पालकत्व निभावताना... (भाग-११)
©सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍️
२७.०४.२०२०
मागील भागांपासून आपण "मानवाच्या जीवन विकासावस्था" सविस्तर पहात आहोत.
मागील भागात(भाग-१०) आपण "तारुण्यावस्था" पहिली.. खालील लिंकवर ⤵️
या भागात आपण "प्रौढावस्था" पाहणार आहोत.
९. प्रौढावस्था(मध्यप्रौढावस्था) -
कालावधी : ४० वर्षे ते ६० वर्षे पर्यंत
साधारणतः वयाच्या चाळीशी नंतर वृद्धापकाळा पर्यंतचा कालावधी(४० वर्षांपासून ते ६० वर्षापर्यंतच काळ) म्हणजे मध्यप्रौढावस्था होय. या अवस्थेत शरीरात हळूहळू होणारे बदल व्यक्तीला जाणवू लागतात. वर्धक्याच्या खुणा हळूहळू दिसू लागतात. म्हातारपण अद्याप दूर असले तरी त्याची अस्पष्ट चाहूल लागते.
● मध्यप्रौढावस्थेची वैशिष्टये -
व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान, तसेच आहारावर नियंत्रण नसणे इत्यादींचा परिणाम शारीरिक, मानसिक आरोग्यावर दिसून येतो.
●मध्यप्रौढावस्थेतील शारीरिक बदल -
● उंची - साधारणतः वयाच्या विशी मध्ये झालेली उंचीतील वाढ वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत तशीच राहते म्हणजे त्यात बदल होत नाही.
● वजन - मध्यप्रौढावस्थेत चरबीत अनावश्यक वाढ होऊन व्यक्ती लठ्ठ दिसू लागते आणि वजनात वाढ होते.
● दृष्टी - चाळीशीत माणसाला चष्मा लागतो कारण या वयात दृष्टीची तीक्ष्णता कमी होते. डोळ्याच्या भिंगांचा आकार बदलतो आणि भिंगांची लवचिकता कमी होते. त्यामुळे वाचताना पुस्तकातील किंवा वर्तमानपत्रातील अक्षरे नीट दिसत नाहीत. त्यासाठी पुस्तक थोडे दूर ठेवून वाचावे लागते. त्यामुळे चष्मा अनिवार्य असतो.
● श्रवण - वयोमानानुसार श्रवण क्षमता देखील कमी होत जाते. कर्ण पटलांची लवचिकता कमी होते त्यामुळे ऐकू कमी येऊ लागते.
● त्वचा - वयाच्या वाढीबरोबर त्वचा सैल पडू लागते त्यामुळे या वयापासून त्वचेवर सुरकुत्या पडायला सुरुवात होते.
● गधं,वास - वयाच्या पन्नाशी नंतर गंध वेदन कमी होत जाते.
● स्वाद - स्वाद आणि गधं यांचा निकटचा संबंध असतो त्यामुळे स्वाद संवेदनेतहि बदल होतात.
● चरबी - या वयात चरबीचे प्रमाण वाढते... हात, पाय, पोट, मांड्या, कंबर इथे चरबी वाढू लागते.
● रजोनिवृत्ती - स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती याच काळात होते. पुरुषांमध्ये देखील बदल होतात, त्यांची काम क्षमता कमी होते आणि वीर्यनिर्मिती थांबते.
● मध्यप्रौढावस्थेतील सृजनशीलता -
● सृजनशील व्यक्ती स्वतः स्वतःचे नियोजन करतात. इतरांच्या मदतीशिवाय निर्णय घेतात.
● त्यांना इतरांबरोबर काम करणे फारसे आवडत नाही.
● काम कितीही अवघड असले तरी ते आपल्याला पार पाडता येईलच हा दृढ विश्वास त्यांच्याकडे असतो.
● कितीही टीका झाली तरी तिला समर्थपणे तोंड देण्यास ते सक्षम असतात.
● या व्यक्ती प्रगल्भ विचार करतात म्हणजे जे ऐकतात, पाहतात, वाचतात त्याचा अर्थ स्वतःसंदर्भात लावतात. अनुभवाच्या गाळणीतून शुद्ध झालेले विचार ते स्वीकारतात.
● मध्यप्रौढावस्थेच्या समस्या, ताणतणाव -
काही घटना व्यक्तीला भीतीदायक वाटतात त्यामुळे शारीरिक आणि भावनिक प्रतिक्रिया उत्पन्न होतात आणि त्यातूनच ताणतणाव निर्माण होतात. वेगवेगळ्या प्रकारचे ताण व्यक्तीला येऊ शकतात जसे की शारीरिक, आर्थिक, मानसिक तणाव, तसेच अनेक खूप सारे घटक आहेत जे तणाव निर्माण करतात.
ताण हा वैश्विक आहे, तो सर्वत्र आढळतो. ताण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मध्यप्रौढावस्था हे एक धोकादायक वय आहे. यशाच्या शिखरावर पोहोचण्याची हीच वेळ असते.
१. मध्यप्रौढावस्थेतील वैयक्तिक धोके -
● वैयक्तिक पातळीवर हे लोक जुळवून घेऊ शकत नाहीत त्यावेळी हा धोका निर्माण होऊ शकतो. उदा. घटस्फोट
● सोसायटीमध्ये चांगले संबंध निर्माण करू शकत नाही, त्यावेळी हा धोका निर्माण होऊ शकतो.
● मेनोपॉज,टक्कल पडणे याचाही मनावर परिणाम होतो त्यावेळी हा धोका निर्माण होऊ शकतो.
● एका वयाच्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करणे ज्यांना जमत नाही त्यावेळी हा धोका निर्माण होऊ शकतो.
● धेय्यापर्यंत पोहोचणे जमत नाही त्यावेळी हा धोका निर्माण होऊ शकतो. काही ठराविक लोक असतात जे ठरवलेल्या धेय्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे आपली प्रकृती, वय लक्षात घेऊन धेय्य ठरवायला हवे अन्यथा जास्तीची अपेक्षा केल्याने धोका निर्माण होऊ शकतो.
२. मध्यप्रौढावस्थेतील व्यवसायिक ताणतणाव (धोके) -
● बढती होण्याची किंवा पगार वाढीची शक्यता खूप कमी असते त्यावेळी ताण येऊ शकतो
● मिळणारे वेतन अपुरे असेल तर चरितार्थ चालवणे अवघड जाते अशावेळी ताण येऊ शकतो.
● कामाचे स्वरूप कंटाळवाणे असेल, त्यातून आनंद मिळत नसेल तर त्या कामाचा उबग येतो.
३. मध्यप्रौढावस्थेतील वैवाहिक धोके -
● कामाच्या वेळेमुळे कुटूंबासाठी वेळ देता येत नाही, सारा वेळ काम आणि प्रवासातच जातो अशावेळी ताण येऊ शकतो.
● नवरा-बायको मध्ये एकमत, एकविचार असणे आवश्यक असते अन्यथा खूप प्रश्न, समस्या निर्माण होतात. काही वेळा घटस्फोटा पर्यंत जावे लागते.
● परजातीत लग्न करणे, अशावेळी खूप समस्या निर्माण होऊ शकतात. त्याला समर्थपणे तोंड देता आले तर ठीक नाहीतर धोका निर्माण होऊ शकतो.
● जर व्यक्ती सक्षम नसेल, एकमेकांमध्ये विचारांची देवाणघेवाण नसेल तरीही धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे विवाह बाह्य संबंध निर्माण होऊ शकतात.
● मध्यमवयीन पालकांचे पालक(आईवडील) त्यांच्या सोबत रहात असतात अशावेळी एका बाजूला आईवडील तर दुसऱ्या बाजूला मुले अशा दोघांच्या कात्रीत हे मध्यम वयीन प्रौढ सापडलेले असतात. त्यांची अवस्था बऱ्याचदा सँडविच सारखी होते. वृद्ध पालकांची काळजी घेणे ही एक मानसिक कसरत असते.
● अचानक नवऱ्याचा मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या पत्नीवर सर्व घराची जबाबदारी येऊन पडते. अशावेळी तिला खूप जड जाते कारण तिला बाहेरचे जग फारसे माहित नसते त्यामुळे आत्मविश्वास जातो.. हा हि एक धोका होऊ शकतो.
● नवरा किंवा बायको गेल्यावर दुसरे लग्न केले जाते अशावेळी मुले असतील तर त्यांची जबाबदारी स्वीकारावी लागते. अशावेळी खूप प्रश्न निर्माण होऊ शकतात याचाही ताण येतो.
४. मध्यप्रौढावस्थेतील भूमिका बदल -
स्त्रियांच्या बाबतीत भूमिका बदल हा फार मोठा धोका होऊ शकतो, फारच थोड्या स्त्रिया परिवर्तनाला सिद्ध असतात.
आपली मुले स्वयंसिद्ध असावीत, त्यांचं स्वतःचं घर, कुटुंब असावे, त्यांनी आपल्या व्यवसायात यशस्वी व्हावे असे मुले मोठी होत असताना प्रत्येक मातेला वाटत असते..
परंतु प्रत्यक्ष ती वेळ येते त्यावेळी याच माता अडथळे निर्माण करतात. आनंद उपभोगायचा सोडून भलतीच भीती त्यांना वाटत असते. यातून कधी कधी मानसिक विकृती निर्माण होण्याचा धोका असतो.
अशाप्रकारे आपण या भागात प्रौढावस्था (मध्यप्रौढावस्था), तिची वैशिष्टये, सृजनशीलता, समस्या आणि ताणतणाव पाहिले.
भेटूयात पुढील भागात..
१०. वृद्धावस्था(उत्तरप्रौढअवस्था) -
कालावधी : ६० वर्षे ते मृत्यू पर्यंत
• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का...
धन्यवाद ! 🙏
• आवडला का...
• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा.
• फॉलो करा.
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
२७.०४.२०२०
0 टिप्पण्या