Marathi Recipe : "गुळ, शेंगदाणा, खजुराचे पौष्टीक लाडू" मुलांनी खायलाच हवा असा पदार्थ. नोट करा याच्या सेवनाचे फायदे.

"गुळ, शेंगदाणा, खजुराचे पौष्टीक लाडू"

मुलांनी खायलाच हवा असा पदार्थ


©सौ. सुचिता वाडेकर... ✍️


"गूळ, शेंगदाणा, खजूर चे पौष्टिक लाडू" 


        शेंगदाणा गुळ, खजुराचे हे लाडू अगदी झटपट होतात... बनवायला अगदी सोपे आहेत. याला लागणारे साहित्य घरी सहज उपलब्ध असते. बऱ्याचदा बाजारात हे लाडू विकत मिळतात..  साधारणत: सहा लाडूच्या पॅकची किंमत जवळजवळ रु. ११०/- एवढी असते. 


        याच किमतीचे शेंगदाणे, गुळ, खजूर विकत आणलेत आणि खाली सांगितलेल्या रेसिपी नुसार लाडू बनवलेत तर सहा ऐवजी भरपूर लाडू तुम्हाला खायला मिळतील.  मात्र यासाठी बनवण्याची मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. खाली दिलेल्या प्रमाणात ३० ते ३२ लाडू आरामात होतात.  


        लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यत सर्वांसाठी शरीरातील लोहाचे प्रमाण भरून काढण्यासाठी हे लाडू अगदी उत्तम पर्याय आहेत. तसेही नुसते गुळ अन शेंगदाणे फारसे खाल्ले जात नाहीत.


        नुसता खजूर माझी लेक खायची नाही म्हणून मग एके दिवशी गुळ-शेंगदाण्याचे लाडू करताना मी त्यात खजूर घातला आणि लाडू केले. एक लाडू लेकीला खायला दिला... लाडू मग कोणताही असो माझ्या लेकीला खूप आवडतो हे मला माहित होते अन झाले ही तसेच... तिला हा लाडू प्रचंड आवडला. माझा हेतू सफल झाला. 


• तुम्हीही करून पहा.. 


• चला तर मग याचे आधी फायदे बघुयात आणि मग रेसिपीकडे वळूयात.....



• गुळ, शेंगदाणा आणि खजुर यांच्या सेवनाचे फायदे...


       गुळ-शेंगदाणे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायक आहेत. गुळ-शेंगदाण्यात प्रथिने आणि कैल्शियम असल्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात. गुळ-शेंगदाणे खाल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. गुळामुळे पोटात गॅस होणे, अपचन होणे या समस्यांना दूर ठेवले जाते त्यामुळे जेवण केल्यानंतर रोज गुळाचा एक खडा जरूर खावा. 


       खजुरात जास्त प्रमाणात पोषणमूल्ये असल्याने आहारात याचा समावेश जरूर करावा. विशेषतः लहान मुले आणि महिलांनी खजूर खाल्ल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. अर्थात सर्वांनीच रोज खजूर खावा. 


        खजुरात ‘अ’, ‘ब’, ‘क’ जीवनसत्व आणि लोह असल्यामुळे आपल्या शरीराला रोजची गरजेची असलेली पोषकतत्वे मिळत असल्याने खजुराला पूर्ण अन्न म्हटले जाते. वजन कमी असलेल्या लहान मुलांना रोज २ खजूर खाण्यास द्यावेत अन ते खजूर खात नसतील तर हा लाडू उत्तम पर्याय आहे.


       खजुरामध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने हिमोग्लोबिनची कमतरता भरुन काढण्यास मदत होते. खजुरात कॅल्शियमही जास्त प्रमाणात असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.


       एखादवेळी शरीरातील ताकद अचानक कमी झाल्यासारखे वाटल्यास दोन ते तीन खजूर खावेत. खजुरात ग्लुकोज असल्याने एकदम तरतरी येते.


       अशक्तपणा खास करून महिलां मध्ये आढळतो. ज्यांना अशक्तपणा असतो ते लोक रक्तदान करू शकत नाहीत. खजूरा मध्ये आयर्न मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे खजूराच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते तसेच शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, यामुळे थकावा दूर होतो.


       अशा या बहुगुणी असलेल्या "शेंगदाणा गुळ, खजुराचे पौष्टीक लाडू" ची झटपट रेसिपी पहा खाली व्हिडीओ मध्ये सुद्धा... 



"गूळ, शेंगदाणा, खजूर चे पौष्टिक लाडू" 



◆ साहित्य : ⤵


● १/२ किलो शेंगदाणे

● पाव किलो काळा खजूर

● पाव किलो गुळ



◆ कृती : ⤵


१. प्रथम शेंगदाणे भाजून त्याची साले काढून त्याचा कूट करून घ्यावा. यात तुम्ही बदामही घालू शकता.


२. खजूर पाच मिनिटे पाण्यात घालून ठेवावे आणि खजूरातील बिया काढून खजूर स्वच्छ धुऊन घ्यावेत.


३. गुळ विळीवर बारीक करून घ्यावा.


४. यानंतर हे सर्व साहित्य एकत्र करावे आणि मिक्सरच्या भांड्यात एकजीव करून घ्यावे  करून घ्यावे.


५. तयार झालेल्या या मिश्रणात २ ते ३ चमचे तूप घालावे आणि लाडू वळावेत.


६. आपले झटपट "शेंगदाणा, गुळ, खजुराचे पौष्टीक लाडू" तैयार !



"गूळ, शेंगदाणा, खजूर चे पौष्टिक लाडू" 


टीप : तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. ड्रायफ्रूट्स हलकेसे गरम करून घ्या आणि मिक्सरला बारीक करून मिक्स करा.

• कशी वाटली रेसिपी..

• आवडली का..


• मग तुम्ही बनवा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.


• आणि हो रेसिपी आवडल्यास जरूर शेअर करा.. पण माझ्या नावासहित.

• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

धन्यवाद! 🙏🏻

©सौ सुचिता वाडेकर...✍🏻️







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या