Parenting is a very big chalange to everyone : "पालकत्वाच्या प्रवासातील एक अवघड टप्पा" पौगांडावस्था




"पालकत्वाच्या प्रवासातील एक अवघड टप्पा" पौगांडावस्था



आनंदी हेर्लेकर यांचा 'निमित्त प्रसंगाचे' हा लेख वाचण्यात आला. या लेखात तेरा-चौदा वर्षाच्या मुलीचे आणि तिच्या पालकांचे संवादाचे वर्णन आहे. या वयात मुलांच्या वागण्या बोलण्यात होणारे बदल आणि या बदलामुळे धास्तावलेले पालक यांच्या वागण्यातील विसंवाद आहे. तो प्रसंग थोडक्यात सांगते..



वेदिका सातवीत शिकते त्यादिवशी ती आरशासमोर उभी राहून केस विंचरत असते, सोबत गाणे गुणगुणणे चालू असते. केस बांधून पाहिले, मोकळे सोडून पाहिले, स्वतःला आरशात निरखून झाले.. हे सर्व तिची आई भाजी निवडता निवडता पहात असते. क्षणभर तिच्या मनात विचार येऊन जातो की किती पटकन मोठी झाली.. काल परवा पर्यंत वेणी घालून दे म्हणत मागे फिरणारी मुलगी आता मुळीच दाद देत नाही. कपडे, केस, मित्र मैत्रिणी तिच्याच विश्वात असते.



शेवटी ती टोकतेच की कुठे चालली गं नटूनथटून. त्यावर वेदिका उत्तरते की खेळायला चाललीय, नटून थटून कुठे..? केस तर विनचरतीये. खेळायला जाऊ नकोस, तू आता मोठी झाली आहेस मला कामात मदत कर असं आई तिला सांगते. त्यांचे शाब्दिक मतभेद होतात हे सर्व ऐकत असणारे बाबाही तिला ओरडतात पण शी.. कसा विचार करता तुम्ही म्हणत ती त्यांचे न ऐकता खेळायला जाऊ लागते तसे ते तिच्या पाठीत दणका देतात.



प्रसंग तसा साधाच.. बऱ्याचजणांच्या घरी पाहिलेला, अनुभवलेला पण या लेखाच्या शेवटी लेखिकेने काही प्रश्न मांडले आहेत.. जे पालक म्हणून आपणाला यावर निश्चितच विचार करायला लावणारे आहेत. 



•मुलीने कसे वागावे..?


•मुलीचे कोणते वागणे आई बाबांना आवडत नाही..?


•त्यामागचा त्यांचा विचार काय आहे..?


•संघर्षाचे मूळ कारण काय..?


•पालक आणि मुले यांच्यात मतभेदच नाहीत हे शक्य आहे का..?


•या मतभेदांना कसे हाताळावे, तुमची पद्धत काय आहे..?


•अशावेळी मार हा पर्याय असू शकेल का..?


•मुलांना सतत धाकात ठेवणे योग्य आहे का..?



या लेखावर माझे मत मला इथे मांडावेसे वाटते…⤵️


"पालकत्वाच्या प्रवासातील एक अवघड टप्पा"


तेरा चौदा वयाच्या मुलांचे पालकत्व हा पालकत्वाच्या प्रवासातील एक अवघड टप्पा समजला जातो. या वयात मुलांमध्ये होणारे शारीरिक आणि हार्मोनल बदल मुलांच्या वागण्या बोलण्यात बदल करत असतात त्यामुळे त्यांचे वागणे थोडे बदललेले असते. बऱ्याचदा पालक याला 'शिंगे फुटलीत' असं बोलताना ऐकलं असेल.. आणि यातूनच मुलांचे आणि पालकांचे वाद होताना दिसतात. मुलं ऐकत नाहीत म्हणून अनेकदा पालक मुलांवर हात देखील उचलतात. निदान मार दिल्याने तरी तो ऐकेल असे त्यांना वाटत असते.



खरं तर मार हा यावरचा उपाय निश्चितच नाही. आपण ज्या वातावरणात वाढलो त्या वातावरणाचा आपल्यावर असलेला पगडा, आपल्या बालपणात आपल्यावर झालेले संस्कार, याचा आणि वर्तमानातील मुलांचे वागणे यात आपण कुठेतरी गल्लत करतो आहोत असे वाटते.



पूर्वी आपण मोठ्यांनी सांगितलेलं ऐकत होतो.. भले ते पटले नाही तरी उलट प्रश्न कधी केले नाहीत पण आजची पिढी तशी नाहीये त्यांना प्रत्येक विरोधाला कारण द्यावे लागते.. आणि त्यांना ते पटेल असे दिले तर ते ऐकतात देखील. याबाबतीत पालकांचीच खुप कसोटी लागते.



Parenting : पालकत्व निभावताना... (भाग-१४) "समारोप"



मुळात खरं तर पालक म्हणून आपण अशावेळी आपल्या वडीलधाऱ्यांच्या भूमिकेत जातो आणि उगाच धस्तावून परिस्थिती आणखीनच बिकट करतो असे वाटते. शांतपणे विचार करून.. काय बोलायचं कसं बोलायचं याचा विचार करून मुलांशी बोलले पाहिजे. आरे ला कारे म्हणण्याची रीत असतेच त्याला मुलेही अपवाद नाहीत शिवाय हे वय आणि हार्मोनल चेंजेसमुळे होणारे बदल हे ही पालकांनी विचारात घ्यायला हवे.



भूतकाळाशी सांगड घालतोच आहोत तर आपणही या वयात कसे होतो हे जरी आठवले तरी मुलांविषयी वाईट विचार न करता त्यांना आधीक समजून घेणे सोपे जाईल असे वाटते. मान्य की ते थोडे कठीण आहे पण प्रयत्नाने सोपे देखील होईल.



इथे एरिक बर्न ने सांगितलेली मनोवृत्ती कामी येऊ शकेल असे वाटते..


आपण जेव्हा कोणाशी वर्तणूक करत असतो तेव्हा आपल्यात आणि इतर व्यक्तीत मानसिक ट्रांजाक्शन होत असतं त्यात आपण सतत पेरेन्ट, ऑडल्ट, चाईल्ड यापैकी कुठल्यातरी भूमिकेत वावरत असतो. या प्रकारात बर्नने चार मनोवस्था सांगितल्या आहेत यापैकी कुठली तरी मनोवृत्ती आपण सतत दाखवत असतो..



1.I am not ok, You are ok


2.I am ok, You are not ok


3.I am not ok, You are not ok


4.I am ok, You are ok



यानुसार चार Parenting Style पडतात. आपण यातील कुठल्या प्रकारात मोडतो हे ठरवून स्वतःत काय बदल केले पाहिजे हे ज्याचे त्याने ठरवायला हवे.



1.हुकूमशाही पालक - हे शिस्त लावणारे पालक असतात. मी म्हणेल तसच झालं पाहिजे असा त्यांचा रोल असतो. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत असे त्यांना वाटत असते. यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. I am not ok, You are ok अशी त्यांची धारणा होते. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि माझंच काहीतरी चुकतंय बाकी जग बरोबर आहे अशी त्यांची धारणा होते. स्वतःला कमी लेखणं, दुर्बलता, भित्रेपणा, निराशा, एक्कलकोण्डेपणा हे दोष मुलांमध्ये निर्माण होतात.



2.परवानगी देणारे पालक - तू अभ्यास कर तुला हवं ते देतो असे म्हणणारे पालक या अवस्थेत येतात. पण यामुळे मुले I am ok, You are not ok अशी होतात. माझंच बरोबर, जे काही चुकतं ते इतरांचच असे त्यांना वाटते. स्वतःची चूक कधीही ते मान्य करत नाहीत. त्यामुळे इतरांशी जुळवून घेणे त्यांना अवघड जाते.



3.सहभाग न घेणारे पालक - ज्या मुलांचे आई वडील जॉब करतात अशा मुलांना पालकांचा सहवास कमी मिळतो, अशावेळी त्या मुलांचा भावनिक कोंडमारा होऊ शकतो. पालक हवी ती वस्तू आणून देतात पण स्वतःचा वेळ नाही देऊ शकत. मुले कशी वाढतात हे पालकांना कळत देखील नाही अशी मुले I am not ok, You are not ok अशी होतात. ही सर्वात धोक्याची अवस्था आहे.



4.खंबीर पालक - ही सर्वात चांगली स्थिती. मुलांना जर खंबीर पालक मिळाले तर त्यांची वाढ निकोप होते. सारासार विचार करण्याची वृत्ती वाढते. असे पालक आपल्या मुलांच्या भावना जपतात, त्यांची काळजी घेतात, चुका झाल्या तरी त्या मुलांना समजावून सांगतात वं तशी चूक पुन्हा न करण्याविषयी समजावतात. मुलांवर प्रेम करतात, माया करतात, धीर देतात, उत्तेजन देतात, मुलांना स्वावलंबी बनण्यासाठी मदत करतात. अशा पालकांच्या खंबीर वागण्यामुळे मुले एकदुसऱ्यांना मदत करतात, सोसायटी मध्ये मिसळतात, एकमेकांची काळजी घेतात, महत्वकांक्षी बनतात. त्यांच्यात आत्मविश्वास भरलेला असतो ते मोठ्यांचा आदर करतात. थोडक्यात I am ok, You are ok अशी असतात.



यावरून इथे एक सांगावसं वाटतं की मी जागरूक असायला हवं की मी कोणत्या अवस्थेमध्ये आहे.. तसेच उत्स्फूर्तपणे तिचा स्वीकारून मला ती बदलता आली पाहिजे आणि वेळेनुसार ती मला धारण करता आली पाहिजे. थोडं कठीण आहे पण अवघड निश्चितच नाही..


Wish u all the best 👍🏻


• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 

• फॉलो करा. 


धन्यवाद ! 🙏 


©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या