Gavran Menu : गावरान मेनू डाळ वांगं, मेथीची भाजी, मिरचीचा खरडा आणि भाकरी

"गावरान मेनू"

 'डाळ वांगं, मेथीची भाजी, मिरचीचा खरडा आणि भाकरी'


©सौ. सुचिता वाडेकर... ✍️








       'डाळ वांगं, मेथीची भाजी, मिरचीचा खरडा आणि भाकरी' माझा सर्वात आवडता मेनू. माझ्या माहेरी रोज ताजी भाजी मिळायची. रोज संध्याकाळी मंडई भरायची, 4 वाजले की गावातील शेतकरी शेतातील ताजी भाजी घेऊन विकायला यायचे. त्यामुळे सर्व पालेभाज्या, फळभाजा ताज्या मिळायच्या. वांगी, गवार, दोडके, मेथी, शेपू, चाकवत, कोथिंबीर, पोकळा अगदी फ्रेश असायचे. त्यामुळे गावातील लोकांना त्यावेळी फ्रीज ची कधी आवश्यकता भासलीच नाही.

       आता इथे दर बुधवारी आमच्या बिल्डिंग जवळ आठवडी बाजार भरतो. (शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या तत्वावर) परवा या बाजारात अशीच छान ताजी, फ्रेश वांगी मिळाली. पालेभाज्याही स्वस्त आणि फ्रेश होत्या. मी मेथी आणि कोथिंबीर घेतली. 

       काल 'डाळ वांगं, मेथीची भाजी, मिरचीचा खरडा आणि भाकरी' केली होती. 'डाळ वांगं', 'मिरचीचा खरडा'  रेसिपी...⤵️

* डाळ वांगं *

       साहित्य : मध्यम आकाराची तीन वांगी, एक बटाटा, थोडी तूरडाळ, शेंगदाण्याचा कूट, हिंग, हळद, मीठ, काळा मसाला, लाल तिखट आणि तेल

       कृती : प्रथम एका वांग्याच्या चार याप्रमाणे फोडी करून घ्याव्यात. त्यानंतर बटाट्याचेही उभे काप करावेत आणि दोन्ही मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. यात अंदाजे मूठभर तूरडाळ घालावी. नंतर गॅस वर छोट्या (2ली.) कुकर मध्ये तेल (थोडे जास्त) घालून तापत ठेवावे. तेल तापल्यावर त्यात हिंग, हळद घालून वांगं बटाट्याच्या फोडी घालाव्यात. हे थोडे परतून त्यात काळा मसाला आणि थोडं लाल तिखट (छोटा 1 चमचा) घालावं. त्यानंतर आवश्यकतेनुसार दाण्याचा कूट घालून थोडे परतावे. यानंतर यात अंगभर (खूप जास्त नाही आणि कमी हि नाही कारण हे पाणी आटत नाही) पाणी घालावे आणि मीठ घालून झाकण लावावे, एक शिट्टी होऊ द्यावी आणि गॅस बंद करावा. कुकरची वाफ गेली की झालं डाळ वांगं तैयार ! अगदी झटपट !

* 'मिरचीचा खरडा' *
      
       साहित्य : 8 ते 10 कमी तिखट हिरव्या मिरच्या, तेवढ्याच लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, मीठ, थोडी कोथिंबीर आणि तेल

       कृती : गॅस वर कढई तापत ठेऊन त्यात एक पळी तेल घालावे. तेल तापल्यावर त्यात जिरे, हिरवी मिरची आणि लसूण घालावा, थोडे परतून घ्यावे, नंतर ते सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यावे. पुन्हा कढईत 2 ते 3 पळी तेल घालून वाटलेलं वाटण सोबत मीठ घालून तेलात चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे आणि गॅस बंद करावा. 'मिरचीचा खरडा' तय्यार !

       हा 'खरडा' अतिशय छान लागतो आणि टिकतोही वरच दिवस, फ्रीज मध्ये ठेवावा.  तोंडाची गेलेली चव याने परत येते. पोळी किंवा भाकरी सोबत थोडे तेल घालू सर्व्ह करावा; मात्र मिरची कमी तिखट असलेली वापरावी अन्यथा पोट बिघडू शकते.

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

•  Suchita's Recipe या FB पेजला भेट द्या.. आवडल्यास Like करा... फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या