Marathi Recipe : How to make Stuffed Mashroom

 Stuffed Mashroom 

#MarathiRecipe 







तुम्ही हॉटेल मध्ये मशरूमची भाजी खाल्ली असेल. मशरूम थोडे गीळगीळीत लागतात त्यामुळे बऱ्याचदा दोन तीन भाज्यांचे कॉम्बिनेशन करून बनवलेले मशरूम जास्त चांगले लागते. उदा. काजू + मशरूम, मशरूम + पनीर, मिक्स व्हेज + मशरूम  इत्यादी. स्टफ मशरूम देखील तुम्ही हॉटेल मध्ये खाल्ले असतील. भाजी पेक्षा हे स्टफ मशरूमच जास्त टेस्टी लागतात. मशरूमच्या भाजीपेक्षा स्टफ मशरूम बनवायला अतिशय सोपे आहेत. 


एकदा माझ्या मुलीच्या आग्रहाखातर मी स्टफ मशरूम बनवले आणि ते इतके टेस्टी झाले.. इतके टेस्टी झाले की सगळे एका झटक्यात संपले आणि शेवटी सगळेजण नुसते बोटं चाटत राहिले. तेव्हापासून आमच्याकडे मशरूमच्या भाजी ऐवजी स्टफ मशरूमच बनवले जातात. मलाही अतिशय आवडतात. तृप्ती म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर नक्की स्टफ मशरूम बनवा आणि तुम्ही स्वतःच अनुभवा. 


आता हे स्टफ मशरूम बनवायचे कसे? तर अगदी साधी simple रेसिपी आहे.. साहित्य देखील अगदी कमी लागते.. कोणीही सहज बनवू शकता.. फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. 






Stuffed Mashroom


 साहित्य : ⤵️


• मशरूम - 1 पॅकेट 

• कांदे - 2 मिडीयम 

• चीझ क्यूब - 2

• काळा मसाला - अर्धा चमचा 

• लालतिखट - अर्धा चमचा

• हिंग - पाव चमचा 

• हळद - पाव चमचा 

• तेल - 4 चमचे 

• मीठ - आवश्यकतेनुसार 


कृती : ⤵️


• प्रथम मशरूम स्वच्छ धुवून घ्यावेत. 


• मशरूमचे दांडे काढून घ्यावेत. 


• दांडे बारीक चिरून मिक्सरला बारीक करावेत. 


• कांदे बारीक चिरून घ्यावेत. 


• गॅसवर काढई ठेऊन त्यात चार चमचे तेल घालावे. 


• तेल तापल्यावर त्यात हिंग, हळद घालून बारीक चिरलेला कांदा घालावा व परतावे. 





• यानंतर यात मिक्सरला बारीक केलेले दांडे, लाल तिखट, काळा मसाला, मीठ घालून परतावे. 





• यानंतर यात एक चीझ क्यूब किसून घालावे व दोन मिनिटे परतून गॅस बंद करावा. आपले स्टफिंग तयार झाले. 





• तयार झालेले स्टफिंग चमचाच्या साहाय्याने मशरूम मध्ये भरावे. 






• स्टफ केलेल्या मशरूमवर उरलेले चीझ क्यूब किसून घालावे व सारे मशरूम तेल लावलेल्या एका पॅन अथवा कढई मध्ये ठेवून द्यावेत. 






• ही मशरूमची कढई गॅस वर ठेवावी व त्यावर झाकण ठेवावे. 


• दोन मिनिटांसाठी गॅस मोठा ठेवावा व नंतर बारीक करून ठेवावा. 


• दहा मिनिटांनी सुंदर सुवास दरवळू लागतो मग कढईवरील झाकण काढावे. 






• मशरूमला थोडे पाणी सुटलेले दिसेल. पाच मिनिटांनी हे पाणी आटून जाईल मग गॅस बंद करावा. 


• आपले स्टफ मशरूम खायला तैयार आहेत. 







कशी आहे रेसिपी.. 


नक्की बनवा आणि कशी झाली ते मलाही कळवा.


धन्यवाद! 🙏🏻

©सौ.सुचिता वाडेकर.. ✍🏻




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या