Parenting : पालकत्व निभावताना... (भाग-१३) "वृद्धावस्थेत निवृत्ती नंतर जाणवणाऱ्या समस्या, रिकाम्यावेळेचे नियोजन" (कालावधी : ६० वर्षे ते मृत्यू पर्यंत)

 पालकत्व निभावताना... (भाग-१३)

©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️
२८.०४.२०२०






मागील काही भागांपासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पहात आहोत.

मागील भागात(भाग-१२) आपण "वृद्धावस्था(उत्तरप्रौढावस्था)" पहिली...खालील लिंकवर ⤵️




या भागात आपण "वृद्धावस्थेत निवृत्ती नंतर जाणवणाऱ्या समस्या, रिकाम्यावेळेचे नियोजन" पाहणार आहोत.

१०. "वृद्धावस्था" -  वृद्धावस्थेत निवृत्ती नंतर जाणवणाऱ्या समस्या, रिकाम्यावेळेचे नियोजन -  
(कालावधी : ६० वर्षे ते मृत्यू पर्यंत)


● वृद्धावस्थेतील समस्या - 

वृद्धावस्थेत निवृत्ती नंतर जाणवणाऱ्या महत्वाच्या दोन समस्या आहेत

१. निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा?
२. वृद्धांचा एकाकीपणा

१. निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा? 

वृद्धावस्थेत निवृत्ती नंतर खूप सारा रिकामा वेळ मिळतो.. या वेळात नेमकं करायचं काय? असा प्रश्न अनेक वृद्धांना पडतो. या वेळेचं वेळीच नियोजन केले नसेल तर अनेक शारीरिक, मानसिक व्याधींना सामोरे जावे लागू शकते. अनेकजण नोकरी करीत असताना मर्यादित जेवण घेत असतात, त्यांचे स्वतःचे असे वेगळे विश्व तयार झालेले असते... ते त्यांच्या ऑफिस पुरते मर्यादित असते, मात्र निवृत्तीनंतर हे रुटीन थांबते. बऱ्याच वृद्धांना हे घरी राहणे सहन करणे अवघड जाते.

ऑफिसमध्ये त्यांना हाताखालच्या लोकांवर अधिकार गाजवायची सवय लागलेली असते, त्यामुळे निवृत्तीनंतर नकळत घरी देखील ते अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात. याचा घरातील व्यक्तींनादेखील त्रास होऊ लागतो.   घरच्यांना देखील त्यांच्या दिवसभर घरी नसण्याची सवय असते... प्रत्येक गोष्टीत त्यांची लुडबुड घरच्यांना देखील त्रासदायक ठरू लागते. याचा मानसिक ताण वृद्धांवर येऊन आपण इतके वाईट आहोत का की कोणालाच नको आहोत असे वाटू लागते.

वृद्धापकाळात मन आणि बुद्धी दोन्ही थकत असते, हळूहळू त्यांची वाटचाल शेवटाकडे चाललेली असते. आपल्या नोकरीतून आपण निवृत्त होतो ते सरकारी नियमाप्रमाणे होतो, असमर्थ झालो म्हणू नव्हे हे वृद्धांनी स्वीकारायला हवे.

काही वृद्ध फक्त आराम करतात तर काहींचे रुटीन ठरलेले असते. उदा. सकाळी उठून फ्रेश होऊन फिरायला जाणे, नंतर नास्था, पेपर वाचन, अंघोळ, देवपूजा, पोथीवचन, बँकेतील कामे, दुपारचे जेवण, वामकुक्षी, संध्याकाळचा चहा घेऊन पुन्हा फिरायला जाणे, आल्यावर थोडावेळ टीव्ही मग जेवण आणि त्यानंतर झोप इ.

वृद्धापकाळात वृद्धांनी वानप्रस्थापणाचा आधुनिक अर्थ समजून घ्यायला हवा. आपल्या आवडी, छंद जोपासायला हवेत. नोकरी करताना ज्या गोष्टी करता आल्या नाहीत अशा सर्व गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.

काही वृद्ध नोकरी, व्यवसायातून निवृत्त झाल्यावर अधिक कार्यरत दिसतात. कौटुंबिक कार्यात, समाजकार्यात हिरहिरीने भाग घेतात त्यामुळे ते समाधानी असतात. प्रत्येक वृद्धाने आपल्या आवडी नुसार कामाचे नियोजन करावे. ज्या कामात मन रमते किंवा जे काम केल्यावर आनंद मिळतो अशी कामे स्वतः हुन शोधली पाहिजेत आणि ती केली पाहिजेत.

ज्या वृद्धांना शेतीची आवड आहे अशा वृद्धांनी शेतीच्या प्रश्नांचा अभ्यास करून गावाकडिल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा.

ज्यांना वाचनाची आवड आहे अशांनी वाचन छंद जोपासावा. वाचनालयात जाऊन उत्तमोत्तम साहित्य वाचावे जे आजवर कामामुळे त्यांना वाचता आले नाही. वाचनामुळे वैचारिक परिपक्वता येते, विचारात सकारात्मकता येते ज्याचा हा वृद्धापकाळ सुकर घालवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

निवृत्तीच्या या काळात वृद्धांनी आपले मन अशा गोष्टींकडे वळवावे ज्यात आपले मन रमेल, मनाला आनंद मिळेल.

२. वृद्धांचा एकाकीपणा -

१. वयोमानानुसार कमी होत जाणारी शारीरिक ताकद, प्रकृतीच्या अनेक तक्रारी यामुळे वृद्धांना समाजात मिसळणे अवघड जाऊ लागते, त्यामुळे बऱ्याचदा वृद्ध एकटे पडतात.

२. शरीर अस्वास्थ्यामुळे आणि बरीचशी आर्थिक तरतूद करून ठेवलेली असल्यामुळे सामाजिक व नागरी कर्तव्ये पार पाडणे शक्य होत नाही त्यामुळे एकप्रकारची सामाजिक निष्क्रियता त्यांना येते. 

३. मुले स्वतःच्या व्यवसायत आणि संसारात व्यस्त असतात त्यामुळे वृद्धांना त्यांची सोबत अपेक्षित असूनही मिळणे अवघड होते.

४. बऱ्याचशा वृद्धांना शारीरिक असाहयतेमुळे इतरांवर अवलंबून रहावे लागते. तसेच आर्थिक असुरक्षितता असेल तर राहणीमानात देखील बदल करावा लागतो.

५.  जोडीदाराचा मृत्यू हे एक महत्वाचे कारण आहे वृद्धापकाळात एकाकीपणा येण्याचे. एकाने अचानक एक्झिट घेतल्यामुळे मागे राहिलेला दुसरा साथी एकाकी पडतो.

● वृद्धापकाळातील रिकाम्यावेळेचे नियोजन - 

वृद्धापकाळातील रिकाम्यावेळेचे पूर्व नियोजन केले असेल तर वृद्धापकाळ सुखकर जातो अन्यथा अनेक मानसिक व्याधींना सामोरे जावे लागू शकते. मात्र हे नियोजन ज्याचे त्याने आपल्या आवडीनुसार आणि शारीरिक सक्षमतेनुसार करायला हवे.

टीव्ही पाहण्याखेरीज अनेक गोष्टी वृद्धांना करता येऊ शकतात. इथे काही मुद्दे मी देत आहे त्यानुसार वृद्धांना आपल्या वृद्धपकाळातील वेळेचे नियोजन करणे सोपे जाईल. 

१. दिनक्रम - रोज चालायला, फिरायला जाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे वृद्धांनी रोज चालणे, फिरणे हा दिनक्रम निश्चित करावा.

२. शारीरिक व्यायाम - वृद्धापकाळात नियमीत व्यायाम हा आवश्यक आहे. योगासने, सूर्यनमस्कार, पोहणे, वॉटर वॉकिंग हा वृद्धांसाठी उत्तम व्यायाम आहे. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त रहायला मदत होते शिवाय दिवसभर फ्रेश वाटते, शिवाय व्यायामामुळे सकारात्मक विचार करायला मदत होते. त्यामुळे वृद्धांनी आपल्या दिनक्रमातील काही वेळ व्यायामासाठी निश्चित करावा.

३. आहार -  वृद्धापकाळात पचन शक्ती कमी झालेली असते त्यामुळे बऱ्याजनांना बद्धकोष्टकतेचा त्रास असतो. त्यामुळे वृद्धांनी या वयात हलका-फुलका पण सकस आहार  घ्यावा.

४. मेंदूला कार्यरत ठेवणाऱ्या कृती - मेंदूला कार्यरत ठेवण्यासाठी बुद्धीला चालना देणाऱ्या कृती या वयात करणे गरजेचे आहे. या वयात अनेकांना विस्मरण होत असते. बऱ्याचजनांना जुने आठवते पण अलीकडचे आठवत नाही किंवा नुकतीच ठेवलेली वस्तू कुठे ठेवली हे आठवत नाही.

यासाठी मेंदूला सतत कार्यरत ठेवणे आवश्यक असते. यासाठी काही खेळ नित्यनेमाने खेळावेत जसे की शब्द कोडे सोडवणे, समानार्थी शब्द सांगणे, विरुद्धार्थी शब्द सांगणे, एखाद्या शब्दावरून पदार्थाची नावे सांगणे उदा. 'रवा' हा शब्द दिला तर त्यापासून बनणारे पदार्थ सांगणे.

अक्षरावरून शब्द ओळखणे उदा. 'श' अक्षरापासून सुरु होणारे शब्द सांगणे, शेवटचे अक्षर 'ष' असलेले शब्द सांगणे, आज ऐकलेल्या चार बातम्या सांगणे अशाप्रकारचे खेळ वृद्धांनी खेळावेत. यामुळे बुद्धीला चालना मिळून बुद्धी कार्यरत राहण्यास मदत होईल.

५. मदत करणे - मागील भागात आपण वृद्धावस्थेचे तीन प्रकार पहिले. १. तरुण वृद्ध २. वयस्क वृद्ध  ३. म्हातारे वृद्ध.

यातील तरुण वृद्ध ८० च्या वरील वृद्धांना मदत करू शकतात, त्यांच्याकडे वेळ असतो. असे वृद्ध शोधून त्यांना मदत करावी.  उदा. भाजी आणून देणे, डॉक्टरांकडे घेऊन जाणे इ.

६. स्वयंप्रेरित कार्य करणे - आपल्याकडील ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करावा. उदा. भजन, गाणी, गीतापठन यांचे मोफत क्लासेस चालवावेत जेणेकरून आपला वेळ आनंदात तर जाईलच पण समाजासाठी आपण काही तरी करू शकतो हे समाधान हि मिळू शकते.

७. छंद जोपासणे - या काळात वृद्धांनी ज्या गोष्टी तरुणपणी करायच्या राहून गेल्या आहेत त्यांची यादी करून त्या पुऱ्या कराव्यात. उदा. नाटक, सिनेमा, पर्यटन, वाढदिवस पार्टी आयोजन, वाचन, गायन इ.

अशाप्रकारे आपल्या उतारवयात मिळालेल्या रिकाम्यावेळेचे नियोजन वृद्ध करू शकतात.

मृत्यू जरी अटळ असला तरी तोपर्यंतचे आयुष्य हे आनंदात, मजेत घालवण्यासाठी वृद्धापकाळात मिळालेल्या या रिकाम्या वेळेचे योग्य नियोजन केले तर प्रत्येकाचा वृद्धापकाळ आनंदी जाऊ शकतो.

अशाप्रकारे या भागात आपण 'वृद्धावस्थेतील समस्या' आणि 'वृद्धापकाळातील रिकाम्यावेळेचे नियोजन' पाहिले. 

भेटूयात पुढील भागात..  

● समारोप... 

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️
२८.०४.२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या