एक सुंदर आठवणीतले पत्र

 


एक सुंदर आठवणीतले पत्र 


सुप्रभात खा खा मंडळी .. 🙏🏻

हॉटेल श्रेयस प्रस्तुत 'खादाड खाऊ - मकरसंक्राती स्पेशल' या contest मध्ये माझ्या 'तिळगुळाची पोळी' या रेसिपीला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले होते. 😊😊नव्यानेच खा खा मध्ये प्रवेश केला आणि लगेच पारितोषिकही मिळाले याचा निश्चितच आनंद होता पण याचा आनंदानुभव काल संध्याकाळी घेतला. 

खरे तर माझे जाणे जवळ-जवळ कॅन्सल झाले होते, काल दुपारी मधुरा ताई व छाया ताईंचे रिव्हीव वाचले आणि फोटो पाहिले तेव्हा आपण हे सगळं मिस करणार आणि यावर लिहिण्याची संधीही वाया जाणार याचे खूप वाईट वाटले होते. शिवाय काल विकिशाचे लग्नही होते आणि वेळही तीच होती, पण विकिशाच्या लग्नाचे व्हीडिओ पहायला मिळतील पण ही संधी पुन्हा मिळणार नव्हती आणि फायनली साडे सात वाजता आमच्या स्वारीने घरकुलच्या अंगणात प्रवेश केला. काउंटरवर discount कुपन दाखवले... मला आणि लेकीला entry फ्री होती... लेकीच्या बाबाचे तिकीट घेतले आणि आत प्रवेश केला. 

उजवीकडे खाद्य पदार्थांचे स्टॉल तर डावीकडे गावचा देखावा जणू एक खेडेगावंच होते. माझेही माहेर खेडेगावं असल्यामुळे माझे लग्नापर्यंतचे आयुष्य खेड्यातच गेले होते.  सुरुवातीलाच बाजूला बैलगाडी... बाजूला अंगणात दोन बाकडी...  त्यावर कंदील... बाजूला दोन तीन झोपड्या... एका झोपडीत सर्व भांडी, भाजीपाला ठेवला होता... बाजूला दळण दळण्यासाठी जातं... उखळ... विहीर... तुळशी वृंदावन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ड्रेपरी होती जी घालून फोटो काढता येत होते. साडी... नथ... टिकली... बांगड्या... पिना... फेटे ठेवले होते. ज्यांना जे हवं ते घेऊन घालता येत होते हे पाहून ते परिधान करण्याचा मोह मलाही झाला. 

साडी नऊ वारी होती, ड्रेसवरून घालू शकत होतो.. बाजूलाच साडी घालण्यासाठी आडोसा केला होता. माझ्या चेहऱ्यावरील भाव आवळखून समोरून साडी घालून येणारी सखी म्हणाली, 'घ्या हो बिनधास्त ! तेवढीच मज्जा! हे एकूण माझ्याही चेहऱ्यावर smile आले आणि मी एक साडी उचलली. तिथे साडीसोबत नथ, टिकल्या, बांगड्या आणि सेप्टी पिनाही ठेवल्या होत्या. साडी घालून आल्यावर नथ घातली आणि आरसा नसल्यामुळे तिथे उभ्या असलेल्या मुलीने (हॉ.श्रेयस) माझ्या कपाळावर टिकली चटकवली हे पाहून मलाही हसू आले आणि तीही हसली. 

माझ्या मुलीने फेटा घातला आणि आमची स्वारी फोटो काढण्यासाठी आली मग काय नाकातील नथ सांभाळत एकदाचे फोटो सेशन झाले कारण जरा खाली बघितले कि नाकातील नथ पडायची, साडी संभाळण्यापेक्षा नथ संभाळण्यातच वेळ गेला. आतून खूप भारी वाटत होत त्यामुळे चेहऱ्यावरील हसू फार काळ लपून राहू शकत नव्हतं. माझ्यासारखीच तिथे साडी घातलेल्या प्रत्येकीची अवस्था होती. मज्जाच मज्जा 😀 

लेक माझी खा खा आहे त्यामुळे आमच्या पोटात भुकेचे कावळे ओरडू लागले तशी आमची पावले फूड स्टॉलकडे वळाली. तिथे लाईन होती पण थोड्याच वेळात आमचा नंबर लागला. गरम गरम हुरडा सोबतीला खारे शेंगदाणे, गुळ, ओले खोबरे, खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, दही, गरमागरम कांदा भजी, तळलेली मिरची असा सर्व सारंजामा घेऊन आमची स्वारी खुर्चीवर स्थानापन्न झाली. हे सगळं अनुभवून माझी स्वारी भूतकाळात गेली. 

माझ्या लहानपणी आमच्या गावी हुरड्याच्या सिझनला घरातील सर्व आई, आजी, काका, काकू, आम्ही भावंड शेतावर हुरडा खायला जायचो. आम्ही येणार हे आमचे वाटेकरी (शेतीची देखभाल करणारे) मामांना आधीच समजलेले असायचे. ते भराभर कणसं आणून विस्तव करून कणसं भाजयचे आणि त्या भाजलेल्या कणसांचा बारदानाच्या पोत्यात चोळून हुरडा बनवायचे आणि गरम गरम आम्हाला खायला द्यायचे. सोबत आई आणि काकूने आणलेली खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी असायची.... आम्ही मनसोक्त हुरडा खायचो... आज कितीतरी वर्षांनी हा अनुभव पुन्हा घेतला. Thanks खा खा ग्रुप, मधुरा पेठे मॅम आणि हॉटेल श्रेयस !! 🙏 


पोटात थोडी भर पडल्यावर आमची स्वारी खेळाकडे वळली पण तिथे लगेचच ऊसाचा ताजा रस दिसला आणि आमची पावले थबकली, म्हटले आधी रस मग खेळ.. ऊसाचा रस हि मस्त होता सोबतीला सैंधव नमक आणि बर्फाचे क्युब्ज होते. रस पिल्यावर खेळाकडे वळलो तर तिथे टायर, भोवरा, टीक्कर, बॉल, दोरीवरील उड्या मारण्यासाठी दोरी, गोट्या आदी खेळ होते. अरे, हे सगळं पाहिलं आणि माझं बालपनच आठवलं. 

आम्ही भरपूर टायर खेळलोय, तो चालवण्याची म्हणजे पळवण्याची मजाच काही वेगळी होती. मुलीसाठी यातील काही खेळ नवीन होते पण तिने पटकन जाऊन टायर आणि काटी उचलली, सुरुवातीला तिला कसे खेळायचे ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले, तिला हे चालवताना खूप गंमत वाटली, मग स्वारी भोवर्याकडे वळली. मी ही भोवरा चालवला, तीन वेळा नाही जमले पण चौथ्यावेळी भोवरा फिरू लागला आणि एवढा आनंद झाला म्हणून सांगू पटकन व्हिडीओ शुट केले. खूप मज्जा आली. खा खा च्या स्पर्धे मुळे बालपण पुन्हा जगता आले. 

आता बऱ्यापैकी वेळ होत आली होती त्यामुळे आमची पावले जेवणाकडे वळली. खरं तर पोटात जागा नव्हती पण खा खा मंडळींसाठी डिश घेतली. मेनू होता... झुणका, भाकरी, लोणी, मिरचीचा ठेचा, भरलं वांगं, तिळाची पोळी, कढी-खिचडी, मेतकूट भात... मी आपलं सगळं थोडं थोडं ताटात घेतलं आणि आमची स्वारी जागा शोधू लागली. थंडीही बऱ्यापकी जाणवू लागली होती इतक्यात शेकोटी जवळील जागा आम्हाला मिळाली.

आहाहा..! काय छान वाटत होतं. आमच्या गावी दररोज सकाळी अशीच शेकोटी पेटवली जायची. रेडिओच्या सकाळच्या सातच्या बातम्या ऐकत मंडळी गोल करून शेक घेत असत. आज इथेही असेच सर्वजण शेकोटीच्या कडेने खुर्चांवर बसले होते. जेवण संपल्यावर घरी जायचे वेद लागले मोबाईल मध्ये पाहिलं तर दहा वाजून गेले होते... चला निघायला हवं, उद्या शाळा, लवकर उठायचे आहे... आणि बडीशेप घेऊन आमची स्वारी परतीच्या प्रवासाला निघाली. 

खूप छान 👌🏻!  खूप छान वाटलं, बालपण आठवलं आणि त्यासोबत बालपणातील मित्र मैत्रिणी, त्यांच्या सोबत खेळलेले खेळ, घर, शेती, माणसं... सारं काही आठवलं. Thanks खा खा ग्रुपच्या सर्वेसर्वा मधुरा ताई आणि हॊटेल श्रेयस !! मनःपूर्वक धन्यवाद !!! 🙏

©सौ. सुचिता वाडेकर... ✍🏻


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या