'श्रावण आला'....
'हसरा नाचरा
जरासा लाजरा
सुंदर साजिरा
श्रावण आला'
आषाढ सुरु होताच श्रावणाची चाहूल लागते आणि कुसुमाग्रजांच्या या ओळींची आठवण होते. हा श्रावण येताना आनंद घेऊन येतो, विविध सण या महिन्यात साजरे केले जातात. पूर्वीच्याकाळी सासरी गेलेल्या नवविवाहितांना घरी माहेरी आणले जात असे, त्यामुळे सर्वांच्याच घरी आनंदाचे उत्साहाचे वातावरण असे. त्याकाळी स्त्रियांना या सणांच्या निमित्ताने नवनवी वस्त्रे परिधान करून निसर्गाच्या सानिध्यात जायला मिळत असे. आता काळ बदलला असला तरी घरोघरी विविध पक्वांन्ने बनवली जातात आणि उत्साहाने सणही साजरे केले जातात.
अनेक कवींनी या श्रावणावर खूप साऱ्या कविता केल्या आहेत. या श्रावणात सर्वत्र हिरवळ पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. श्रावणात कधी ऊन तर कधी पाऊस हा खेळ चालू असतो, त्यामुळे क्षणभर एखादी सर येते तर दुसऱ्या क्षणी चक्क ऊन पडताना दिसते. श्रावणाचे हे सुंदर वर्णन बालकवींनी आपल्या 'श्रावमास' या कवितेत केले आहे.
'श्रावणमासी हर्षमानसी,
हिरवळ दाते चोंहिकडे;
हिरवळ दाते चोंहिकडे;
क्षणात येते सरसरशिरवे,
क्षणात फिरुनी ऊन पडे.'
क्षणात फिरुनी ऊन पडे.'
बालकवीं (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची ही कविता आपण शालेय अभ्यासात अभ्यासली होती.
बालकवींची आणखी एक कविता आपण शालेय अभ्यासात अभ्यासली ती म्हणजे ...
'हिरवे हिरवे गार गालिचे,
हरिततृणांच्या मखमालीचे'
श्रावणात सर्व शिवार हिरवेगार झालेले असते त्यामुळे कवीला ते सुंदर मखमली गालीच्यासारखे भासते. असा हा श्रावण सणांनी आणि व्रतवैकल्यांनी भरलेला असतो. या श्रावणाची स्त्रिया आतुरतेने वाट पाहताना दिसतात तसेच शेतकरी देखील या श्रावणाची आतुरतेने वाट पहात असतो. मासेमारी करणारे मच्छीमार कोळी बांधव देखील या श्रावणाची आतुरतेने वाट पहात असतो.
श्रावण हा मराठी महिन्यातील पाचवा महिना. या महिन्यात श्रवण नक्षत्र येते त्यामुळे या महिन्याचे नाव श्रावण असे पडले. चातुर्मासातील हा महिना खूप महत्वपूर्ण मानला जातो. या महिन्यात अनेक सण, व्रतवैकल्ये येतात. या महिन्यातील प्रत्येक वाराला कोणते ना कोणते व्रत केले जाते तसेच उपवासही केले जातात.
● श्रावणातील व्रत पूजा -
● दीप पूजा -
आषाढ अमावस्या हिला दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी घरोघरी सर्व दिवे घासून स्वच्छ केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. कहाणी वाचन केले जाते. या दिवसापासून श्रावणातील व्रतांना प्रारंभ होतो. देवघरात नागनरसोबचे पान लावले जाते आणि त्याची पूजा केली जाते.
● सोमवार - यादिवशी महादेवाची उपासना करतात. दिवसभर उपवास करून शिवाला दूध, शिवामूठ अर्पण केली जाते, तसेच घरोघरी स्त्रिया कहाणी वाचन करतात.
● मंगळवार - यादिवशी मंगळागौर पुजली जाते. ज्या नवविवाहित स्रिया आहेत त्या पहिली पाच वर्षे मंगळागौरीचा उपवास करून तसेच विविध खेळ करून ती रात्र जागवतात.
● बुधवार - बुधाची पूजा केली जाते.
● गुरुवार - बृहस्पतीची पूजा करतात.
● शुक्रवार - या दिवशी जिवतीची, लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवसभर उपवास करून संध्याकाळी सवाष्णींना दूध-फुटाणे देऊन हळदी-कुंकू दिले जाते. जीवतीची कहाणी वाचली जाते. फोटोला दुर्वा-अगाडा वाहतात.
● शनिवार - या दिवशी शनी, मारुती, नरसिंहाची पूजा केली जाते.
● रविवार - यादिवशी सूर्याचे म्हणजे आदित्यचे पूजन करून आदित्यरानुबाईची कहाणी वाचली जाते.
अशाप्रकारे प्रत्येक दिवशी त्यात्या दिवसाचे महत्व सांगणारी कहाणी वाचली जाते. बरेचजण या महिन्यात सत्यनारायण पूजा देखील घालतात. दान करण्यासाठी हा महिना सर्वश्रेष्ठ मानला गेल्यामुळे या महिन्यात बरेचजण दान करताना दिसून येतात.
व्रतांबरोबर अनेक सण देखील येतात.
व्रतांबरोबर अनेक सण देखील येतात.
● श्रावणातील सण -
● नागपंचमी -
श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. नवविवाहीत स्त्रीला माहेरी आणले जाते. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या नागाची, वरुळाची पूजा केली जाते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीला बहिणी भावाच्या सुखुशाल आयुष्यासाठी उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी नागाची पूजा करून उपवास सोडतात. स्रिया सायंकाळी फेर धरून गाणी म्हणतात.
● श्रावण पौर्णिमा - नारळी पौर्णिमा
या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून पावसाळ्यामध्ये बंद असलेली मासेमारी सुरु केली जाते. यादिवशी नारळी भात आणि नारळाच्या वड्या घरोघरी केल्या जातात.
● रक्षबांधन -
नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो.
● श्रावण वद्य(कृ) अष्टमी (कृष्ण जन्माष्टमी) -
खूप सारे भाविक यादिवशी उपवास करतात आणि दुसऱ्यादिवशी गोपाळकाला दहीहंडी फोडून याची सांगता करतात.
● पिठोरी अमावस्या -
संतती प्राप्ती साठी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात. पिठोरीची कहाणी वाचतात. या अमावस्येच्या श्रावणाची सांगता होते.
माझ्या लग्नानंतर माझ्या सासूबाईंच्या सांगण्यावरून मी देखील प्रत्येक दिवशी त्या दिवसाची कहाणी वाचन करत असे. सोमवारी आमच्याकडे सर्वांचा उपवास असायचा. यासाठी साबुदाणा खिचडी, उपवासाची बटाट्याची भाजी, रताळ्याचा शिरा,नारळाची चटणी, उपवासाचे लिंबू लोणचे शिवाय बटाट्याचे तळलेले पापड असा बेत असायचा आणि सायंकाळी उपवास सोडण्यासाठी वालाचं बिरड केलं जायचं. शुक्रवारी जीवतीचा उपवास आणि शनिवारी मारुतीचा उपास केला जायचा.
असा हा श्रावण उद्या दीप पूजेने सुरु होतोय. सर्वांना या आनंदी श्रावणाच्या आनंदी शुभेच्छा !
• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का...
• आवडला का...
• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा.
• फॉलो करा.
धन्यवाद ! 🙏 ©सौ. सुचिता वाडेकर...✍️
0 टिप्पण्या