत.. मग आमच्यातीलच जेष्ठ व्यक्तीच्या हस्ते उदघाटन करून कार्यक्रम वेळेत सुरु केला. बरोबर ७ वाजता प्रार्थना म्हणून सूर्यनमस्काराला सुरुवात केली. सूर्याची बारा नावे.. बारा मंत्र... बारा नमस्कार  असा एक सेट.

प्रत्येक नमस्कार मंत्र बोलून घालण्यात येत होता. त्यावेळचे मंगलमयी वातावरण खूप आनंदमयी, प्रसन्न आणि जोशपूर्ण होते. हॉल पूर्ण योगप्रेमींनी खच्चून भरला होता... शाळेत जाणारी मुले, महिला, जेष्ठ यांचा प्रामुख्याने समावेश होता. जसजसे नमस्कार होत होते तसतसे ब्लॅकबोर्ड वर त्याची मांडणी केली जाऊ लागली.

१२ नमस्काराचा एक १ सेट याप्रमाणे ५ सेट चा एक बंच तयार होऊ लागला आणि ९:३० वाजता ५ सेटचे ५ बंच म्हणजे २५ सेट्स(३०० सूर्यनमस्कार) पूर्ण झाले. रात्री १२:३० वाजता ५० सेट (६०० सूर्यनमस्कार) पूर्ण झाले. पहाटे ५ वाजता १०० सेट्स( १२०० सूर्यनमस्कार) पूर्ण झाले. रात्रभर चालणारे हे सूर्यनमस्काराचे पहिले सत्र पूर्ण झाले आणि सर्वांनी एकच जल्लोष केला.

सकाळी ६ नंतर मात्र बरेच बाहेरून आलेल्या योगप्रेमींनी हॉल खचाखच भरून गेला. तुडुंब गर्दी होती... नवीन लोकांसाठी आधीच्या लोकांनी ब्रेक घेऊन जागा उपलब्ध करून दिली. योगप्रेमींचे जाणे येणे चालूच होते... हॉल मात्र सदैव भरलेला होता.

पाच नमस्काराचा १ सेट पूर्ण झाल्यावर २ मिनिटांचा ब्रेक असे... त्यात पाणी, कधी लिंबू सरबत, कधी नारळ पाणी तर कधी कोकम सरबताचे वाटप केले जाई. हे सारे न थकता करणारेही सरांचे अनुयायीच.. ज्यांची सचिन सरांना खूप मोलाची साथ मिळाली. प्रत्येकजण उत्साहाने काम करत होता.

जसजसा दिवस पुढे जात होता तसतसा हळू हळू ब्लॅकबोर्ड नमस्काराच्या आकड्यांनी भरू लागला... आणि तो क्षण आला ज्या सेटमध्ये २००० नमस्कार पूर्ण होणार होते. सर्वजण खूप उत्साहात होते... उपस्थित टाळ्यांच्या गजरात सलामी देत होते... इप्सित ध्येय साधल्यावर होणाऱ्या आनंदाच्या काही क्षण आम्ही दूर होतो... मंत्र सांगताना आणि पाठीमागून तो म्हणताना नकळत सर्वांच्याच आवाजात जोश होता आणि तो क्षण आला... २००० वा नमस्कार पूर्ण झाला आणि हॉल टाळ्यांच्या गजारांनी दणाणून गेला.. सर्वांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.. आणि या क्षणाची मी देखील साक्षी होते याचा मला खूप खूप आनंद आहे.

हळू हळू हा आकडा वाढत जाऊन २३९९ वर येऊन ठेपला. सर्वांनाच खूप आनंद होत होता.

२४०० वा नमस्कार हॉल बाहेर असलेल्या सुर्यासमान दिसणाऱ्या गोला जवळ घातला गेला. गोलाभोवती पूर्ण वर्तुळाकार उभे राहून २४०० वा सूर्यनमस्कार घातला तो क्षण ड्रोणकॅमेराने टिपला गेला.

या कॅमेऱ्यातून टिपलेले चित्रीकरण म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदेव व त्याची किरणे धरतीवर अवतरली आहेत असेच भासवते आणि पाहणाऱ्याचे मन लुब्ध करून टाकते... त्याबद्दल हि व्यवस्था करणाऱ्यांचे खरोखरच मनापासून खूप कौतुक.

आता सायंकाळचे ६ वाजण्यास काही मिनिटांचा अवधी होता. एक चैतन्यमयी वातावरण हॉलमध्ये तयार झाले होते कारण २६०० नमस्कार पूर्ण होण्यासाठी आता फक्त एक नमस्कार बाकी होता... आणि तो क्षण आला टाळ्यांच्या गडगडाटात २६०० वा नमस्कार पूर्ण झाला... सगळीकडे नुसता आनंदाचा जल्लोष होता... प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. श्रम सार्थकी झाल्याचे समाधान सरांच्या चेहऱ्यावर होते.

एखादी गोष्ट तुम्ही मनापासून ठरवलीत की ती मिळवण्यासाठी सारी कायनात तुमच्या पाठीशी उभी राहते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा हा "सुर्योथॉन कार्यक्रम".

◆ आता या कार्यक्रमाच्या समारोपाचे हे शेवटचे सत्र....

सायंकाळी साडेसहा वाजता सुर्योथाॅन कार्यक्रमाचे सन्माननीय पाहूणे...
● आ. डाॅ. अरूण दातार सर
● आ. डाॅ .आरती दातार मॅम
● आ. डाॅ.दत्ता कोहिनकर सर
यांची उपस्थिती भारावून टाकणारी होती....

संत बहिणाबाई चौधरी : "हृदयाचा हृदयाशी संवाद" याचे धावते समालोचन..."

सायंकाळी सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

● कार्यक्रमाचे सूत्रसंचालन...
मंदार मुतालीक यांनी केले.
सरांचा आवाज बसल्यामुळे ते बोलू शकत नव्हते त्यामुळे... पारूंडेकर सरांचे मनोगत...
प्रबोध हर्डीकर यांनी वाचून दाखवले.

◆ यानंतर सन्माननीय पाहुण्यांची भाषणे झाली.

● आ. डाॅ. अरूण दातार सर... 
म्हणजे शून्यातून सूर्याकडे जाणारे व्यक्तिमत्व. 'नियतीचा फेरा ना चुकला कधी कुणाला' या उक्ती प्रमाणे नकळतपणे डोळ्यापुढे आलेल्या सक्तीच्या अंधारावर विजय मिळवत प्रकाशाकडे गरुडझेप घेणं म्हणजे काय असतं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डाॅ. अरूण दातार सर आणि या संकटात त्यांची सावली बनून राहिलेली त्यांची अर्धांगिनी... आ. डाॅ. सौ. आरती दातार मॅम यांचे मोलाचे मार्गदशन सर्व उपस्थितांना लाभले. या उपक्रमात डाॅ. अरूण दातार सरांचे मार्गदर्शन वेळोवेळी सचिन सरांना होत होते.

● आपले तिसरे सन्माननीय पाहुणे आ. डाॅ.दत्ता कोहिनकर सर.. 

आपण सर्वजन यांना ओळखतो. व्यायामासोबत मनाची मशागत सुद्धा आवश्यक आहे. तुमचे मन स्थिर असेल तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सकारात्मक विचार करू शकता आणि त्यासाठी ध्यानधारणा देखील आवश्यक आहे. स्वतःला सकारात्मक स्वयं सूचना देण्याची गरज आहे... आणि वेळोवेळी तुम्ही त्या स्वतःला द्या असे त्यांनी सांगितले... त्यासंदर्भतील काही प्रात्यक्षिक देखील त्यांनी दाखवली.

अशा या असामान्य विचारवंतांचे लाखमोलाचे  मार्गदर्शन उपस्थितांची मने जिंकून गेली.

◆ आता शेवटचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या सूर्यनमस्कार महायज्ञामध्ये अव्याहतपणे आपापली आहूती देण्यासाठी सहभागी झालेल्या आणि जास्तीजास्त सूर्यनमस्कार घालून सर्वांपुढे आदर्श ठेवणाऱ्या योगप्रेमींचा सत्कार करण्याचा क्षण...

चोवीस तासात २६०० सूर्यनमस्कार पूर्ण झाले..मुलांपासून ते आजोबांपर्यंत जवळ जवळ ४०० लोकांनी यात भाग घेतला. 

प्रत्येकाचे नमस्कार मोजले तर हा आकडा बराच मोठा होईल. यासर्वांचे कौतुक करून जास्तीत जास्त लोकांनी व्यायामकडे वळावे आणि आपले आरोग्य संपन्न करण्यासाठी अनेकांना प्रेरणा मिळावी या हेतूने काही बक्षिसांचे आयोजन केले गेले. बक्षीस म्हणून मेडल्स, ट्रॉफीचे आयोजन केले गेले.

● या महायज्ञामध्ये २०० पेक्षा जास्त सुर्यमस्कार घालणाऱ्या प्रत्येकाला मा. सन्माननीय पाहुण्यांकडून मेडल्स, ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.

या महायज्ञामध्ये महिलांमध्ये सर्वात जास्त सूर्यनमस्कार घालणारी विजेती आहे...

● सौ. स्वप्ना उमेश आहेरवाडीकर...
 २४ तासात १८०० सूर्यनमस्कार 

आणि या महायज्ञामध्ये पुरुषांमध्ये सर्वात जास्त सूर्यनमस्कार घालणारे विजेते आहेत...

 श्री. अनिल रायकर
 २४ तासात २०१८ सूर्यनमस्कार 

● शाळेत जाणाऱ्या छोट्या छोट्या मुलांनी देखील १०० सूर्यनमस्कार लीलया पूर्ण केले. बऱ्याच जणांनी आणि जणींनी २००, २५०,३००, ३५०, ४००, ५००, ६००, ७००, ८००, १०००, ११०० असे सलग सूर्यनमस्कार घातले त्या सर्वांचे खूप खूप कौतुक आणि ३६० सूर्यनमस्कार घालून या कार्यक्रमाचा मी देखील एक भाग बनले याचा मला निश्चितच आनंद आहे...

● पुढच्या वर्षी रथसप्तमीला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड करण्याचा व त्यासाठी सहा महिने आधीपासून प्रयत्न करण्याचा निश्चय करून या कार्यक्रमाची सांगता झाली.

•  कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 


धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️
18.02.2020 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या