#Marathi_Letter
6 डिसेंबर 2024
प्रिय आक्का,
सस्नेह सा. नमस्कार! 🙏🏻
कशा आहात तुम्ही..? असा प्रश्न मी विचारणार नाही कारण जी व्यक्ती स्वतः आनंदी असते तीच इतरांना आनंद देऊ शकते आणि तुम्हाला मी नेहमी आनंदीच पाहिले आहे; त्यामुळे तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या हसमुख चेहऱ्याने आनंद पसरवत असणार हे नक्की.
आज तुम्हाला आमच्यातून जाऊन दहा वर्ष पूर्ण झाली. बघता बघता ही दहा वर्ष कशी गेली हे कळलेच नसेल कोणाला. जग रहाटीच आहे ती, त्याला तुम्ही, आम्ही, कोणीच अपवाद असू शकत नाही. काळ कोणासाठी थांबत नसतो हेच खरे आणि काळानुरूप बदलता देखील आलेच पाहिजे, नाही का?
आजही आठवतो तो उत्स्फूर्तपणे हसणारा आनंदी चेहरा..! तुमच्याकडे पाहून नेहमीच खुप छान वाटतयचे; त्यामुळेच की काय पण तुमची सदैव आनंदी, उत्साही आणि हसरी छबी सदैव माझ्या स्मरणात राहिली. आपल्या वाडेकर फॅमिलीतील सर्वांना तुम्ही प्रेमाने, आपुलकीच्या मायेने बांधून ठेवले होते. तुमच्या येण्याने मन प्रफुल्लित व्हायचे आणि नवीन काहीतरी ऐकायला मिळणार याची कानांना आतुरता लागून राहायची. तुमचं बोलणं नेहमी ऐकत रहावं असं वाटायचं.
प्रत्येकाने आपलं आयुष्यं आनंदाने हसत हसत जगावं, आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे आणि आपण इतरांना काय देऊ शकतो हे तुमच्याकडे पहायल्यावर जाणवायचे. भाऊ गेल्यानंतरही तुम्ही कोणाला डोळ्यातून पाणी काढू दिलं नाहीत तर समाधानाने निरोप द्यायला लावलात. जाणाऱ्या व्यक्तीला समाधानाने निरोप द्यावा म्हणजे त्याची पुढची वाटचाल सोपी होते हेच तुमच्या कृतीतून तुम्ही दाखवून दिलंत.
तुमच्यातील हे गुण तुमच्या मुलांमध्येही उतरले आहेत.. विशेषतः सोनल मध्ये. सर्वांची विचारपूस करणं, अधून मधून सर्वांना आवर्जून फोन करणं, ख्याली खुशाली विचारणं यातून तुमचाच आभास होत असतो तिच्यामध्ये. आताही बघा ना.. सर्वांना एकत्र आणलंय तिने.. 'एक दिवस, तुमच्या आठवणीत जगण्यासाठी.' तुमच्यातील हा आपलेपणा आजही सोनलने टिकवून ठेवलाय.
'आपलं' या शब्दात एक वेगळीच जादू आहे नाही..! 'आपलं' म्हटलं की राग, लोभ, मोह, मत्सर, अहंकार सगळं गळून पडतं आणि राहते ती फक्त आपलेपणाची भावना, जी आपल्या सर्वांना जगण्याचा खरा आनंद मिळवून देते.
असे असले तरी प्रत्येक गोष्टीचा स्वीकार होणं देखील खुप आवश्यक आहे मग ते एखाद्या नात्यात प्रवेश करणं असो अथवा जवळच्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातून अचानक निघून जाणं असो. त्याचा स्वीकार करता यायला हवा आणि ही काही साधी, सोपी, सहज शक्य गोष्ट नाहीये, खुप अवघड आहे.
यासाठी काही काळ निश्चित जावा लागतो, एकदा का स्वीकार झाला की जगणं सुसह्य होतं एवढं मात्र नक्की. यासाठी निकुंभ भाऊजींचे मनापासून कौतुक. तुमच्या जाणण्याने खरी पोकळी त्यांना जाणवली असेल पण त्यांनी ती कधी इतरांना भासू दिली नाही.
यावर्षी तुम्हाला आमच्या सर्वांचा अखेरचा निरोप घेऊन दहा वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सर्वांनी एकत्र भेटून तुमचा स्मरणदिन साजरा करण्याची कल्पना सोनलची आहे. त्यासाठी ती खास अमेरिकेहून इथे आली आहे. सर्वांना तिने पुन्हा एकत्र आणलंय.. खास तुमच्या आठवणींसाठी.
तीचा मेसेज वाचून माझ्या मनामध्ये देखील खुप सारे विचार येऊ लागले. त्या विचारांना शब्दरूपाने वाट करून तुमच्यापर्यंत पोहीचवतीये इतकंच. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे आनंदीच असाल याची खात्री आहे. तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा..!! 💐💐
धन्यवाद! 🙏🏻
तुमची,
© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर.. ✍🏻
0 टिप्पण्या