"भाकरीचा चिवडा"
Marathi Recipe : "भाकरीचा चिवडा" एक पोटभरीचा नाष्टा |
परवा पोळ्या करत असताना दोन तीन पोळ्यांची कणिक कमी पडत होती, आता तेवढ्यासाठी कुठे कणिक मळू म्हणून कणिक मळण्याचा कंटाळा केला, म्हटले चला एखादी भाकरी टाकुयात.
भाकरी करताना विचार आला की बरेच दिवस झाले भाकरीचे तुकडे (पुणेरी भाषेत भाकरीचा चिवडा) केले नाहीत म्हणून मग दोन भाकरी जास्त केल्या. शिळ्या भाकरीचा हा चिवडा खूप छान लागतो.
माझ्या माहेरी रोज सकाळी आणि संध्याकाळी भाकरीच केली जायची.. घरात कोणाचा उपवास असेल त्या दिवशी संध्याकाळी चपात्या म्हणजे पोळ्या केल्या जात असत. त्यामुळे कधी कधी भाकरी उरत मग आई त्याचे दुसऱ्या दिवशी भाकरीचा चिवडा करायची. याला भाकरीचे तुकडे असे देखील म्हणत.
हा चिवडा कधी हिरवी मिरची, लसूण घालून करत तर कधी कांदा लसूण मसाला घालून करत. दोन्ही पद्धतीने छान लागतो पण मला हिरव्या मिरचीचा खुप आवडतो. पोहे बनवतो त्याप्रमाणे बनवायचा.. भाजलेले शेंगदाणे घालायचे त्याने एक वेगळी चव येते.
Marathi Recipe : "भाकरीचा चिवडा" एक पोटभरीचा नाष्टा |
चला तर पाहुयात "भाकरीचा चिवडा" ची रेसिपी ⤵️
साहित्य :
ज्वारीच्या भाकरी - 2
कांदा - 1
भाजलेले शेंगदाणे - पाव वाटी
लसूण 3-4 पाकळ्या
हिरवी मिरची 4-5
हिंग पाव चमचा
हळद पाव चमचा
मीठ आवश्यकतेनुसार
तेल 2Tbsp
लिंबू
कोथिंबीर
कृती :
प्रथम भाकरीचे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घ्यावेत. मिरची, लसूण, जिरे आणि थोडे मीठ मिक्सरला बारीक करून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा. यानंतर गॅसवर एका कढईत तेल घालावे व शेंगदाणे तळून घ्यावे. हिंग, हळद, कडीपत्त्याची फोडणी करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा व थोडा परतावा. यानंतर लसूण, हिरवी मिरची, जिरे याचे मिक्सरला बारीक वाटण करून कांद्यामध्ये घालावे. थोडे परतल्यावर त्यामध्ये मिक्सरला फिरवलेली भाकरी आणि तळलेले शेंगदाणे घालावेत. मीठ घालून पाण्याचा हबका मारावा आणि झाकण ठेवावे. दोन तीन मिनिटांनी झाकण काढून हलवून घ्यावे. वरून मस्तपैकी लिंबू पिळून कोथिंबीर घालावी आणि गरमागरम सर्व्ह करावा 'भाकरीचा चिवडा'
Marathi Recipe : "भाकरीचा चिवडा" एक पोटभरीचा नाष्टा |
टीप : यासाठी भाकरी शक्यतो सकाळी चिवडा बनवणार असाल तर आदल्या दिवशी रात्रीच्या वापराव्या आणि संध्याकाळी पाच वाजता बनवणार असाल तर भाकरी सकाळी केलेल्या वापराव्या.
• कशी वाटली रेसिपी..
• आवडली का..
• मग तुम्ही बनवा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
• आणि हो रेसिपी आवडल्यास जरूर शेअर करा.. पण माझ्या नावासहित.
• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.
धन्यवाद! 🙏🏻
©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️
0 टिप्पण्या