Parenting : पालकत्व निभावताना... (भाग-१२) "वृद्धावस्था" (उत्तरप्रौढावस्था) - कालावधी : ६० वर्षे ते मृत्यू पर्यंत

 पालकत्व निभावताना... (भाग-१२)

©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️
२७.०४.२०२०




मागील काही भागांपासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पहात आहोत.  

मागील भागात(भाग-११) आपण "प्रौढावस्था" पहिली...खालील लिंकवर ⤵️



या भागात आपण "वृद्धावस्था" पाहणार आहोत. 

१०. वृद्धावस्था(उत्तरप्रौढावस्था) -  
कालावधी : ६० वर्षे ते मृत्यू पर्यंत  

आयुष्याच्या उतरणीचा काळ म्हणजे वृद्धावस्था(उत्तरप्रौढअवस्था) किंवा उतारवय. ६० वर्षानंतर मृत्यू पर्यंतचा काळ हा उतारवयाचा काळ होय. 'वृद्ध', 'म्हातारा' या संकल्पना आता बदलत आहेत. माणूस वयाने नव्हे, तर मनाने तरुण किंवा वृद्ध ठरतो.

एखादा चाळीशीतील तरुण मनाने वृद्ध असू शकतो तर एखादा ८० वर्षाचा माणूस अजूनही स्वतःला तरुण मानतो. आजही वृद्ध तितक्याच तडफेने, जोमाने कार्य करू शकतो जितके त्याने पूर्वी केलेय. स्वतः ला तरुण समजायचे की वृद्ध हे व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असते.

● वृद्धावस्थेची लक्षणे -

माणूस वृद्ध झाला की त्याची ठळक खून म्हणजे केस पांढरे होणे, टक्कल पडणे, चेहऱ्यावर व त्वचेवर सुरकुत्या पडणे आदी लक्षणे दिसू लागतात. या काळात हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते.. स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. जवळजवळ २५% स्त्रियांना हा विकार होऊ शकतो. तसेच शरीरातील पचन क्षमता, उत्सर्जन, रक्ताभिसरण यांची देखील क्षमता कमी होते. त्यामुळे अन्नपचन नीट होत नाही त्यातून बद्धकोष्टकता सारखे विकार उदभवतात.

● वृद्धावस्थेची वैशिष्टये - 

जसजसे वय वाढत जाते तशी माणसाची शारीरिक कौशल्ये कमी होत जातात. हालचाली करणे त्यांना जड जाऊ लागते. वयाच्या कार्यक्षमतेनुसार वृद्धावस्थेचे तीन गट मानले जातात.

१. तरुण वृद्ध - अशी माणसे निरोगी आणि सक्रिय असतात.

२. वयस्क वृद्ध - अशा व्यक्तींच्या काही आरोग्याच्या तक्रारी असतात, त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात अडचणी येतात.

३. म्हातारे वृद्ध - अशी माणसे दुरबल, अशक्त आणि कमालीची परावलंबी असतात.

I] वृद्धावस्थेतील शारीरिक बदल - 

१. दृष्टीवेदन(दृष्टी)
२. श्रुतिवेदन(श्रवण)
३. चव, स्वाद, गंध वेदना 
४. पंचनशक्तीवर परिणाम

१. दृष्टीवेदन(दृष्टी) - वृद्धावस्थेत जो शारीरिक बदल होतो त्याचा महत्वाचा परिणाम म्हणजे दृष्टीवेदन. प्रौढावस्थेत डोळ्यांच्या बऱ्याचशा तक्रारी उदभवतात, भिंगाची पारदर्शकता कमी होते त्यामुळे दृष्टीदोष निर्माण होतात. डोळे कोरडे झाल्यासारखे वाटतात. प्रतिमा धूसर दिसू लागते, अंधारात दिसत नाही, तीव्र प्रकाश सहन होत नाही. मोती बिंदू होतो. वेळीच उपाय केले नाहीत तर अंधत्व येऊ शकते.

२. श्रुतिवेदन(श्रवण) - वृद्धांना ऐकण्याची समस्या हि दृष्टी विकारापेक्षा त्रासदायक ठरते. वयाच्या ६५-७५ मध्ये कमी ऐकू येते. डोळ्यावर जितक्या सहजतेने चष्मा चढवला जातो तितक्या सहजपणे कानात श्रवणयंत्र ठेवण्यास वृद्ध उत्सुक नसतात. हि बहिरे पणाची खून आहे असे त्यांना वाटते. परिणामी ऐकू न आल्यामुळे समाजातील लोकांमध्ये मिसळणे कमी होते.

३. चव, स्वाद, गंध वेदना - या अवस्थेत त्यांना चव लागत नाही अथवा कळत नाही. तिखट तरी लागते किंवा कमी तिखट तरी लागते. या वयात लाळेचे प्रमाण कमी होते त्यामुळे पचन नीट होऊ शकत नाही.

तसेच दातांवरही परिणाम होताना दिसतो. या अवस्थेत बहुतेक वृद्धांचे दात पडताना दिसतात या मागे हिरड्यांचे आजार हे प्रमुख कारण आहे. दात किडणे किंवा खराब होणे हे दुय्यम कारण आहे. परिणामी पचन नीट होत नाही आणि बद्धकोष्टकतेचा त्रास सुरू होतो.

वयाच्या वाढीबरोबर नाकातील गंधतंतूं निकामी होऊ लागतात त्यामुळे वृद्धांना पूर्वीइतका वास स्पष्टपणे जाणवत नाही. स्वाद हा गंध पेशीतून मिळत असतो त्यामुळे गंध पेशी निकामी झाल्या तर स्वाद जाणवत नाही.

तसेच वृद्धावस्थेत किडनी व यकृताच्या कार्यामध्ये अडथळा येतो. उदा. पित्ताशयात खडे होणे, मलावरोध होणे इ. पर्यायाने कॅल्शिअम, ओमेगा 3 पूरक आहारासोबत घ्यावे लागते.

II] वृद्धावस्थेतील मानसिक बदल -

१. अध्ययन न करणे - वृद्धावस्थेतील लोक अध्ययन फार कमी करतात. फार कमी लोक नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवणे हा एका मोठा प्रश्न या वयाचा असतो.

२. तर्कप्रक्रियेस वेळ - नावे न आठवणे, एखादी वस्तू नेमकी कुठे ठेवलीय हे न आठवणे, औषधांची वेळ लक्षात न राहणे

३. सृजनशीलता - या वयात सृजनशीलता कमी झालेली असते. मात्र काही लोक या वयात सृजनशील बनतात सुद्धा. निवृत्तीनंतर मिळालेला रिकामा वेळ काहींना खायला उठतो तर काही लोक याचे नीट समायोजन करून आजवरच्या आयुष्यात कामाच्या व्यापामुळे, नोकरी मुळे ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्यातील सृजनतेला मोकळी वाट करून देतात.

४. स्मृती लाभ - स्मृतीलाभ म्हणजे जे विसरल्यासारखे वाटते ते आठवते. भूतकाळाचा विचार करता अनेक पूर्व स्मृती जागृत होतात. त्यात जुन्या व्यक्ती, जुनी गाणी, जुने गंध पुन्हा जाणवतात, आठवतात. बऱ्याच वृद्धांना अगदी अलीकडच्या काळातील काही घटना आठवत नाहीत परंतु जुन्या गोष्टी लख्ख आठवत असतात.

५. विनोदबुद्धी - वृद्धांमधील विनोदबुद्धी कमी झालेली दिसून येते. शारीरिक त्रासांमुळे, व्याधींमुळे ते चिडचिडे झालेले असतात, त्यामुळे ते विनोदबुद्धी पूर्णतः विसरलेले असतात.

III] वृद्धावस्थेतील अभिरुचिमधील बदल -

१. व्यक्तिगत परावलोकन - वृद्धव हा काळ म्हणजे आपण व्यक्तिगत जीवनात समाधानी आहोत का याचे परावलोकन करण्याचा काळ. व्यक्तीचे पूर्व आयुष्य आनंदी, समाधानी गेले असेल तर वृद्धावस्थेत देखील समाधान मिळते. जर व्यक्ती पूर्वा युष्यात घेतलेल्या निर्णयाबाबत समाधानी नसेल तर त्याची खंत, बोचणी त्या व्यक्तीला सतत लागून राहते.

आता आपले उतार वय, आयुष्य थोडेच उरले आणि आता काही करूही शकत नाही याची खंत वाटत राहते. अशावेळी मृत्यू विषयी चिंता, आयुष्याविषयी कडवट पणा, अपराधी पणाची जाणीव दिसून येते. त्यामुळे राग, चिडचिड व्यक्त होताना दिसते. पर्यायाने इतरांशी संबंध बिघडतात व व्यक्ती अधिक निराश होते.

२. पैशाविषयक सतर्कता - मृत्यू अटळ आहे याची जाणीव उत्तर प्रौढावस्थेत वृद्धांना होते. बरेचसे मित्र, प्रियजन जग सोडून गेलेले असतात. अशावेळी वास्तवाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होणे आवश्यक असते.

जरी पूर्वीच्या अवस्थांमध्ये वर्धक्यासाठी तरतूद करून ठेवलेली असली तरी हे वृद्ध आपल्या पैशांविषयी सतर्क असतात. त्यांचा कोणावर विश्वास नसतो. मागे राहणाऱ्या पत्नी, मुले यांचे जीवन अधिक सुरक्षित व समाधानी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

३. करमणूक विषयक - वृद्धावस्थेत आता आपण शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत याची जाणीव वृद्धांना होत असते. तसेच त्यांना भरपूर रिकामा वेळही असतो त्यामुळे आयुष्यात राहिलेली मौज-मजा, मनोरंजन करून घेण्यासाठी बरीच फुरसत त्यांच्याकडे असते.

यापूर्वी जे छंद जोपासता आले नाही, ज्या सहली आखता आल्या नाहीत त्या आता आखणे शक्य झालेले असते. सध्याच्या काळात बरेचसे जेष्ठ नागरिक एकत्र येऊन ग्रुपने वेगवेगळ्या सहलीचे आयोजन करताना दिसतात. नाटक, चित्रपट,वाढदिवस यासारखे कार्यक्रम एकत्र साजरे करतात. जी मजा तरुण वयात करायची राहून गेली ती उतारवयात पूर्ण करताना दिसतात.

अशाप्रकारे आपण या भागात ववृद्धावस्था (उत्तरप्रौढावस्था), तिची लक्षणे, वैशिष्टये, शारीरिक बदल, मानसिक बदल, अभिरुचिमधील बदल आदी माहिती पाहिली. 

भेटूयात पुढील भागात..  

१०. वृद्धावस्थेत निवृत्ती नंतर जाणवणाऱ्या समस्या, रिकाम्यावेळेचे नियोजन -  
(कालावधी : ६० वर्षे ते मृत्यू पर्यंत)

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏

©सौ. सुचिता वाडेकर...✍️
२७.०४.२०२०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या