"झटपट होणारी बटर चकली" एकदा कराल तर पुन्हा पुन्हा कराल आणि विकतची चकली विसरून जाल

 

बटर चकली 


"झटपट बटर चकली..."


          पूर्वजांनी आखून दिलेले आणि त्यानुसार पूर्वापार चालत आलेले हे सण, उत्सव आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहेत हे आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या ऋतुमध्ये त्या त्या हवामानानुसार व येणाऱ्या पिकानुसार, फळे, भाज्या या, त्या त्या हवामानातील पचन शक्तीच्या आधारे.. कोणत्या गोष्टी मानवी शरीरासाठी योग्य आहेत यांचा सखल अभ्यास करून हे सण, उत्सव आखले गेले आहेत हे थोड्याश्या अभ्यासावरूनही आपल्या लक्षात येते.


         तरीसुद्धा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आरोग्यासाठी हानिकारकच असतो हेही तितकेच खरे आहे. आता हेच बघा ना.. हिवाळा असल्यामुळे तळलेले पदार्थ खाल्ले तरी त्याचे व्यवस्थित पचन होते, त्यामुळे असे पदार्थ हिवाळ्यात केले जातात. दिवाळी पासून खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होते आणि थंडीचे स्वागत या तळलेल्या पदार्थानी केले जाते. 


          या पदार्थातील सगळ्यांच्या आवडीची असेल तर ती म्हणजे "चकली". या चकल्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत, कुणी भाजणीची करते तर कुणी पीठ वाफवून करते. चकली बनवणं हि एक कला आहे ती जीला जमली ती खरी सुगरण आहे असं खात्रीने म्हणायला हवं असं मला मनापासून वाटतं. 


         सुरुवातीला माझीही चकली नेहमी बिघडे, त्यामुळे चकली करायची मला फार भीती वाटत असे. कधी मऊ पडे तर कधी विरघळे. एकदा असेच माझ्या बहिणीबरोबर याविषयी बोलणे झाले तेव्हा तिने मला सोपी रेसिपी सांगितली होती... त्याप्रमाणे मी चकली बनवली आणि सुंदर झाली. थँक्स ताई! 😊


         मागच्या वर्षी दिवाळीत म्हटले चला थोडा चेंज म्हणून 'बटर चकली' करून बघुयात म्हणून मग यात लाल तिखट अगदी नावाला घातले आणि थोडा तिखटपणा यावा म्हणून मिरी पावडर घातली आणि चकली बनवली. अतिशय सुंदर झाली, थोडीच बनवल्यामुळे लगेच संपली. त्यानंतर मात्र माझ्या मुलीच्या आग्रहामुळे पुन्हा-पुन्हा बनवली गेली आणि यात माझा हातखंडा बनला. 


          अगदी झटपट होणारी अशीच ही चकली आहे. यावर्षी येणाऱ्या दिवाळीत तुम्हीही करून बघा ही 'झटपट बटर चकली'! अतिशय सोपी, थोडी वेगळी, टेस्टी आणि जरा हटके..!  ❤️❤️


नक्की करून बघा.. 👍👍


#झटपट_बटर_चकली 


साहित्य :


• तांदूळ पीठ 2 वाटी


• पंढरपुरी डाळे 1 वाटी


• अर्धी वाटी पोहे 


• अडीच चमचे (50 ग्रॅ.) अमूल बटर


• पांढरे तीळ 2 ते 3 चमचे 


• मिरी पावडर 1 चमचा


• लाल मिरची पावडर अर्धा चमचा


• मीठ आवश्यकतेनुसार 



कृती :


1. प्रथम मिक्सरला पंढरपुरी डाळे बारीक करावेत. 


2. पोहे थोडेसे गरम करून मिक्सरला बारीक करावेत. 


3. यानंतर एका भांड्यात तांदूळ पीठ, डाळे पीठ, पोहे पीठ एकत्र घ्यावे.


4. यात बटर, तीळ, लाल तिखट, काळी मिरी पावडर व मीठ घालावे... 


5. आणि पाणी घालून मळून घ्यावे. 


6. यानंतर गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे. 


7. तेल तापल्यावर गॅस बारीक करावा व सोऱ्याच्या सहाय्याने चकल्या बनवून मध्यम आचेवर तळाव्यात. 


8. आपली खुसखुशीत बटर चकली तैयार !


बटर चकली 


© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर...✍


         


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या