"महर्षी धोंडो केशव कर्वे "
©सौ. सुचिता वाडेकर... ✍️
महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था दि. १४ जून २०२० रोजी १२५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. कर्वे स्त्री-शिक्षण संस्था म्हणजे स्त्रियांवरील अन्याय, कालबाह्य रूढी व सामाजिक विषमतेविरुद्ध ठोस उपाययोजना करणारी भारतातील आद्य संस्था आहे.
स्त्रीची अस्मिता जागवण्यासाठी स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार, प्रचार व प्रत्यक्ष आचार करण्यासाठी गेले १२४ वर्षे संस्था कार्य करीत आहे.
हुशार होतकरू मुलींना अत्यन्त कमी खर्चात उत्कृष्ठ दर्जेदार शिक्षण, भोजन, सामाजिक सुरक्षा अशा सर्व सोईंनी युक्त निवासी वसतीगृह व शिक्षणाची सोय संस्थे मार्फत केली जाते. सध्या महिलाश्रम वसतिगृहामध्ये ५वी ते १२वी सुमारे १५०० विद्यार्थीनी आहेत.
समाजातील या गरजू गरीब विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता होती. ही पूर्ण करण्यासाठी महर्षी कर्वे यांचे सहकारी कै. श्री. गो. म. चिपळूणकर यांनी १९१९ साली 'भाऊबीज भेट' मंडळाची स्थापना केली. या योजनेला मागच्या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली. या योजनेचा लाभ घेऊन हजारो विद्यार्थीनी आपल्या पायावर उभ्या आहेत.
सन १८९६ ते २०२० अशी १२४ वर्षांची प्रदीर्घ वाटचाल संस्थेने केली आहे... त्यानिमित्त आज हे शब्दरुपी पुष्प मी अर्पण करते...⤵️
महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा पुनर्विवाह यासाठी आपले 104 वर्षांचे जीवन वाहिले ते धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. 1907 साली त्यांनी पुण्याच्या हिंगणे येथील माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरु केली.
Daycare for Aaji Aajoba : "आजी आजोबांचे पाळणाघर"
महर्षी कर्वेंनी एस. एन. डी. टी. या महिला विद्यापीठाचीही स्थापना केली. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून 1958 साली वयाच्या 100 व्या वर्षी त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी किताबाने गौरवण्यात आले.
अण्णांच्या या कार्यात त्यांची द्वितीय पत्नी गोदुबाई उर्फ आनंदी कर्वे उर्फ बाया कर्वे यांचा सक्रिय सहभाग होता. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अनिष्ठ रुढीत अडकलेल्या स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. 1896 मध्ये सहा विधवा महिलांना घेऊन 'अनाथ बालिकाश्रम काढला, विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली.
त्यांचे हे कार्य पाहून रावसाहेब गोखले यांनी अण्णांना हिंगणे येथील आपली सहा एकर जागा आणि 750/- रुपये संस्थेच्या उभारणी साठी दिले. आज अनेक वास्तूंनी गजबजलेल्या या परिसरात अण्णांची झोपडी उभी आहे.
'बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्र' मध्ये डिप्लोमा इन कौन्सेलिंग सायकॉलॉजी या कोर्सचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या निमित्ताने महर्षी कर्वे यांच्या या पावन भूमीत पाय ठेवण्याची संधी मला मिळाली आणि सहा एकरात पसरलेल्या या परिसराची, येथे चालणाऱ्या कार्याची जवळून ओळख झाली.
यापूर्वी माझ्या लहानपणी वाई येथील महर्षी कर्वे यांची कन्याशाळा एकदा पाहिली होती, निमित्त होते माझ्या मोठ्या चुलत बहिणीचा (जी त्यावेळी 10वी च्या बोर्डात 88% मार्क्स मिळवून पहिल्या 50 मध्ये आली होती) शाळेचा टिफिन द्यायला गेलो होतो, इतकाच काय तो संबंध कर्वे शिक्षण संस्थेशी आला होता.
कर्वे शिक्षण संस्थेमध्ये अभ्यास करताना महर्षी कर्वे यांच्या विषयी माहिती असणे आवश्यक असते त्यामुळे आमचा पहिला दिवस हा संस्था व्हिजिट होता.
या भेटीत आम्हाला आ. महर्षी कर्वेची समाधी, मेघडंबरी, तेथे स्थापिलेला कर्वेच्या कार्याचा जीवनपट, त्यांची हस्तलिखिते, पेहराव, या कार्यात त्यांना ज्यांची ज्यांची साथ लाभली त्यांची छायाचित्रे, त्यांच्या परिवाराची छायाचित्रे, त्यांना मिळालेला 'भारतरत्न पुरस्कार', 'पद्मविभूषण पुरस्कार' त्यांच्या कार्याचा गौरवपट हे सर्व अगदी जवळून पाहता आले आणि या असामान्य व्यक्तिमत्वाची नव्याने ओळख झाली.
या आवारातील बेकरीही आम्हाला अगदी आतून बघता आली, बेकरी प्रॉडक्ट्स कसे बनवले जातात, त्यासाठी असलेल्या अद्यावत मशिन्स, भट्टी, तयार होणारा माल, पॅकिंग करणाऱ्या मुली इ. सारे जवळून पाहता आले.
तसेच येथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या परिसरात असलेली स्वच्छता. येथील सुका आणि ओला कचऱ्यापासून तयार केलेला बायोगॅस प्रकल्प, महर्षी कर्वे आणि त्यांच्या पत्नी आनंदी बाई कर्वे जिथे राहात होते ती पावन वास्तू, तेथील हॉल, तेथे लावलेले असंख्य फोटो ज्यांनी कर्वे यांना त्यांच्या या महान कार्यात सोबत केली आणि त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले, कर्वेची झोपण्याची खोली, त्यांचे स्वयंपाकघर सर्वकाही अगदी जवळून पाहता आले.
येथे काम करणारी प्रत्येक व्यक्ती कर्व्यांचे हे महान कार्य पुढे चालवत असताना कर्व्यांच्या विचाराने प्रेरित झालेली दिसून येतो. हे महान कार्य चालू राहण्यात आपला देखील खारीचा वाटा आहे हा अभिमान त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येतो.
कर्वेंचे समाधीस्थान येथील व्यवस्था पाहणारे देशपांडे काका असो किंवा संस्था फिरून दाखवणाऱ्या निशा मॅडम असो अथवा बायोगॅस प्रकल्पाविषयी भरभरून बोलणारे श्रीयुत शहापुरकर असोत, अगदी गेटवरील वाचमनपासून सर्वचजण सहकार्याने वागताना दिसून येतात.
या सर्वांना पाहून गीतकार जगदीश खेबूडकरांचे गीत आठवते ....
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा ।
पिता-बंधू-स्नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा ।
जिथे काल अंकुर बिजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा ।
शिकू धीरता, शूरता,वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा ।
जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा ।
तुझी त्याग सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ती राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा ।
आम्ही चालवू हा पुढे वारसा ।।
या ओळी महर्षी कर्वेंच्या महान कार्याला आणि ते कार्य पुढे चालवणाऱ्या प्रत्येकाला अगदी समर्पकपणे लागू पडतात.
या संस्थेतील महत्वाचा भाग म्हणजे येथे असलेली अद्यावत लायब्ररी. येथे अभ्यास करत असलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीला सकाळी दहा ते सहा यावेळेत वर्षभर येथील लायब्ररी आणि इ-लायब्ररी अगदी मोफत वापरता येते. यावरून एवढंच जाणवतं की देणाऱ्याने खूप काही देऊ केलंय, फक्त घेणाऱ्याला ते घेता आले पाहिजे.
हे सगळं पाहिल्यावर येथे मला माझ्या शालेय जीवनात अभ्यासलेल्या विंदा करंदीकरांच्या कवितेच्या काही ओळी आठवतात त्या अशा ....
'देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावेत"
या ओळींचा अर्थ असा आहे की देणाऱ्याने नेहमी देतच राहावे आणि घेणाऱ्याने मात्र घेता घेता देणाऱ्याचे दातृत्वही घ्यावे आणि हे कार्य अविरत अखंड पुढे चालू ठेवावे.
• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का...
• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा.
• फॉलो करा.
• Suchita's Recipe या FB पेजला भेट द्या.. आवडल्यास Like करा... फॉलो करा.
धन्यवाद ! 🙏
©सौ. सुचिता वाडेकर...✍️
0 टिप्पण्या