अलक... (अति लघूकथा) एका वाक्यात बरंच काही सांगून आणि शिकवून जाणाऱ्या कथा...

 अलक...!

(अति लघूकथा)







एका वाक्यात बरंच काही सांगून आणि शिकवून जाणाऱ्या कथा...



१. लॉकडाउन मुळे अकरा वर्षाच्या एकुलत्याएक मुलीला स्वतःहुन घरात कामात मदत करताना पाहून, 'मुलीला वळण कसं लावू?' हा तिला पडलेला प्रश्न आपोआप निकालात निघाला...



२. स्वतः भाजी निवडून स्वयंपाक करणाऱ्या बायकोची आणि बनवलेल्या स्वयंपाकाची किंमत त्याला तेव्हा कळली जेव्हा त्याने स्वतः निवडलेली गवारची भाजी खाल्ली...



३. सुनेचा मुल दत्तक घेण्याचा निर्णय मनापासून मान्य नसणाऱ्या सासूबाई जेव्हा मृत्यूशैयेवर असताना सुनेने मनापसून केलेली सेवा पाहून म्हणाल्या, "चुकलंच आमचं, आम्ही तुला साथ द्यायला हवी होती"...  हे वाक्य ऐकून सुनेचे कृतकृत्य होऊन डोळे वाहू लागले...



४. सोशल मीडियावर मुलीच्या व्हिडीओला,  "छान बाळा" अशी कमेंट करणारी व्यक्ती आजी किंवा काकू असावी असे समजून मुलीतर्फे Thank u काकू असे उत्तर देणाऱ्या तिला जेव्हा समजते कि ती व्यक्ती अठरा वर्षाची मुलगी आहे तेव्हा तिची हसून पुरेवाट होते... मात्र 10-11 वर्षाच्या मुलीला 18 वर्षाची मुलगी कशी काय बाळा म्हणू शकते या आश्चर्या सहित ती कानाला खडा लावते...



५. घरी राहणाऱ्या स्त्रीकडे तुच्छतेने बघणाऱ्या प्रत्येकाला  लॉकडाउनमुळे तिची खरी किंमत कळली... 



६. लग्नापूर्वी 'अगं, थोडातरी स्वयंपाक शिक' म्हणून मागे लागणाऱ्या आईला, 'वेळ आल्यावर करेन गं' असे उत्तर देणारी मुलगी जेव्हा लग्नानंतर मऊ लूसलूशीत पोळ्या करु लागली त्यावेळी त्या मातेचे मन समाधानाने  प्रसन्न झाले...



७. माणुसकी विसरलेल्या, जग स्वतःपुरतं सीमित ठेवणाऱ्या, घड्याळाच्या काट्याला बांधलेल्या आणि पैशाच्यामागे धावणाऱ्या या माणसाला हा कोरोना विषाणू 'जीवन हे क्षणभंगुर आहे' हे दाखवून 'मृत्यूचे भय' देऊन जगायला शिकवून गेला.


© सौ. सुचिता वाडेकर... ✍️



• एका वाक्यात बरंच काही सांगून आणि शिकवून जाणाऱ्या या कथा आवडल्यास जरूर शेअर करा…


•पण माझ्या नावासहित. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद! 🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या