'लॉक डाउन दिवाळी अंक स्पर्धा' मधील पत्र - 'पत्रास कारण की...'

 


'लॉक डाउन दिवाळी अंक स्पर्धा' मधील पत्र ⤵️

#लॉकडाउन 
#दिवाळी_अंक 
#स्पर्धा 
#आठवण 
#मनोगत 
#पत्रलेखन 

'पत्रास कारण की...'




प्रिय प्रभू,
साष्टांग दंडवत ! 🙏

     पत्रास कारण की... 

     खूप दिवसांपासून मनात होते तुला पत्र लिहायचे, आज तो योग आला. लहानपणापासून जसं मला कळायला लागलं तसं मी तुला वेगवेगळ्या मूर्तींमध्ये पाहिलं. राम असो, कृष्ण असो, गणपती असो, महादेव असो, विठू माऊली असो, साई बाबा असो किंवा स्वामी समर्थ असो. संकट समयी तुझा धावा केला की तू धावून येतोस म्हणजे लढण्याची शक्ती देतोस, माहीत आहे मला. 


     मी देखील अनेकदा हा अनुभव घेतलाय याचा. बऱ्याचदा ऐकलंय, 'जशी श्रद्धा तशी अनुभूती' आणि हे खरं देखील आहे बरं! जो तुझं अस्तित्व मानतो अशा प्रत्येकाला तू कोणत्या ना कोणत्या रूपाने भेटतोस. प्रत्येकाच्या मनात तू आहेस, फक्त तुझी रूपे वेगवेगळी आहेत. जसे की झाडाचं खोड, मूळ एकच असते मात्र त्याला फांद्या अनेक असतात. 


     तुला एक मनापासून विचारावसं वाटतं. मनात अनेकदा विचार येतो की हि जन्म-मृत्यूची साखळी तू का बरं बनवली असशील? हि पृथ्वी, हे ग्रह तारे, हे अंतरिक्ष, पृथ्वी वरील जीवसृष्टी, वेगवेगळे अगणित प्राणी, कीटके, त्यांच्या प्रजाती ज्या एकमेकांवर अवलंबून आहेत आणि मुख्य म्हणजे मनुष्यप्राणी का बरं बनवला असशील? 


     या मनुष्यप्राण्याला तू बुद्धी दिलीस.. ज्याच्या जोरावर त्याने आजवर एवढी प्रगती केलीय, विज्ञानाचे चमत्कार केलेत. वाचा दिलीस,  चांगले बोलण्यासाठी ज्याने फक्त मनुष्यप्राणीच बोलू शकतो. त्याद्वारे आपल्या भावना, विचार व्यक्त करू शकतो.


     मन आणि भावना दिल्यास.. ज्यात तू सुख, शांती, आनंद, प्रेम, शक्ती, पवित्रता आणि ज्ञान हे सात गुणही दिलेस. दृष्टी दिलीस हे सुंदर जग पाहण्यासाठी. कान दिलेस चांगल्या गोष्टी श्रवण करण्यासाठी. हात-पाय दिलेस काम करण्यासाठी आणि सोबत वीतभर पोटही दिलेस हव्यासासाठी. 


     पण या हव्यासापोटी या साऱ्याचा(सात गुण) हळूहळू ऱ्हास होऊन त्याची जागा राग, लोभ, मद, मोह, मत्सर, द्वेष, अहंकार यांनी घेतलीय. खून, चोऱ्या, मारामाऱ्या, फसवणूक, भ्रष्टाचार, बलात्कार, आत्महत्या, या सगळ्यांना जणू उत आलाय.


     सगळीकडे नुसता भ्रष्टचार बोकाळलाय. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. परीक्षेत पास व्हायचे असेल, एखादे काँट्रॅक हवे असेल,  नोकरी हवी असेल, साधे ड्रायव्हिंग लायसन काढायचे म्हटले तरी खिसा गरम केल्याशिवाय काम होत नाही. या भ्रष्ट झालेल्या यंत्रणेमुळे लाच देऊन सुटणारा गुन्हेगार राजरोस हिंडताना दिसतोय; मात्र यात भरडला जातोय तो फक्त सामान्य माणूस ज्याच्याजवळ लाच देण्यासाठी पैसे नाहीत. 


     सर्वसामान्य शेतकरी ज्याचे आख्खे कुटुंब त्याच्या शेतीवर अवलंबून आहे. ती शेती कसण्यासाठी आज त्याच्याकडे पैसे नाहीत, पिकवलेल्या त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. या शेतकर्यापेक्षा त्याचा माल विकत घेणारे व्यापारी दलाल मात्र बक्कळ पैसे कमावताना दिसतात. कष्ट करून प्रामाणिकपणे शेती करणारा शेतकरी मात्र दुर्लक्षिला जातोय. 


     स्वतःच्या आणि बायकापोरांच्या पोटाची खळगी भरण्याऐवढेही पैसे आपण कमवू शकत नाही याची लाज वाटून शेतकरी आत्महत्या करू लागलाय. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत चाललाय. पहातोयस ना तू हे सगळं... मग गप्प का आहेस?


     कोवळ्या कळ्यांना उमलण्याआधीच चुरगळले  जातेय आणि हे पाप करणारा बलात्कारी राजरोस हिंडताना दिसतोय. मुलगी आहे म्हणून कोवळ्या अर्भकांना या जगात येण्याआधीच मारले जातेय, पण माणूस हे का विसरतोय की हे जीवन जे तो जगतोय ते एका स्त्रीने त्याला जन्माला घातले आहे म्हणून.


     प्रभू, बास! आता हे कुठेतरी थांबायला हवं. एकीकडे नितीमूल्यांचा ऱ्हास होत असताना दुसरीकडे विज्ञान प्रगतीची कमान उंचावत आहे, विज्ञानाचे चमत्कार अचंबित करत आहेत. २२ जुलै २०१९ रोजी श्रीहरीकोटा येथून चंद्रयान-२ अवकाशात यशस्वी झेपावले माहीत आहे ना तुला.


     मानवाने केलेली हि विज्ञानाची प्रगती तूच तर घडवून आणलीस... तूच त्याची निवड केलीस. हो, 'एक होता कार्व्हर' हे मीरा गव्हाणकर यांचं मराठी अनुवाद असलेल पुस्तक मी वाचलय. 'कार्व्हर' म्हणजे वर्णद्वेशांच्या देशात गुलामाच्या पोटी जन्माला आलेल, मरता-मरता जगलेल, प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम शिक्षण घेऊन विविध शोध लावून जगाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणार एक महान व्यक्तिमत्व, एक अजब रसायन. 


     तूच मानवाला ज्ञान दिलेस, तूच मानवाकडून वेगवेगळे शोध लावून घेतलेस, तूच त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केलीस. असे असताना देखील काही दुष्ट लोकांच्या जगावर राज्य करण्याच्या अतिदुष्ट महत्वकांक्षेच  आज सगळं जग बळी ठरलंय. गेले सहा-सात महिने कोरोना नावाच्या (कोविड-१९) विषाणू मुळे सार जग हादरलय. त्यापाई सरकारला लॉकडाउन  करावा लागला, सगळे उद्योगधंदे बंद झाले, कंपन्या, व्यापार, शाळा-कॉलेजेस, हॉटेल्स सार-सार बंद झालं. माणसाला चार भिंतीच्या पिंजऱ्यात कैद व्हावं लागलं.  


     सुरुवातीला चांगली वाटणारी ही कैद नंतर मात्र कधी संपेल असे वाटू लागली. तशी ती संपली देखील, मात्र कोरोनाची टांगती तलवार प्रत्येकाच्याच डोक्यावर तरंगू लागली आणि सारी मानवजात त्याने हादरून गेली. आज एवढे महिने होऊन देखील कोरोनावर लस शोधन्यास शास्त्रज्ञाना यश मिळाले नाही, असे का बरे? 


     कधी-कधी वाटतं, 'हि सृष्टी एक रंगमंच आहे आणि आपण आहोत या रंगमंचावरील फक्त प्यादी'. पण मला नाही म्हणायचं की जे वाईट घडते आहे तेही सर्व तू घडवतोस. मग हे सर्व पाहून तू गप्प तरी का बसतोस..? का नाही वेळीच शिक्षा करत दुष्ट प्रवृत्तीच्या या लोकांना? 


     मला मान्य आहे की हे शरीर नाशवंत आहे. जन्माला आलो तेव्हा बरोबर काही आणले नव्हते आणि जातानाही बरोबर काही घेऊन जाणार नाही हे माहीत असून देखील प्रत्येकाला एवढा हव्यास का आहे..? मी, मला, माझं.. करून-करून भाऊ-भाऊ पक्के वैरी होत चाललेत... असं का?


     कधी-कधी वाटतं की नको तो हव्यास, नको ते हेवे-दावे, नको ते कसले पाश, नकोत ती बंधनं. सगळं झुगारून टाकावं आणि बसावं तुझ्या चिंतनात, शांत आणि निमग्न होऊन जावं, जिथं फक्त तुझंच अस्तित्व असेल. पण हे काही काळापुरतंच घडतं रे... पुन्हा ये रे माझ्या मागल्या आहेच. 


     प्रभू, तुझी हि लीला अगाध आहे, न समजणारी आहे. प्रत्येकजण जन्माला येतो ते त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार म्हणून संत महात्मे(ज्यांना तुझं अस्तित्व जाणवलंय) सांगतात की चांगले कर्म करा. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना या त्याच्या पूर्व कर्मावर अवलंबून असतात आणि वर्तमानातील कर्मावर त्याचे पुढील जीवन अवलंबून असते. 


     प्रभू, प्रत्येकाचा हा जमाखर्च एवढा चोख कसा काय ठेवू शकतोस तू..?  याचे खूप आश्चर्य वाटते आणि कुतूहलही.


     देवा, एक विनंती आहे, ऐकशील? आता अंत नको पाहू, लवकर शास्त्रज्ञाना कोरोनाच्या या महामारीवर लस निर्माण करण्यास यश दे आणि सर्व उद्योगधंदे, शाळा कॉलेजेस सर्व काही पुन्हा लवकर सुरळीत चालू होऊ दे.  हिच तुझ्या चरणी मनापासून प्रार्थना ! 


     शाळेविना कोमेजलेल्या या फुलांना नवचैतन्य देशील? 

🙏🙏 ऐकशील एवढं...? 



तुझी एक भक्त, 

© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर... ✍🏻

धन्यवाद..! 🙏🏻







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या