Marathi Story | Marathi Katha : 'विस्मृतीची शक्ती' ईश्वराने दिले संपूर्ण मानवजातीला वरदान





Marathi Story | Marathi Katha : 'विस्मृतीची शक्ती' ईश्वराने दिले संपूर्ण मानवजातीला वरदान 


'विस्मृतीची शक्ती' ईश्वराने दिले संपूर्ण मानवजातीला वरदान 


एका गावामध्ये रामप्रसाद नावाचे एक धनाढ्य शेटजी रहात होते. या शेठला संतान नव्हती. खुप वर्ष झाले तरी त्याला मुलबाळ झाले नाही. गावात येणाऱ्या प्रत्येक साधूंची ते मनापासून सेवा करत असंत. असेच एकदा साधूची सेवा करत असताना साधूने त्याला प्रसन्न नसण्याचे कारण विचारले. यावर शेठजीला खुप गहिवरून आले, तो रडू लागला. साधूने कारण विचारले. शेटजीने सांगितले की मला अजूनपर्यंत पुत्र नाही.


साधूने त्याला एक मंत्र दिला व एक वर्षामध्ये तुला मुलगा होईल असा आशीर्वाद दिला व साधू निघून गेले. एक वर्ष झाले आणि शेठजीच्या घरी मुलगा जन्माला आला. शेठजीला खुप आनंद झाला त्याने साऱ्या गावभर मिठाई वाटली. पण त्याचा आनंद जास्त काळ टिकला नाही. मुलगा जन्माला आल्यावर तिसऱ्या दिवशीच त्याची पत्नी मरण पावली. शेठ खुप दु:खी झाला. तरीही त्याने मुलाला नीट सांभाळले. 


सहा महिन्यानंतर शेटजीला असे जाणवले की मुल खुप रडते आहे. मुलगा दीड वर्षांचा झाला तरी खुप रडत असे. शेठजीने, शहरातील एका चांगल्या डॉक्टरला दाखवले. डॉक्टरने सांगितले की याला लवकरात लवकर चांगल्या अस्थीरोगतज्ञाला दाखवा कारण याच्या पाठीच्या मनक्यामध्ये अडचण आहे आणि त्यामुळे त्याला त्रास होतोय म्हणून हा मुलगा खुप रडत आहे.


शेठजी लगेचच मुलाला घेऊन अस्थीरोगतज्ञाकडे गेले. त्यांनी मुलाला तपासले असता लक्षात आले की त्याच्या कमरेची दोन हाडे एकमेकात अडकली आहेत आणि हे जन्मजात आहे. डॉक्टर म्हणाले की यावर काही उपाय नाहीये परंतु काही औषध आणि तेल मालिशसाठी देतो ज्याने याचे दुखणे थोडे कमी होईल पण हा मुलगा चालू शकणार नाही.


शेटजीला खुप वाईट वाटले. शेटजी म्हणाला की माझ्याकडे खुप पैसा आहे काही करा डॉक्टर पण याला ठीक करा. डॉक्टर म्हणाले की अजून पर्यंत तर अशी कोणती टेक्नॉलॉजी आली नाही. शेठजी खुप दुःखी झाले. जो जे सांगेल ते शेठजी करत होता.. जो जिथे सांगेल तिथे तो मुलाला घेऊन जात होता, सगळे उपाय केले पण काही फरक पडत नव्हता. शेठजी रात्रंदिवस मुलाची सेवा करत होते बघता बघता मुलाला आठरा वर्ष झाली शेठजीची सेवा चालूच होती. 


मुलगा आठरा वर्षांचा झाल्यावर अचानक एक दिवस अस्थीरोगतज्ञ डॉक्टरचा फोन आला की लंडनला एक डॉक्टर आहेत त्यांनी या आजारावर दोन तीन ऑपरेशन केली आहेत.. आणि ती यशस्वी झाली आहेत. त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, तुमच्या मुलाची फाईल सुद्धा मी त्यांना पाठवली आहे. तुम्ही लगेचच लंडनला जाण्याची तयारी करा. मला असे वाटते की ईश्वराच्या आशीर्वादाने तुमचा मुलगाही चालू लागेल.


आठरा वर्ष मुलाच्या उपचारासाठी खुप पैसा खर्च झाला होता त्यामुळे शेटजीकडे कमी पैसे होते, पण मुलाच्या उपचाराठी शेठजीने आपला व्यापर बंद केला, आपली हवेली, घर विकले आणि होते नव्हते ते सगळे पैसे घेऊन मुलाला उपचारासाठी लंडनला घेऊन गेला. उपचारानंतर मुलगा ठीक झाला. शेठजी मुलाला घेऊन गावी परत आले. 


काही महिन्यानंतर शेठजीने आपल्या मुलाचा विवाह केला. पैसा कमी होता तरी साऱ्या गावाला जेवण दिले. शेठजी खुप खुश होते पण लग्नाच्या सहाव्या दिवशी रात्री अचानक सून दरवाजा वाजवू लागली बापूजी उठा, बापूजी उठा. बघा तुमचा मुलगा काहीच बोलत नाहीये. शेठजी घाबरून उठले आणि बघतात तो काय त्यांचा मुलगा निपचिप पडला होता. 


वैद्याला बोलावले, वैद्याने नाडी बघितली आणि शेटजीला सांगितले की सगळं संपलं आहे. तुमच्या मुलाला हृदयघात झाला आहे. शेटजीला खुप दुःख होते. कितीतरी परिश्रमानंतर मुलगा आता कुठे ठीक झाला होता. शेठजी स्तब्ध झाले. त्यांच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. रडू तर खुप येत होतं पण रडताच येत नव्हतं. जणू दुःखाचा डोंगरच त्यांच्यावर कोसळला होता. 


क्रियाकर्म झाल्यावर घरी येतच होते तो त्यांना समजले की 18 वर्षांपूर्वी जे साधू गावात आले होते तेच साधू 19 वर्षानी पुन्हा परत गावात आले आहेत. शेटजी धावत पळत तिकडे जातो साधूचे पाय पकडून खुप रडू लागतो. साधूने काय झाले विचारल्यावर आठरा वर्षांपासूनची सारी हकीकत तो त्यांना सांगतो आणि मी कोणाचे काय केले म्हणून माझ्याच नशिबी असे आले म्हणून रडू लागतो. रडता रडता तो ईश्वराला दोष देऊ लागतो, साधुलाही दोष देतो. पण साधू निर्षच्छ मनाचा असतो त्यामुळे त्याला त्याचे काही वाटत नाही.


साधू ध्यान लावतो आणि साधुला सारे समजते. तो रागाने शेटजीकडे पहातो. शेठजीला नांव विचारतो. शेठजी त्याला रामलाल असे सांगतो. ते ऐकून साधू ओरडतो, खोटारडा, तुझे नांव सुरेश आहे. सारं काही शेठजीच्या डोळ्यासमोरून जातं. शेठजी एका शेतकऱ्याचा मुलगा असतो.. त्याचं नांव सुरेश असते. या सुरेशचा एक मित्र होता त्याचे नांव रमेश असते.  रमेशकडे व्यापारी जहाज असते. 


 एकदिवस सुरेश रमेशला म्हणतो की तुझ्या नावेतून माझा शेतीमाल घेऊन आपण परदेशी जाऊ, तिथे माल विकू व पैसे घेऊन येऊ. अशाप्रकारे सुरेशचा माल व रमेशचे व्यापारी जहाज घेऊन दोघे परदेशी जातात, भरपूर पैसे कमवतात. त्या पैशात सुरेश सुका मेवा खरेदी करतो व गावी येऊन त्यातूनही खुप पैसे कामावतो.


परत दुसऱ्यांदा ते दोघेही शेतीमाल घेऊन परदेशी जातसतात. सर्व माल विकून पैसे घेऊन परत येत असताना वाटेत रमेशची तब्बेत बिघडते. सुरेश त्याला एका डॉक्टर कडे घेऊन जातो. त्यावेळी सुरेशच्या मनात सर्व संपत्ती हडप करण्याचे वाईट विचार येतात. सुरेश एका लेडीज डॉक्टरच्या मदतीने रमेशला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकतो.  यामुळेच मेलेला रमेश पुन्हा त्याच्या मुलाच्या रूपाने जन्म घेतो आणि त्याने कमवलेला एक एक पैसा औषधाच्या रूपाने खर्च करून टाकतो.  


शेवटी सर्व पैसा संपल्यावर स्वतः निघून जातो. साधू ही सर्व हकीकत शेठजीला सांगतो. शेठजी म्हणतो की सुनेने काय केले होते म्हणून तिच्या नशिबी विधवेचे जिने आले? यावर साधू संगतो की ती पूर्वजन्मीची डॉक्टर आहे जिने रमेशला विषारी इंजेक्शन दिलेले असते.


या गोष्टीतून आपल्याला एक समजते की ईश्वराने संपूर्ण मानवजातीला विस्मृतीची शक्ती दिली आहे म्हणून मानवाला पूर्वजन्मीचे काही आठवत नाही. आठवत असते तर शेटजीने त्या मुलाची इतकी सेवा केली असती का? नसती केली. कर्माचं फळ भोगण्यासाठी मनुष्याला पुन्हा जन्म घेऊन यावंच लागतं.  


म्हणून नेहमी चांगली कर्म करा कारण मृत्यू नंतर हे शरीर देखील बरोबर येत नाही पण कर्म मग ती चांगली असो वा वाईट ती मात्र नेहमी सोबत करतात. चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं. मात्र वाईट कर्माचं फळ भोगल्याशिवाय सुटका नसते. 


चला वर्षाच्या शेवटी जाता जाता एवढा डोस पूरे झाला. याच विचारात नव्याने नव्या वर्षाचे स्वागत करूयात आणि इथूनपुढे चांगले कर्म करण्याचे प्रॉमिस स्वतःला करूयात. 


मी केले तुम्हीही करा. 👍🏻


येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा..!! 💐💐


हे नूतन वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो आणि इथून पुढे तुमच्या हातून चांगले आणि चांगलेच कर्म घडो हिच ईश्वरचरणी प्रार्थना..!! 🙏🏻


धन्यवाद..! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या