![]() |
फोटो : गुगल सौजन्य 🙏🏻 |
Marathi Short Story | Laghu Katha - "हेही आहे तुझ्या नशिबात बरे!" मराठी लघुकथा प्यारवाली लव्ह स्टोरी
"हेही आहे तुझ्या नशिबात बरे!"
किचनमधून भांड्यांचा आवाज येत होता..
"अगं, हळू किती त्रागा करतेस." विश्वासराव.
"हो, माझं मेलीचं नशीबच वाईट" मालतीताई.
"का गं, आता काय झालं..? "
"रोज नुसतं रांधा वाढा, उष्टी काढा; हेच आहे का माझ्या नशिबात? कसली हौसमौज ती नाहीच, साधं कौतुकाचे दोन शब्दपण नाहीत."
मालतीताईंची बडबड सुरु होताच विश्वासरावांनी काढता पाय घेतला. चप्पल पायात सरकवत न बोलताच ते बाहेर निघून गेले.
"गेले बाहेर.. काही बोलले की न सांगता बाहेर जायचं, तू बस बडबडत." मालतीताईंचा त्रागा आणखीनच वाढला.
त्याला कारणही तसेच होते. आज विमलाने अचानक सुट्टी घेतली. तिच्या मुलीची तब्बेत बरी नव्हती आणि घरी मुलीला एकटीला टाकून ती येऊ शकत नव्हती. तिची मुलगी आडनानिड वयात होती त्यामुळे विमला नेहमी काळजीत असायची हे मालती ताईंना ठाऊक होते.
खरं तर आता आतापर्यन्त मालती ताई स्वतःच सर्व काम करायच्या; पण मध्यन्तरी त्यांना स्पॉन्डीलेसिसचा त्रास सुरु झाला. मधून मधून अचानक त्यांना चक्कर यायची.
एकदा त्या चक्कर येऊन घरातच पडल्या.. पण सोफ्यावर पडल्यामुळे त्यांना फारसे लागले नाही. तेव्हापासून मात्र विश्वास रावांनी मालती ताईंचे काही ऐकले नाही. त्यांनी शेजारीच काम करत असलेल्या विमालाला घरकामासाठी यायला सांगितले. तेव्हापासून विमला कामासाठी येऊ लागली.
विमलच्या येण्याने मालती ताईंना थोडा आराम मिळू लागला. केर, फरशी, भांडी, कपडे आणि दोन भाकरी हे सगळं विमला करत असे. भाजी मात्र मालती ताईच करायच्या.
दोन दिवस झाले विमला कसल्यातरी काळजीत आहे हे विमलाताईंच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते. त्यांनी तिला विचारले देखील पण विमलाने काहीतरी कारण सांगून बोलणे टाळले होते.
तासाभराने विश्वासराव परतले. त्यांनी मुकाट्याने जेवण केले. एव्हाना मालती ताई देखील बऱ्याच शांत झाल्या होत्या. जेवण झाल्यावर विश्वासराव बेडरूममध्ये गेले आणि बघता बघता त्यांची डुलकीही लागली.
"हुशश..! आवरलं बाई एकदाचं"
जेवण झाल्यावर सर्व आवराआवर करून आडवे होत मालतीताई स्वतःशीच पुटपुटल्या. मालतीताईंनी पाट टेकली तेव्हा कुठे त्यांना थोडे बरे वाटले. वाईट सवयी कती पटकन लागतात ना.. असा विचार त्यांच्या मनात चमकून गेल्या स्वतःवरच हसल्या.
आत्ताआता पर्यंत सर्वकाही स्वतः करणाऱ्या मालतीताई आता मात्र विमलावर अवलंबून राहू लागल्या होत्या; त्यामुळेच आज अचानक विमला येणार नाही म्हटल्यावर त्यांची चिडचिड झाली होती.
विश्वासरावांना देखील हे कळत होते आणि म्हणूनच मालतीला खुश करण्यासाठी काही न बोलता ते बाहेर गेले होते. त्यांना मालतीताईना सरप्राईज द्यायचे होते.
खरे तर दहा वर्षांपूर्वी मुलाच्या अकाली जाण्याने तेही खचले होते परंतु मालतीची जबाबदारीमुळे त्यांना या कठीण प्रसंगातदेखील सावरायचं बळ मिळालं. मालती ताईंची मात्र ते खुप काळजी घेत असत.
त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं विश्वासरावांना अजिबात आवडत नसे. ते नेहमी मालती ताईंना खुश ठेवण्यासाठी धडपडत असत. किंबहुना तोच त्यांच्या जीवनाचा आधार होता.
जी काही जमापुंजी होती त्यामध्ये ते दोघे आरामात रहात होते. दर सहा महिन्याला ते आणि मालती ताई कुठेतरी चार दिवस बाहेर गावी जाऊन फिरून येत असत.
मालती ताईंना नाटक बघायला खुप आवडत असे ही गोष्ट विश्वासरावांना चांगलीच ठाऊक होती; त्यामुळे मालतीताई दुःखी, उदास झाल्या की विश्वासराव त्यांना नाटकाला घेऊन जात असत.
आजही असेच झाले. तासाभरात वामकुक्षी झाल्यावर विश्वासराव उठले आणि मालतीताईंना म्हणाले, "चल आवर पटकन, छानशी साडी नेस.. आपण संध्याकाळच्या नाटकाच्या शोला चाललोय. नाटक संपल्यावर बाहेरच जेऊ."
मालतीताई डोळे विसफारून पाहू लागल्या.. खरे तर हे त्यांच्यासाठी नवीन नव्हते पण तरीही हा क्षण त्या पुन्हा नव्याने जगायच्या. त्यांच्यासाठी देखील विश्वासरावांचा आनंद खुप महत्वाचा होता.
त्यांना असे आश्चर्यचकित झालेले पाहून विश्वासराव म्हणाले, "हेही आहे तुझ्या नशिबात बरे!"
अन दोघेही आनंदाने हसू लागले. मालती ताईंच्या चेहऱ्यावर हसू आलं हेच तर विश्वासरावांना हवं होतं.
अशाच प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या भावना जपल्या तर..
तिच्यासाठी स्वर्ग नक्कीच दोन बोटे उरेल. नाही का?
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
0 टिप्पण्या