'माझी पहिली स्कुटी वारी'
#आठवण
11.03.2018
©सौ. सुचिता वाडेकर... ✍️
'शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं' किंवा 'जी ती गोष्ट ज्या त्या वयात होणं योग्य' अशी काही वाक्य आपण ऐकलेली असतात पण या वाक्यांचा वापर आपल्या बाबतीत होईल असे कधी वाटले नव्हते. काही वर्षांपूर्वीची गोष्ट....
आम्ही सिंहगडरोड येथे शिफ़्ट झालो होतो, घरापासून मार्केट प्लेस बऱ्यापैकी लांब होती, माझी मुलगी त्यावेळी एक वर्षाची होती त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या बाबांवर अवलंबून राहावे लागत होते. रिक्षाही मिळायच्या नाहीत आणि मिळाल्या तरी निम्मे अंतर चालू गेल्यावर, आणि उरलेल्या निंम्या अंतरासाठी कोणी रिक्षावाले यायला तयार व्हायचे नाहीत. शेवटी दोन वर्षांनी वैतागून आम्ही स्कुटी घेतली. तशी टू व्हीलर चालवण्याची मनातील सुप्त इच्छा पूर्ण होणार म्हणून मी मनातून खूप खुश होते पण तरीही मनात कुठेतरी धाकधूक होतीच.
लवकरच टू व्हीलर चालवायला शिकले आणि चालवू देखील लागले. मनातील आत्मविश्वास हळू हळू वाढू लागला. त्यानंतर महिन्याभरातच एके दिवशी कर्वे नगरला एका नातेवाईकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची वेळ आली. रिक्षाने जायचं की स्कुटीवर असा प्रश्न पडला कारण त्यावेळी 'आर्या' माझी मुलगी तेव्हा जवळ जवळ तीन वर्षांची होती म्हणजे तीन वर्षे पूर्ण व्हायला अजून एक महिना बाकी होता. शेवटी निश्चय केला आणि आर्याला घेऊन स्कुटीवरून निघाले. नातेवाईकांचा कार्यक्रम होता त्यामुळे साडी घातली होती. आर्याच्या सुरक्षिततेचा विचार करून तिला माझ्या पाठीमागे बसवून ओढणीने तिला आणि मला बांधून घेतले आणि आमची स्वारी निघाली.
आम्ही कार्यक्रम स्थळी सुखरूप पोहोचलो त्यामुळे खूप छान वाटले, आत्मविश्वासही बऱ्यापैकी वाढला. बऱ्याच जणांनी आधुनिक झाशीची राणी म्हणून कौतुकही केले त्यामुळे आत मनात कुठेतरी खूप छान वाटत होते. कार्यक्रम संपल्यावर पुन्हा आमची स्वारी जैयत तयारीनिशी निघाली. बऱ्याच जणांनी आमच्या्तील आधुनिक झाशीच्या राणीला कौतुकाने बाय बाय केले. थोड्याच अंतरावर एका चौकात टर्न घेताना एक छोटा टेम्पो आम्हाला पास होत पुढे जाताजाता त्याचा टच स्कुटी च्या हँडलला लागला आणि माझा बॅलन्स गेला.
पुढचा क्षणभर मला काही कळलंच नाही आणि कळले तेव्हा स्कुटी रस्त्यावर पडली होती, मी दोन्ही हात आणि गुडघे रस्त्यावर टेकलेल्या अवस्थेत, पाठीवर आर्या ओढणीने बांधलेल्या अवस्थेत, मला मात्र उठता येत नव्हते अशी अवस्था. पण आपल्यातले काही जागरूक नागरिक पटकन गाड्या होत्या तिथे थांबवून मदतीला आले; पण हात कसा लावायचा या संभ्रमात ते आहेत याची मला कल्पना आली आणि मी त्यांना सांगितले की तुम्ही माझ्या मुलीला पकडा, मी उठते आणि मग काहींनी माझ्या मुलीला पकडले आणि मी उठले, ओढणी सोडली आणि मुलीला प्रथम जवळ घेतले. तिला काही लागलं नव्हतं आणि मलाही फारसं लागलं नव्हतं फक्त हाताचे तळवे आणि गुडघ्यांना थोडं खरचटलं होतं.
योगायोगाने माझ्या मिस्टरांची फोर व्हीलर पुढेच होती आणि आरशातून त्यांनी घडलेला प्रकार बघितला. गाडी साईडला लावून ते तेथे आले तेव्हा कुठे हायसं वाटलं. मग त्यांनी आर्याला गाडीत घेतले आणि मी स्कुटी घेऊन घरी आले. त्यानंतर तब्बल आठ दिवस मी गाडीला हातही लावला नाही हे पाहून ते मला म्हणाले की आता तू माझे ५० हजार पाण्यात घालवणार. तेव्हा वाटले की बापरे! असे नाही होऊ द्यायचे आणि मनाचा हिय्या करून मी पुन्हा स्कुटी हातात घेतली ती आजतागायत.
आता माझी मुलगी 21 एप्रिलला 9 वर्षांची होईल. वयाच्या विशी - पंचविशीत गाडी चालवायला लागल्यावर मनात फारशी भीती नसते पण ठराविक वयानंतर म्हणजे वयाच्या तिशी - पस्तिशी नंतर हि भीती मनाचा ताबा घेते आणि आपल्यातील आत्मविश्वास हळू हळू कमी होऊ लागतो आणि या भीतीवरच मला विजय मिळवायचा होता आणि तो मी मिळवला देखील.
आता मात्र आम्ही दोघीही, कुठेही जाताना हेल्मेट मात्र जरूर घालतो.
• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का...
धन्यवाद ! 🙏
• आवडला का...
• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा.
• फॉलो करा.
• Suchita's Recipe या FB पेजला भेट द्या.. आवडल्यास Like करा... फॉलो करा.
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
11.03.2018
0 टिप्पण्या