चतुर्थ अध्याय पूर्वार्ध 1-10 श्लोकांचे मराठीत निरूपण




चतुर्थ अध्याय पूर्वार्ध 1-10 श्लोकांचे मराठीत निरूपण 


श्री भगवानुवाच

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम

विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेs ब्रवीत ll 1 ll



इमं म्हणजे अविनाशी योग ज्याला कोणी भक्ती योग संभोदतो तर कोणी कर्मयोग, तर कोणी ज्ञानयोग संभोदले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणातात, हे अर्जुना असे हे अविनाशी ज्ञान (योग) या कल्पाच्या आरंभी मी विवस्वानाला म्हणजेच सूर्याला सांगितले होते. विवस्वान म्हणजे सूर्य आदितीच्या बारा पुत्रांपैकी एक आहे. सूर्याने त्याचा पुत्र मनूला सांगितले आणि मनुने आपल्या पुत्राला इक्षवाकुला सांगितले.



एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदु:

स कालनेह महता योगो नष्ट:परंतप ll 2 ll



मनू पासून मनुष्य निर्माण झाले. याच्या पहिले हे ज्ञान नव्हते का..?  असं नाहीये. हे ज्ञान खुप पूर्वीपासून आहे. एकदा एका कविने स्टेजवर राग आसावरी गायला. तेव्हा त्याला कोणीतरी विचारले की तू हा राग प्रथमच गातो आहेस की पहिलेसुद्धा तू कधी गायला आहेस. कवी म्हणाला, नाही मी हा राग प्रथम गात नाही, चाळीस वर्षांपूर्वी गायला होता. याचा अर्थ राग आसावरी चाळीस वर्षांपूर्वीचा आहे का..? तर नाही तो फार पूर्वीचा आहे त्या कविने तो चाळीस वर्षांपूर्वी गायला होता. जसा राग आसावरी खुप जुना आहे तसेच हे ज्ञान देखील खुप जुने आहे.


अशाप्रकारे हा योग हे ज्ञान परंपरेनुसार पुढे चालत आले आणि राजर्षी पर्यंत पोहोचले. हे अर्जुन तू या परंपरेचा एक भाग आहेस. मध्यन्तरीच्या काळात हे ज्ञान कुठेतरी लुप्त झाले होते. हे परंतप अर्जुन तू कित्येक देवतांना प्रसन्न करून दिव्यस्त्र प्राप्त केलेस, तू परम तपस्वी आहेस.



स एवयं मया तेsद्य योग: प्रोक्त:पुरातन:

भक्तोsसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम ll 3 ll



अर्जुन म्हणाला की असे हे ज्ञान तू सूर्याला दिलेस, सूर्याने मनूला दिले, मनुने आपल्या पुत्राला दिले हे पुरातन चालत आलेले ज्ञान तू मला का सांगतो आहेस?


तू माझा परम मित्र आहेस त्यामुळे हा पुरातन योग आज मी तुला सांगत आहे. हे अर्जुन तू माझा परम भक्त आहेस, अनन्य भावाने तू मला शरण आलेला आहेस, तू माझा प्रिय सखा आहेस. हे ज्ञान गोपनीय आहे, रहस्यमय आहे.



अर्जुन उवाच

अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः

कथमेतद्विजानियां त्वमादौ प्रोक्तवानिति ll 4 ll



अर्जुन म्हणाला, भगवान आपला जन्म तर अलीकडच्या काळातील आहे, तुम्ही माझ्यापेक्षा फार फार तर चार वर्षानी मोठे असाल मग असं असताना तुम्हीच सूर्याला ज्ञान दिले यावर मी विश्वास कसा ठेवावा?



भगवान उवाच

बहुनि मे व्यतितानि जन्मानि तव चार्जुन

तन्यहं वेद सर्वणि न त्वं वेत्थ परंतप ll 5 ll


भगवान हसत हसत म्हणाले, हे अर्जुना, तुझे माझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. तुला सगळं माहित नाही, तू सगळं विसरला आहेस आणि मीच असं केलंय. मीच तुला विस्मृती दिली आहे. विस्मृती दिली नसती तर तुला तुझं जीवन जगणं कठीण झालं असतं.


एक गावामध्ये रामप्रसाद नावाचे एक धनाढ्य शेटजी रहात होते. या शेठला संतान नव्हती. खुप वर्ष झाले तरी त्याला मुलबाळ झाले नाही. गावात येणाऱ्या प्रत्येक साधूंची ते मनापासून सेवा करत असंत. असेच एकदा साधूची सेवा करत असताना साधूने त्याला प्रसन्न नसण्याचे कारण विचारले. यावर शेठजीला खुप गहिवरून आले तो रडू लागला. साधूने कारण विचारले. शेटजीने सांगितले की मला अजूनपर्यंत पुत्र नाही.


साधूने त्याला एक मंत्र दिला व एक वर्षामध्ये तुला मुलगा होईल असा आशीर्वाद दिला व साधू निघून गेले. एक वर्ष झाले आणि शेठजीच्या घरी मुलगा जन्माला आला. शेठजीला खुप आनंद झाला त्याने साऱ्या गावभर मिठाई वाटली. पण त्याचा आनंद जास्त काळ टिकला नाही. मुलगा जन्माला आल्यावर तिसऱ्या दिवशीच त्याची पत्नी मरण पावली. शेठ खुप दुखी झाला. तरीही त्याने मुलाला नीट सांभाळले. सहा महिन्यानंतर शेटजीला असे जाणवले की मुल खुप रडते आहे. मुलगा दीड वर्षांचा झाला तरी खुप रडत असे. शेठजीने, शहरातील एका चांगल्या डॉक्टरला दाखवले. डॉक्टरने सांगितले की याला लवकरात लवकर चांगल्या अस्थीरोगतज्ञाला दाखवा कारण याच्या पाठीच्या मनक्यामध्ये अडचण आहे आणि त्यामुळे त्याला त्रास होतोय म्हणून हा मुलगा खुप रडत आहे.


शेठजी लगेचच मुलाला घेऊन अस्थीरोगतज्ञाकडे गेले. त्यांनी मुलाला तपासले असता लक्षात आले की त्याच्या कमरेची दोन हाडे एकमेकात अडकली आहेत आणि हे जन्मजात आहे. डॉक्टर म्हणाले की यावर काही उपाय नाहीये परंतु काही औषध आणि तेल मालिशसाठी देतो ज्याने याचे दुखणे थोडे कमी होईल पण हा मुलगा चालू शकणार नाही. शेटजीला खुप वाईट वाटले. शेटजी म्हणाला की माझ्याकडे खुप पैसा आहे काही करा डॉक्टर पण याला ठीक करा. डॉक्टर म्हणाले की अजून पर्यंत तर अशी कोणती टेक्नॉलॉजी आली नाही.


शेठजी खुप दुःखी झाले. जो जे सांगेल ते शेठजी करत होता.. जो जिथे सांगेल तिथे तो मुलाला घेऊन जात होता, सगळे उपाय केले पण काही फरक पडत नव्हता. शेठजी रात्रंदिवस मुलाची सेवा करत होते बघता बघता मुलाला आठरा वर्ष झाली शेठजीची सेवा चालूच होती. मुलगा आठरा वर्षांचा झाल्यावर अचानक एक दिवस अस्थीरोगतज्ञ डॉक्टरचा फोन आला की लंडनला एक डॉक्टर आहेत त्यांनी या आजारावर दोन तीन ऑपरेशन केली आहेत.. आणि ती यशस्वी झाली आहेत. त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, तुमच्या मुलाची फाईल सुद्धा मी त्यांना पाठवली आहे. तुम्ही लगेचच लंडनला जाण्याची तयारी करा. मला असे वाटते की ईश्वराच्या आशीर्वादाने तुमचा मुलगाही चालू लागेल.


आठरा वर्ष मुलाच्या उपचारासाठी खुप पैसा खर्च झाला होता त्यामुळे शेटजीकडे कमी पैसे होते, पण मुलाच्या उपचाराठी शेठजीने आपला व्यापर बंद केला, आपली हवेली, घर विकले आणि होते नव्हते ते सगळे पैसे घेऊन मुलाला उपचारासाठी लंडनला घेऊन गेला. उपचारानंतर मुलगा ठीक झाला. शेठजी मुलाला घेऊन गावी परत आले. काही महिन्यानंतर शेठजीने आपल्या मुलाचा विवाह केला. पैसा कमी होता तरी साऱ्या गावाला जेवण दिले. शेठजी खुप खुश होते पण लग्नाच्या सहाव्या दिवशी रात्री अचानक सून दरवाजा वाजवू लागली बापूजी उठा, बापूजी उठा. बघा तुमचा मुलगा काहीच बोलत नाहीये. शेठजी घाबरून उठले आणि बघतात तो काय त्यांचा मुलगा निपचिप पडला होता. 


वैद्याला बोलावले, वैद्याने नाडी बघितली आणि शेटजीला सांगितले की सगळं संपलं आहे. तुमच्या मुलाला हृदयघात झाला आहे. शेटजीला खुप दुःख होते. कितीतरी परिश्रमानंतर मुलगा आता कुठे ठीक झाला होता. शेठजी स्तब्ध झाले. त्यांच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. रडू तर खुप येत होतं पण रडताच येत नव्हतं. जणू दुःखाचा डोंगरच त्यांच्यावर कोसळला होता. क्रियकर्म झाल्यावर घरी येतच होते तो त्यांना समजले की 18वर्षांपूर्वी जे साधू गावात आले होते तेच साधू 19वर्षानी पुन्हा परत गावात आले आहेत. शेटजी धावत पळत तिकडे जातो साधूचे पाय पकडून खुप रडू लागतो. साधूने काय झाले विचारल्यावर आठरा वर्षांपासूनची सारी हकीकत तो त्यांना सांगतो आणि मी कोणाचे काय केले म्हणून माझ्याच नशिबी असे आले म्हणून रडू लागतो. रडता रडता तो ईश्वराला दोष देऊ लागतो, साधुलाही दोष देतो. पण साधू निर्षच्छ मनाचा असतो त्यामुळे त्याला त्याचे काही वाटत नाही.


साधू ध्यान लावतो आणि साधुला सारे समजते. तो रागाने शेटजीकडे पहातो. शेठजीला नांव विचारतो. शेठजी त्याला रामलाल असे सांगतो. ते ऐकून साधू ओरडतो, खोटारडा, तुझे नांव सुरेश आहे. सारं काही शेठजीच्या डोळ्यासमोरून जातं. शेठजी एका शेतकऱ्याचा मुलगा असतो.. त्याचं नांव सुरेश असते. या सुरेशचा एक मित्र होता त्याचे नांव रमेश असते.  रमेशकडे व्यापारी जहाज असते.  एकदिवस सुरेश रमेशला म्हणतो की तुझ्या नावेतून माझा शेतीमाल घेऊन आपण परदेशी जाऊ, तिथे माल विकू व पैसे घेऊन येऊ. अशाप्रकारे सुरेशचा माल व रमेशचे व्यापारी जहाज घेऊन दोघे परदेशी जातात, भरपूर पैसे कमवतात. त्या पैशात सुरेश सुका मेवा खरेदी करतो व गावी येऊन त्यातूनही खुप पैसे कामावतो.


परत दुसऱ्यांदा ते दोघेही शेतीमाल घेऊन परदेशी जातसतात. सर्व माल विकून पैसे घेऊन परत येत असताना वाटेत रमेशची तब्बेत बिघडते. सुरेश त्याला एका डॉक्टर कडे घेऊन जातो. त्यावेळी सुरेशच्या मनात सर्व संपत्ती हडप करण्याचे वाईट विचार येतात.  सुरेश एका लेडीज डॉक्टरच्या मदतीने रमेशला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकतो.  यामुळेच मेलेला रमेश पुन्हा त्याच्या मुलाच्या रूपाने जन्म घेतो आणि त्याने कमवलेला एक एक पैसा औषधाच्या रूपाने खर्च करून टाकतो.  शेवटी सर्व पैसा संपल्यावर स्वतः निघून जातो. साधू ही सर्व हकीकत शेठजीला सांगतो. शेठजी म्हणतो की सुनेने काय केले होते म्हणून तिच्या नशिबी विधवेचे जिने आले? यावर साधू संगतो की ती पूर्वजन्मीची डॉक्टर आहे जिने रमेशला विषारी इंजेक्शन दिलेले असते.


भगवानने संपूर्ण मानवजातीला विस्मृतीची शक्ती दिली आहे म्हणून मानवाला पूर्वजन्मीचे काही आठवत नाही. आठवत असते तर शेटजीने त्या मुलाची इतकी सेवा केली असती का? नसती केली. कर्माचं फळ भोगण्यासाठी मनुष्याला पुन्हा जन्म घेऊन यावंच लागतं म्हणून भगवान म्हणतात हे अर्जुना तुला तुझे सारे जन्म आठवत नाहीत मात्र मला सर्व माहित आहे.


भगवानने संपूर्ण मानवजातीला विस्मृतीची शक्ती दिली आहे म्हणून मानवाला पूर्वजन्मीचे काही आठवत नाही. आठवत असते तर शेटजीने त्या मुलाची इतकी सेवा केली असती का? नसती केली. कर्माचं फळ भोगण्यासाठी मनुष्याला पुन्हा जन्म घेऊन यावंच लागतं म्हणून भगवान म्हणतात हे अर्जुना तुला तुझे सारे जन्म आठवत नाहीत मात्र मला सर्व माहित आहे.



अजोsपि सन्नव्ययात्मा, भूतानामीश्वरोsपि सन

प्रकृतीम स्वामीधिष्ठाय सम्भावाम्यात्ममायया ll 6 ll


हे अर्जुना हे गोपनीय ज्ञान आज मी तुला सांगतोय. मी अविनाशी आहे, सर्व प्रणि्मात्रांचा ईश्वर आहे. मी माझ्या योगमायेने प्रकट होतो. तुला कुठे जन्म घ्यायचा, कोणत्या रूपात घ्यायचा हे तू ठरवू शकत नाहीस पण मी हे ठरवू शकतो. माझा जन्म कोणत्याही स्त्रीच्या गर्भातून होत नाही तर मी प्रकट होतो. मी कोणावरही अवलंबून नाहीये.


मी का येतो?


यदा यदा हि धर्मस्य, ग्लानिर्भवति भारत

अभ्युत्थानमधर्मस्य, तदात्मानं सृजाम्यहम ll 7 ll



हे अर्जुन जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो आणि अधर्म वाढू लागते तेव्हा तेव्हा मी येतो. धर्माची पुनरस्थापना करण्यासाठी मी येतो. सज्जन लोकांचे रक्षण करण्यासाठी त्यांचे दुःख दूर करण्यासाठी मी येतो. माझी वेगवेगळी रूप आहेत. दशावतार, मोहिनी अवतार, हरिकथेमध्ये मी आलो आहे.



परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताम

धर्मसंस्थापनार्थाय, सम्भवामि युगे युगे ll 8 ll


माझ्या इच्छेनुसार मी जन्म घेतो. साधूपुरुषांचा उद्धार करण्यासाठी पापकर्म करणाऱ्या लोकांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी युगे युगे मी प्रकट होतो.



जन्म कर्म च मे दिव्यम, एवं यो वेत्ती तत्वत:

त्यकत्वा देहं पुनर्जन्म, नैति मामेति सोsर्जुन ll 9 ll



माझा जन्म, माझे कर्म दिव्य, अलौकिक आहे. मी साधारण मनुष्यासारखा दिसत असलो तरी मी तसा नाहीये.

मग आपल्याला कसं ओळखायचं? अर्जुन विचारतो. 



वीतरागभयक्रोधा, मन्मया मामुपाश्रिता:

बहवो ज्ञानतपसा, पूता मद्भावमागता: ll 10 ll


ज्यांची राग, भय, क्रोध या तिन्हीतून मुक्तता झाली आहे

राग - मी, माझं, माझं घर, माझा मुलगा, माझी मुलगी 

भय - ज्याला माझं मानलं ते आपल्यापासून हिरावून जाण्याची भीती

क्रोध - भीती आली की क्रोध येतोच


म्हणजेच ज्यांचा राग, भय, क्रोध कमी होतो तो भगवंतमय होतो. अहंकाररहित होऊन माझ्या आश्रयास येतो तो ज्ञानरूप होऊन माझ्या स्वरूपात मिळतो. असे मला जाणारे ज्ञानी होतात. म्हणून भगवन्त म्हणतात, राग, भय, क्रोध यांचा त्याग कर म्हणजे तू माझ्यात तल्लीन होशील. ज्ञानरुपी अग्नी मध्ये व्यक्ती पवित्र बनतो.



अच्युतमं केशवं कृष्ण दामोदरं

रामनारायणं जानकी वल्लभं


हरी शरणम: हरी शरणम: हरी शरणम: ll


प्रश्नोतर -


पूर्वजन्मीचे भोग आपल्याला या जन्मात भोगावे लागतात का? 


उत्तर - राग, भय, क्रोध चा त्याग करून ईश्वराला शरण गेलो तर यातून सुटका होते.


जसे वय वाढत जाते तसा अनुभव भी वाढत जातो मग ज्या जन्मामध्ये ते कर्म केले आहे त्याच जन्मामध्ये ते भोगायला पाहिजे ना?


उत्तर -  असं होत नाही, जुने जे कर्म आहे त्याचा भोग भोगायलाच लागतो. यासाठी नवीन कर्म चांगले करा. 


कोणी वेडा व्यक्ती कोणाचा खून करतो तेव्हा तो वेडा म्हणून त्याला भारतीय कोर्टामध्ये सजा दिली जात नाही, माफ केले जाते. असेच ईश्वराच्या कोर्टामध्येही होते का?


उत्तर - चित्रगुप्तच्या दरबारात देखील असेच आहे. 


भगवान ने मानवाला विस्मृती दिली आहे तरीसुद्धा काही लोकांना त्यांचा पूर्व जन्म आठवतो हे चांगलं आहे का वाईट?


उत्तर -  ना चांगलं ना वाईट आहे. बस ते आहे. 


एकाच व्यक्तीबरोबर सुरुवातीला चांगले नंतर वाईट किंवा पहिले वाईट नंतर चांगले असं घडू शकतं का? यामध्ये आपला रोल काय असायला हवा? 


उत्तर - हो घडू शकतं. आपल्याकडून आपण क्षमाप्रार्थी रहायचे. समोरच्याने कसे वागायचे हे आपल्या हातात नाही. 

सौजन्य : गीतापरिवार 🙏🏻


धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या