चित्रपट समीक्षा : मराठी चित्रपट 'झिम्मा
©सौ. सुचिता वाडेकर...✍🏻️
नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेला 'झिम्मा' सिनेमा आज पुन्हा एकदा बघितला. खरं तर झिम्मा बघण्याची ही माझी पाचवी वेळ; पण दरवेळी झिम्मा बघताना नव्याने झिम्मा बघत असल्याचा फील येतो मला. खुप एन्जॉय करते मी हा सिनेमा. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या या बायका दहा दिवस एकत्र एकट्या जीवनाचा आनंद घेत असतात.. राहून गेलेल्या गोष्टी करत असताना गेलेला आत्मविश्वास पुन्हा नव्याने मिळवताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून हरखून जायला होतं. प्रत्येकीचे काही ना काही प्रॉब्लेम्स असतात पण त्यावर मात करून नव्याने आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी त्या देतात. हे मला खुप महत्वाचं वाटतं.
क्षणभर का होईना आपण देखील आपल्या जगापासून दूर असलेल्या लंडन सिटी मध्ये त्यांच्याबरोबर फेरफटका मारून येतो.. त्यामुळे जाम आवडतो मला झिम्मा. दरवेळी नव्याने प्रेमात पडते मी त्याच्या. या चित्रपटतील प्रत्येकीने समर्थ अभिनय केलाय आणि या चित्रपटतील गाणी व पार्श्वसंगितही उत्तम आहे. अमित राजने अगदी उत्कृष्ट संगीत दिलेय. झीम्माचं टायटल गीत तर खूपच अप्रतिम आहे.. श्रवणीय आहे आणि वैशाली सावंतच्या आवाजात ते आणखीनच खुलून येतं. या सिनेमाचं छायाचित्रणही अप्रतिम आहे.. लंडन सिटी कॅमेऱ्यामध्ये सुंदर कैद केली आहे. आपल्याही नकळत आपण देखील लंडनला फेरफटका मारून येतो.
या सातजणीत निर्मिती ताई भाव खाऊन जाते. खरं तर सातही जणींनी अप्रतिम काम केलंय पण निर्मिती ताईचं गावठी बोलण आणि देहबोलीतून आलेले एक्सप्रेशन्स खुप भाव खाऊन जातात. काही गोष्टी स्पष्ट न बोलताही फक्त कायिक अभिनयच्या जोरावर तिला नेमकं काय म्हणायचं आहे ते प्रेक्षकांना बरोबर समजते. उत्कृष्ट अभिनया बरोबर तिच्या जाडीचा देखील ती समर्पक उपयोग करताना दिसते.
२० वर्षांपासून ते ७० वर्षाच्या आजीपर्यंतच्या सर्व व्योगटातील या सात बायका कबीर सोबत लंडनला येतात. कबीर म्हणजे टूर मॅनेजर 'सिद्धार्थ चांदेकर'. सिद्धार्थनेही खुप अप्रतिम काम केलंय. तो आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक 'हेमंत ढोमे' ही दोनच काय ती पुरुष पात्रे आहेत. कथा अशी खुप मोठी नाही पण दिग्दर्शक हेमंत ढोमेने ती उत्कृष्ट बांधली आहे. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती आपल्याला खिळवून ठेवते. सिनेमा एकदा बघितलेला असताना देखील दुसऱ्यांदाही तितक्याच नविन्याने आपण तो बघू शकतो हे या सिनेमाच्या यशाचं गमक आहे आणि याचं श्रेय दिग्दर्शक हेमंत ढोमेला जातं.
यात हेमंत ढोमेच्या बायकोने म्हणजे क्षिती जोगनेही सुंदर काम केलेय. पतीच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर आत्मविश्वास गमावलेली क्षिती जेव्हा लंडन मध्ये हरवते तेव्हा तिच्या दहा वर्षाच्या लेकीने तिला गुगल मॅप द्वारे आपल्या डेस्टिनेशनला कसे पोहोचायचे हे ट्रीपला यायच्या आधी शिकवलेले असते त्याचा वापर ती परक्या देशात कसा करते आणि मध्यरात्री हॉटेलवर सुखरूप कशी पोहोचते याचं सुंदर चित्रण केले आहे. या एका क्षणामुळे तिचा गेलेला आत्मविश्वास पुन्हा मिळतो.. या प्रसंगतील बारीक बारीक छटा क्षितिने आपल्या अभिनयातून खुप अप्रतिम दाखवल्या आहेत.
सुहास जोशींनी यात खोडकर पण मिश्किल आजीची भूमिका सुंदर केलीय. उतार वयात देखील आयुष्याची शेवटची इनिंग एकट्याने अगदी मनाप्रमाणे आणि जीवनाचा मनसोक्त आनंद घेत त्या जगताना दिसतात आणि आपल्याबरोबर बाकीच्यांना देखील त्या सामील करून घेतात. त्यांच्याकडे बघून वाटतं की अरे साठी नंतरचं आयुष्य हे असंच बिनधास्त जगायला हवं.
सुचित्रा बांदेकरने वयात आलेल्या मुलीची आई उत्तम साकारली आहे तर लग्न ठरलेले असताना देखील खुप गोंधळलेल्या मुलीची भूमिका सोनाली कुलकर्णीने छान वटवली आहे. या सात जणीत सगळ्यात छोटी असलेली सायली संजीव. आतापर्यंतचं आयुष्य हॉस्टेलवर घालवलेली, जीवनाचा मनमुराद आनंद स्वतः घेणारी आणि इतरांनाही देणारी असं हे पात्र देखील खुप भाव खाऊन जाते.
बायका एकत्र आल्या की भांडण होणार नाही असं होत नाही त्यामुळे इथेही बायकांची भांडणे आहेत ती सोडवताना कबीरचे होणारे हाल, या बायकांच्या बिनधास्त वागण्याने निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यातून आपोआप बाहेर पडत आपण चित्रपटच्या शेवटापर्यंत कधी येऊन पोहोचतो हे आपल्याला कळतदेखील नाही.
प्रत्येक स्त्रीच्या मनात काही ना काही सुप्त इच्छा असते पण काही करणामुळे ती अपूर्ण राहिलेली असते अशा प्रत्येक स्त्रीला आपला वाटावा असाच हा 'झिम्मा' सिनेमा आहे. मी तरी खुप एन्जॉय करते हा सिनेमा.. दरवेळी मला एक नवी ऊर्जा देऊन जातो. त्यामुळे तुम्हीही जर अजून पर्यंत 'झिम्मा' बघितला नसेल तर आवर्जून बघा. तुमचे तीन तास नक्कीच आनंदात जातील.. आणि एक नवी ऊर्जा तुम्हाला मिळेल जी चित्रपट संपल्यावर तुम्ही फील कराल याची मला खात्री आहे.
• कसा वाटला लेख..
• लेख आवडला तर फॉलो करा, शेअर करा.. अर्थात माझ्या नावासहित..!
• साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 😊
©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️
0 टिप्पण्या