Review Marathi Chitrapat : "बाई पण भारी देवा"




 'बाई पण भारी देवा'

#चित्रपट_समीक्षा


केदार शिंदे दिग्दर्शीत 'बाई पण भारी देवा' हा मराठी चित्रपट शुक्रवार दिनांक 30 जून रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याचा योग आला. चित्रपटगृहामध्ये पोहोचलो त्यावेळी नुकताच चित्रपट सुरु झाला होता. चित्रपटगृह सर्व बायकांनी तुडुंब भरले होते. चित्रपटगृहातील सर्व बायकांना तो आपलासा वाटत होता कारण एखादी गोष्ट पटली की लगेचच टाळ्या पडत होत्या आणि हास्याचे कारंजे उडत होते. यात मी देखील होते. एकंदरीतच वातावरण खुप प्रफुल्ल झाले होते.


या चित्रपटात रोहिणी हट्टनगडी, वदंना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री आहेत. या सहाजनींभोवती हा चित्रपट भिरतो. मध्यमवयीन स्त्रीच्या आयुष्याचे चित्र, तिचा जीवनप्रवास, या प्रवासात तिला येणाऱ्या अडचणी, त्यावर तिने केलेली मात, बायका बायकांमधील हेवे-दावे, स्त्रीच्या आयुष्यात येणारी स्थित्यंतरे मग ती शारीरिक असो वा मानसिक याचं प्रभावी चित्रण या चित्रपटात केल्याचे दिसून येते.


स्त्रीला नेहमी गृहीत धरलं जातं, मग ती स्त्री नोकरी करणारी असो वा गृहिणी, बारीक असो वा जाड, तरुण असो वा वयस्क. तिच्या भावभावनांचा जराही विचार केला जात नाही पण तरीसुद्धा ती आपल्या घरासाठी, संसारासाठी, घरातील प्रत्येकासाठी स्वतःच मन मारून सर्वकाही करत असते. जणू इतरांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचे ती विसरूनच जाते. अशा अनेक स्त्रियांचं प्रतिनिधित्व या सहाजणी करतात आणि म्हणूनच हा चित्रपट बघणाऱ्या प्रत्येकीला आपलासा वाटतो.



एका स्पर्धेच्या निमित्ताने या सहाजणी एकत्र येतात; यामागे प्रत्यकीचा काही ना काही स्वार्थ असतो, असाह्यता असते. इथे प्रत्येकीचं काही ना काही दुःख असतं, कोणाला कोणाची तरी जिरवायची असते तर कोणाला पैशांची गरज असते, कोणाला स्वतःची आवड जोपासता न आल्यामुळे ती पुरी करण्यासाठी या स्पर्धेत भाग घ्यायचा असतो तर कोणाला स्वावलंबी होण्यासाठी नवऱ्याच्या जीवावर अवलंबून न राहण्यासाठी या स्पर्धेत भाग घ्यायचा असतो. अशाप्रकारे प्रत्येकीची काही ना काही कारणं असतात.


एकमेकींविषयी मनामध्ये राग, द्वेष असला तरी स्पर्धा जिंकण्यासाठी त्या एकत्र येऊन तयारी करतात. हा सारा प्रवास लेखकाने आणि दिग्दर्शकाने अत्यंत सुंदर पद्धतीने मांडला आहे. छायाचित्रण अतिशय उत्तम आहे. प्रत्येकीचा अभिनय अगदी तोडीस तोड आहे. या साही जणींनी या चित्रपटात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मेकअप, वेशभूषा अतिशय सुंदर झाली आहे. या सहाजणी तर अतिशय सुंदर दिसतात. चित्रपटातील 'बाईपण भारी देवा' हे शीर्षक गीत उत्तम झाले आहे. या सर्व गोष्टींमुळे हा चित्रपट यशाची पहिली पायरी सहज पार करतो. 


या चित्रपटात नात्यातील भावनिक आंदोलने खुप समर्पक पद्धतीने दाखवली गेली आहेत. या सहाजणी बहिणी असून देखील यांच्यामध्येही हेवे-दावे, दुस्वास असतो. भूतकाळात घडलेल्या काही घटनामुळे त्याच्या मनात एकमेकींविषयी अढी असते, राग असतो. प्रत्यक्ष जीवनात देखील प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात काही ना काही असे प्रसंग घडलेले असतात की ज्यामुळे एखादी व्यक्ती समोर दिसली तरी आपल्या मनात राग येतो, डोक्यात तिडीक उठते. अगदी तसेच भाव या पात्रांच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होताना दिसतात. याचं चित्रण दिग्दर्शकाने अगदी खुबीने केल्याचे दिसून येते.



एखाद्या बद्दल जर मनात राग असेल, अढी असेल तर आपण त्या व्यक्तीला सहजासहजी माफ करू शकत नाही. अशावेळी मनसशास्त्रीय दृष्टया त्या व्यक्तीची सल भूतकाळात शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि ती सापडते देखील. अशावेळी त्या व्यक्तीला आपण मनापसून माफ केलं तर त्या व्यक्तीला पाहून आपल्याला होणाऱ्या त्रासातून आपली मुक्तता होऊ शकते हे मनसशास्त्रीय सत्य आहे. याचा या चित्रपटात खुबीने वापर केल्याचे दिसून येते. स्वतःची चुक समजल्यावर मनापासून त्या व्यक्तीची माफी मागणे आणि माफी मागितल्यावर त्या व्यक्तीला मनापसून माफ करणे हे जर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात केले तर कित्येक प्रश्न आपोआप निकालात निघतील.


आणखी एक मुद्दा मला महत्वाचा वाटतो तो म्हणजे मुलांच्या जीवनातील पालकांचा हस्तक्षेप. वाजवीपेक्षा जास्त  हस्तक्षेप मुलांना त्रासदायक ठरू शकतो हे मुलांवरील प्रेमाखातर पालकांच्या ते लक्षात येत नाही. आपला मुलगा किंवा मुलगी आपल्यापासून दुरावली जातेय या भीतीपोटी ते मुलांच्या संसारात अधिक लक्ष घालतात आणि इथेच चुकतात. मुलांना ज्यावेळी मानसिक आधाराची खरी गरज असते त्यावेळी ती ओळखून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहता आले पाहिजे.


थोडक्यात काय तर चाळीशी नंतरच्या जीवनात स्त्रीच्या जीवनात जी स्थित्यंतरे येतात मेनोपॉज, मुलांची लग्न, जावयी किंवा सुनेचं घरातील आगमन याचा स्त्रीच्या मानसिक आरोग्यावर खुप मोठा परिणाम होत असतो. अशावेळी तिलादेखील समजून घ्यायला हवे आहे. यासाठी प्रत्येक पुरुषाने देखील हा चित्रपट आवर्जून बघावा. स्त्रियांनी तर बघावाच बघावा कारण आपलं बाईपण भारी आहे हे प्रत्येकीला समजायला हवेय.



'नको गं हा बाईचा जन्म' असे म्हणणाऱ्या स्त्रिया हा चित्रपट बघितल्यावर पुन्हा असे बोलणार नाहीत उलट म्हणतील, "बाईपण भारी देवा, बाईपण भारी रे" आणि प्रत्येक पुरुषानेदेखील हा चित्रपट नक्की पहावा कारण घरातील स्त्रीला मग ती पत्नी असो, बहीण असो, मुलगी असो, वा सुन असो तिला समजून घेण्याचे कार्य तोच उत्तमप्रकारे करू शकतो किंबहुना त्यालाच ते करावे लागते. 


कशी वाटली समीक्षा..

आवडल्यास जरूर प्रतिक्रिया द्या.

तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.


धन्यवाद!

©सौ. सुचिता वाडेकर... ✍🏻️




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या