असं सासर सुरेख बाई
प्रेमाला उपमा नाही…
#निरोगीआईआनंदीकुटुंब
© सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️
फोटो : गुगल सौजन 🙏🏻 |
'कुमुद अगं आवरलं का..?' किती वेळ.
'हो हो आले... झालंच'. स्वयंपाकाची सगळी तयारी करून कुमुद पर्स घेऊन निघाली.
'अगं हे काय, अशीच येणार आहेस?'
'हो.. का काय झालं?'
'अगं कपडे तरी बदलायचेस..'
'अरे इथेच तर जायचेय... एवढ्यासाठी कशाला? परत आल्यावर स्वयंपाक पण करायचाय. सोहम पण भूक-भूक करेल आणि बाबांनासुद्धा लवकर लागते जेवायला...'
'बरं चल आता नाहीतर डॉक्टर जातील'.
कौशलने गाडी स्टार्ट केली.
(थोड्याच वेळात डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये..)
'डॉक्टर तुम्हीच सांगा आता हिला, हिने स्वतःची काळजी घ्यायला हवी की नाही'.
'अरे असं काय करतोस, घेतेच की काळजी...'
'डॉक्टर, या दिवसात हिने आनंदी असायला हवं ना... मग स्वतःकडे लक्ष नको का दयायला'.
'दिवसभर नुसती काम-काम... हीचं काम कधी संपतच नाही'. 'एक झालं की दुसरं हजर, मग स्वतःसाठी वेळ कुठे मिळतो'. 'याचा परिणाम येणाऱ्या बाळावर होईल की नाही'.
'आताही व्यवस्थित आवरून यायचं तर तशीच आली... इथेच तर जायचे म्हणे'.
डॉक्टरांना कौशलचे प्रेम कळत होते आणि कुमुद्चा हलगर्जीपणादेखील...
'हो अर्थातच'. 'स्वतःकडे लक्ष हे द्यायला हवंच'.
'हो डॉक्टर, मला कळतय सगळं पण काय करू कामच संपत नाहीत'. 'माझा दिवस कसा जातो कळतच नाही आणि मग स्वतःसाठी वेळ द्यायला कंटाळा येतो'.
My Mother in law : माझ्या सासूबाई
'सगळी जबाबदारी माझी स्वतःचीच आहे हे समजून तुम्ही काम करताय ते आधी थांबवा बरं!'... 'आणि तुम्ही दोघांनी कामं वाटून घ्या'.
'बाहेरची जी काम आहेत ती तुमच्या ऑफिसच्या वेळा सांभाळून कौशल तुम्ही करु शकता..., आणि घरकामासाठी बाई लावली तर तो वेळ कुमुद तुम्हाला स्वतःसाठी देता येईल'.
'आणि यांची औषधं, खाणंपिणं नीट वेळच्यावेळी होतय का हे पाहण्याची जबाबदारी तुमची आहे कौशल'.
'या दिवसात तुम्ही कसं आनंदी, प्रसन्न रहायला हवं..., आई निरोगी व आनंदी असेल तर तिचे बाळही निरोगी होते आणि पर्यायाने सर्व कुटूंब देखील आनंदी राहते'. 'यासाठी तरी तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायला हवं'.
'हो डॉक्टर, मी नक्की प्रयत्न करेन'.
(घरी आल्यावर सासरे कुमुदच्या हातात एक कागद देतात... यादीच म्हणाणं हवं तर)
'काय आहे हे बाबा, हा कागद कसला आणि काय लिहिलंय यात...'
'वाच मग कळेल तुला'.
My first Scooty Sawarii : माझी पहिली स्कुटी वारी
कुमुद कागद वाचू लागते...
१. उद्यापासून रोज सकाळी कमला फरशी सोबत धुनं-भांडीही करेल... माझे फोनवर तिच्याशी बोलणे झालेय.
२. पोळ्यांसाठी आणि भाजी निवडणे, चिरणे व वरील इतर मदतीसाठी शेजारी येणाऱ्या काळे मावशींशी माझे बोलणे झालेय, उद्यापासून त्या रोज पोळ्या व इतर तयारी करून देतील. भाजी मात्र तूच बनव... तुझ्या हाताला अगदी हिच्या हातासारखी चव आहे.
३. किराणा सामानाची यादी माझ्याकडे देत जा, मी ती फिरायला जातो तेव्हा देत जाईन.
४. भाजी, फळं काय आणायची याचीही लिस्ट मला देत जा म्हणजे फिरून येताना मी ती घेऊन येईन. मला आवड आहे गं... तू नसताना हिला देखील मीच भाजी आणून द्यायचो.
५. सोहमला खाली बागेत खेळायला घेऊन जाण्याची जबाबदारी माझी. त्याचा अभ्यास मात्र तू घेत जा.
६. कधी कमला येणार नसेल त्यावेळी काळे मावशींनी तिच्या कामाची जबाबदारी घेतलीय आणि काळे मावशी येणार नसतील तेव्हा कुलकर्णी काकूंच्या मेसमधून गरमागरम डब्बा आणण्याची जबाबदारी माझी.
७. कौशलची बँकेची कामं मी करीत जाईन... मोकळा तर असतो तेवढाच वेळ जाईल माझा.
८. सर्वात महत्वाचे तू तुझ्या तब्बेतीची काळजी घ्यायची आणि आनंदी रहायचे. तू आनंदी दिसली की घर कसं आनंदी वाटतं... भरल्यासारखं वाटतं.
९. तुझी सासूबाई असती तर तिनेही हेच केले असते... आता ती नाही म्हणून तिची जबाबदारी माझी.. इतकंच आणि मी ती आनंदाने स्वतःहून स्वीकारली आहे त्यामुळे मनात कसलाही संकोच धरू नकोस.
१०. सगळ्यात महत्वाचे म्हणजे लवकरात लवकर गर्भसंस्कार शिबीर अटेंड कर... म्हणजे तुझे मन रमेल.. चार मैत्रिणी मिळतील आणि या रामगाड्यातून काही तास तरी तुझी सुटका होईल.
११. मला माहित आहे की तुझी हि दुसरी वेळ आहे पण तरीही तू स्वतःची काळजी घ्यायला हवीस आणि आनंदी रहायला हवंस... कारण तो तुझ्या येणाऱ्या बाळाचा हक्कच आहे.
१२. हि असती तर तिनेही हेच केले असते... बाबा म्हणतेस ना मला.. मग एक सासरा म्हणून नाही तर तुझा बाप बनून सांगतोय पोरी... करशील एवढं!
वाचता वाचता कुमुद्चा कंठ दाटून आला... तिचे दोन्ही डोळे वाहू लागले. तिच्या लहानपणीच तिचे बाबा गेले होते आणि लग्नानंतर आई.. त्यामुळे आई-वडिलांच्या प्रेमाला परखी झाली होती कुमुद. पहिल्या बाळंतपणात सासूबाईंनीच अगदी आईसारखं तिचं सगळं केलं होतं.
कौशलने तिच्या पाठीवर थोपटल आणि आज पासून सोहमची सगळी जबाबदारी माझी असं म्हणत तिचे अश्रू पुसले.
Parenting is a very big chalange to everyone : "पालकत्वाच्या प्रवासातील एक अवघड टप्पा" पौगांडावस्था
'ये वेडाबाई, आता असे रडायचे नाही तर आनंदी रहायचे, स्वतःकडे लक्ष द्यायचे, जेवण.. औषधं वेळच्यावेळी घ्यायची...' 'निरोगी आई असेल तर कुटूंबदेखील आनंदी होते...' समजलं!' 😊
• कशी वाटली कथा नक्की कळवा
• तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतेय…
• ब्लॉग आवडल्यास फॉलो करा.
• आणि कथा आवडली तर नावसाहित शेअर करा…
• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
खूप खूप धन्यवाद! 😊 🙏🙏
© सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️
0 टिप्पण्या