Maharastrian Upvas Recipe : उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात का..? मग बनवा 'वरईचे डोसे' उपवास स्पेशल रेसिपी.

 




 

Maharastrian Upvas Recipe : उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात का..? मग बनवा 'वरईचे डोसे' उपवास स्पेशल रेसिपी. 


वरईचे महत्त्व आणि उपयोग


• वरईचे महत्त्व : ⤵️

1. आरोग्यास फायदेशीर: वरई ही पचनासाठी हलकी व शरीरासाठी पोषक धान्य आहे. ती ग्लूटेनमुक्त असल्याने गहू किंवा तांदळाला पर्याय म्हणून वापरता येते.

2. पौष्टिक घटक: वरईत भरपूर प्रमाणात फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

3. वजन कमी करण्यास मदत: वरईत कमी कॅलरी असून, ती पचनासाठी वेळ लागते. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन कमी करण्यात मदत होते.

4. उपवासातील महत्त्व: उपवासात वरई खाणे पारंपरिक आणि आरोग्यदायक मानले जाते. उपवासात ऊर्जा टिकवण्यासाठी ती उपयुक्त ठरते.




• वरईचा उपयोग : ⤵️


1. भात किंवा खिचडी: वरईचे भात किंवा खिचडी उपवासासाठी लोकप्रिय आहे. त्यात बटाटे, शेंगदाण्याचा कूट, आणि साखर-मीठ घालून तयार केले जाते.

2. लाडू: वरईचा पीठ घालून लाडू तयार करता येतात, जे चविष्ट आणि पौष्टिक असतात.

3. आप्पे : वरईचे चवदार आप्पे बनवून उपवासात खाल्ले जातात.

4. डोसा किंवा थालीपीठ: वरईच्या पिठाचा उपयोग करून डोसा किंवा थालीपीठ तयार करता येते.




5. पेज : वरईचे उकडलेले पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असून पचन सुधारते.


टीप: वरई अधिक प्रमाणात खाणे टाळावे, कारण ती थोडी गरम प्रवृत्तीची असते. योग्य प्रमाणात घेतल्यास ती शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.


उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात मग बनवा 'वरईचे डोसे' उपवास स्पेशल रेसिपी.. 


आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार. बऱ्याच महिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करतात. या गुरुवारी उपवास केला जातो. चला तर मग आज आपण पाहणार आहोत उपवासाचे वरईचे डोसे.. ⤵️





वरईचे डोसे 


साहित्य:

• १ कप वरई

• १ कप दही

• २-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

• १ उकडलेला बटाटा 

• १ इंच आल्याचा तुकडा (बारीक किसलेला)

• १/२ चमचा जीरे

• मीठ चवीनुसार

• तेल डोसा भाजण्यासाठी


कृती:

1. वरई पाण्यात २-३ तास भिजवून ठेवा.

2. भिजवलेली वरई पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

3. या मिश्रणात दही घालून चांगले मिसळा आणि २-३ तास भिजू द्या.

4. भिजवलेल्या मिश्रणात हिरव्या मिरच्या, आलं, जीरे आणि मीठ  मिक्सरला बारीक वाटून घाला. 

5. उकडलेला बटाटा किसनीवर किसून मिश्रणात घाला व मिश्रण चांगले मिसळा.



6. तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल लावा.

7. तयार मिश्रणाचा एक डाव तव्यावर घालून गोलाकार पसरवा.

8. झाकण ठेवून मध्यम आचेवर डोसा एका बाजूने सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या.



9. डोसा पलटून दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या.




10. गरमागरम वरईचे डोसे नारळाच्या चटणी किंवा दहीबरोबर सर्व्ह करा.



आवडली का रेसिपी.. 

मग तुम्हीही बनवा आणि मला कळवा. 


धन्यवाद..! 🙏🏻 

©सौ. सुचिता वाडेकर... ✍🏻


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या