दिवाळी_फराळ
#चकली
दिवाळी म्हटलं कि चकली Chakali हि हवीच; मग ती भाजणीची असो, मैद्याची असो, तांदळाची असो कि गव्हाच्या पिठाची असो. यामध्ये भाजणीचेही वेगवेगळे प्रकार आहेत; शिवाय प्रत्येकीच्या हाताची वेगळी चव त्यामुळे अनेक चवींची चकली पहायला मिळते. मात्र खमंग, कुरकुरीत चकली सर्वानाच जमते असे नाही, थोडं जरी प्रमाण बिघडलं तर चकली फसू शकते.
चकली तळताना देखील काळजी घ्यावी लागते. एकदा तेल तापलं की मिडीयम गॅसवर चकली तळावी. एकदा का ही चकली तेलात सोडली की सारखे हलवू नये अन्यथा चकली तुटू शकते. तेलाचे बुडबुडे येणे बंद झाले की चकली पालटावी व दुसऱ्या बाजूने सोनेरी रंगावर चांगली तळली गेली की झऱ्याच्या सहाय्याने काढून घ्यावी.
मोठ्या गॅसवर चकली तळली तर वरून लाल व आतून कच्ची राहू शकते ज्यामुळे नंतर ती नरम पडू शकते. त्यामुळे चकली ही मंद आचेवर तळावी अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहते.
तर अशी ही तुमची, माझी, सर्वांचीच आवडती चकलीची अगदी सोपी पद्धत आपण पाहुयात.. ⤵️
#चकली_रेसिपी
● साहित्य :
• तांदूळ पीठ १ वाटी
• पंढरपुरी डाळे १ वाटी
• अर्धी वाटी पोहे
• अमूल बटर २ चमचे
• पांढरे तीळ २ ते ३ चमचे
• ओवा १ चमचा
• लाल मिरची पावडर २ चमचे
• मीठ आवश्यकतेनुसार
● कृती :
१. प्रथम मिक्सरला पंढरपुरी डाळे बारीक करावेत.
२. पोहे थोडेसे गरम करून मिक्सरला बारीक करावेत.
३. यानंतर एका भांड्यात तांदूळ पीठ, डाळे पीठ, पोहे पीठ एकत्र घ्यावे.
४. यात बटर, तीळ, लाल तिखट, ओवा (हातावर थोडा चोळून घ्यावा) व मीठ घालावे आणि पाणी घालून मळून घ्यावे.
५. यानंतर गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे.
६. तेल तापल्यावर गॅस बारीक करावा व सोऱ्याला आतून तेल लावून त्यात पिठाचा गोळा भरून सोऱ्याच्या सहाय्याने चकल्या बनवाव्यात व मध्यम आचेवर तळाव्यात.
७. आपली खुसखुशीत बटर चकली तैयार !
© सौ. सुचिता वाडेकर...✍
0 टिप्पण्या