My School - आठवणी शाळेच्या....

"आठवणी शाळेच्या...."    

१ ऑगस्ट २०१८   

©सौ. सुचिता वाडेकर... ✍️







         काही दिवसांपूर्वीची म्हणजे अगदी अलीकडील गोष्ट, काही कामानिमित्त मी बाहेर गेले होते त्यामुळे फोन पर्समध्ये होता. घरी आल्यावर पहाते तर त्यावर एकाच नंबर वरून 3 मिस कॉल दिसले. नंबर अनोळखी  होता परंतु तीनवेळा कॉल असल्यामुळे नक्कीच कुणातरी ओळखीच्या व्यक्तीचा फोन असावा असे वाटून थोड्या उत्सुकतेनेच फोन लावला तर तो माझ्या शाळेतील मैत्रिणीचा होता. इतका आनंद झाला म्हणून सांगू... स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्ही कधी भेटू. आज व्हाट्सअपमुळे एकमेकींना प्रत्यक्ष नसले तरी रोज भेटता येते याचा आनंद निश्चितच आहे.

         लग्नानंतर प्रत्येकजण आपापल्या संसारात इतक्या गुंतल्या होतो की एकेकाळी आपल्यालादेखील मैत्रिणी होत्या याचा विसर पडला होता. त्या महिनाभरात तीन मैत्रिणींची फोनवर भेट झाली आणि लहानपणीच्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या.

        दंगा, मस्ती, केलेली भांडणं, घेतलेली कट्टी, पुन्हा परत बोलण्यासाठी काढलेले रुसवे, शाळेच्या सजावटीसाठी तयार केलेले तक्ते, लावलेल्या रंगीत पताका, घटक चाचणी, मार्क्स पाहण्यासाठी दिलेले पेपर, प्रत्येकीला तुला किती पडले याची उत्सुकता, 25 पैशात मिळणाऱ्या 5 दुधी गोळ्या मैत्रिणीसोबत शेअर करताना त्याचे शाळेच्या ड्रेसमध्ये ठेवून दाताने केलेले तुकडे, ते सगळ्यांना वाटताना झालेला आनंद, दुपारच्या सुट्टीत जेवताना शेअर केलेल्या भाजीचा एक एक घास...

        शाळेच्या सहलीत केलेली धमाल, शाळेच्या स्नेहसम्मेलनात घेतलेला भाग, विविध खेळ, वक्तृत्व स्पर्धा यामध्ये मिळालेले बक्षीस आणि यामुळे झालेला आनंद, परीक्षेच्यावेळी मिळून केलेला अभ्यास, पुढच्या वर्गात गेल्यावर पहिल्या दिवशी अगदी पळत जाऊन पकडलेला तो पहिला बेंच, त्यादिवशी शेजारी बसलेली मैत्रीण पुढे वर्षभर सोबत असायची ....

           पुढे कॉलेज जीवनातील एकत्र घालवलेल्या आठवणी, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये खाल्लेली मिसळ, वडापाव, ऑफ पिरेडला लायब्ररीत बसून केलेला अभ्यास, एस.टी. साठी पाहिलेली वाट आणि ती आल्यावर एकमेकींसाठी धरलेली जागा .... सर्व .... अगदी सर्व डोळ्यासमोरून गेले, जणूकाही नुकतेच काही दिवसांपूर्वीच तर घडलेय असेच वाटू लागले.

       खूप छान होते ते दिवस पण त्यावेळी त्याचं महत्व कधी वाटलं नाही. आज फिरून नव्याने असे वाटते की ते दिवस पुन्हा जगता आले तर .... पुन्हा मला माझ्या शाळेत, माझ्या वर्गात, माझ्या बेंचवर, माझ्या मैत्रिणींसोबत बसता आले तर ....! पण हे शक्य नाही हे वास्तव स्विकारावेच लागते.

       आज माझ्या या शाळेची, जीने मला घडवलं.... माझ्या शिक्षकांची, ज्यांनी माझ्यावर संस्कार केले आणि शाळेतील माझ्या जिवलग मैत्रिणींची ज्यांनी वेळोवेळी मला खूप मदत केली त्या सर्वांची मी खूप ऋणी आहे. कधी काळी हे सर्वजण माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग होते हे आज आठवलं तरी खूप खूप छान वाटते. अशा या शाळेबद्दलच्या काही आठवणी तुमच्या बरोबर शेअर करतीये.


"माझी शाळा..."


        शाळा हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय, शाळेविषयी वाटणारी आत्मीयता प्रत्येकाच्याच आतमध्ये लपलेली असते यात शंका नाही. आज ती व्यक्त होतेय इतकंच.

       माझी पहिली शाळा म्हणजे 'बालवाडी' जी आमच्या गावात 'तुकाई देवी' मंदिरात भरत असे. आम्हाला 'शकुनी' बाई होत्या,  त्या खूप प्रेमळ होत्या, लहान मुलांमध्ये त्या स्वतः लहान होऊन जायच्या अन त्यामुळे की काय प्रत्येक लहान मुलाला त्या आवडायच्या.

       माझी दुसरी शाळा म्हणजे 'जीवन शिक्षण विद्यामंदिर ओझर्डे' ही पहिली ते चौथी पर्यंतची प्राथमिक शाळा. त्यावेळी प्रार्थनेनंतर दिवसाची सुरुवात रामदास स्वामींचे मनाचे श्लोक बोलून व्हायची. चौथीत आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास होता. ननावरे गुरुजी इतिहास हा विषय खूप तल्लीन होऊन आणि गोष्टीरूपात शिकवायचे. आजही 'झी टीव्ही' वरील संभाजी सिरिअल पाहताना त्यावेळी गुरुजींनी शिकवलेल्या इतिहासाची आठवण होते आणि मनोमन गुरुजींना धन्यवाद म्हणावेसे वाटते.

       माझी तिसरी शाळा म्हणजे, 'पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे' जिथे मी पाचवी ते दहावी पर्यंतचं शिक्षण घेतलं. ही आमची शाळा गावापासून १ किलोमीटर दूर होती. एका बाजूला खोल ओढा आणि दुसऱ्या बाजूला बौद्ध समाजाची वस्ती आणि मधून गेलेला टेकडीचा चढ उत्तरांचा कच्चा रस्ता, मध्येच कातकरी लोकांची पालं देखील लागायची. थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी लागे जिथे नदीतून आलेले पाणी शुद्ध केलं जात असे आणि त्यानंतर आमच्या शाळेचं भलं मोठं पटांगण लागे.

       या पटांगणाला तारेचे कुंपण होते आणि पटांगणाच्या चारी बाजूने वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली होती. शाळेच्या इमारती भोवतीही खूप सारी झाडे लावली होती. शाळेच्या एका बाजूला खोल ओढा आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार शेती होती त्यामुळे शाळेचा परिसर खूप शांत आणि प्रसन्न वाटायचा. शाळा भरताना आणि सुटल्यावर सर्व मुलं चालत जायची तेव्हाचं ते दृश्य उंच टेकडीवरून तर खूप मनोहारी दिसायचं.

       १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला गावातील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व्हायचं शाळेत, त्यावेळी ध्वजाला मानवंदना दिल्यावर उपस्थितांचे अभिवादन करण्यासाठी मारचिंग व्हायचे. खूप छान वाटायचे त्यावेळी, त्यानंतर गावातून प्रभात फेरी निघायची. ढोल ताशे वाजवत आम्ही सर्व मुले मुली गावातील ठीक ठीकांचे ध्वजारोहन करून पुन्हा शाळेत यायचो आणि मग आपापल्या घरी जात असू.

       १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या आदल्या दिवशी इस्त्रीवाल्या परीट काकांना खूप काम असायचे. शाळेतल्या जवळ जवळ सर्व मुलं मुलींचे गणवेश त्यांच्याकडे इस्त्रीला असायचे. कितीही उशीर झाला तरी सर्वांचे कपडे ते इस्त्री करून देत असत; त्यांनाही त्यादिवशी खूप आनंद व्हायचा.

       आमच्या शाळेत गणेशोत्सव साजरा केला जायचा. वाजत गाजत गणेशाचं आगमन व्हायचं.  रोज सकाळी आणि संध्याकाळी शाळा सुटण्याच्या सुमारास आरती व्हायची. आरती म्हणणारी मुले माईक वरून आरती बोलायचे त्यामुळे सर्व वर्गांमध्ये ती ऐकू जायची. वर्गातील मुले जागेवर उभी राहून टाळ्या वाजवायचे. रोज एकेका वर्गाचा प्रसाद असायचा. आरती झाल्यावर काही मुलं तो प्रसाद सर्व वर्गातील मुलांना वाटायचे.

         शाळेत वक्तृत्व स्पर्धाही व्हायच्या. पाचवी ते सातवी लहान गट आणि आठवी ते दहावी मोठा गट असायचा. लहान गटात असताना माझं पहिलं पारितोषिक कधी चुकलं नाही आणि मोठ्या गटात तिसरं पारितोषिक मिळालं होतं. पण याचं श्रेय मी माझ्या विवेक काकांना देईन कारण ते माझी तयारी करून घेत असत. स्नेहसंमेलनच्यावेळी मान्यवर व्यक्तींना बोलावलं जायचं, त्यांचं भाषण व्हायचं, त्यांच्याकडून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जायचा, मनोरंजनासाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम देखील व्हायचा, त्यासाठी वेगवेगळे डान्स बसवले जायचे; खूप धमाल यायची त्यावेळी.

       तसेच खेळांच्या वेगवेगळ्या स्पर्धाही असायच्या आमच्या शाळेत जसे की खोखो, कबड्डी ( मोठ्या गटाच्या मुलांच्या कबड्डी स्पर्धेत मुलांचे वर्ग शिक्षकही भाग घेत असत), लंगडी, तीन पायांची शर्यत, डोळे बांधून गाढवाला शेपूट काढणे, डोळे बांधून मडके फोडणे, संगीत खुर्ची, स्लो सायकलिंग करत असताना उंचावर बांधलेले केळ खाणे, उंच उडी, लांब उडी, धावणे - १०० मीटर, २०० मी. ८०० मी. अशा कितीतरी स्पर्धा व्हायच्या.

       दर शुक्रवारी शेवटचे दोन तास ग्राउंडवर सर्व मुलामुलींची कवायत व्हायची त्यात लेझीम, डंबेल्सचा वापर केला जायचा. त्यावेळी पूर्ण ग्राउंडवर खूप छान दृश्य दिसायचं. मधल्या सुट्टीत बरीचशी मुलं घरी जेवायला जायची, खूप लांबून येणारी (गावाबाहेरून) मुलं डबा घेऊन यायची. आम्हीही अधून मधून डबा घेऊन जायचो.

       आठवी पासून स्काऊट - गाईड, आर. एस.एस. हे विषय असायचे. आम्ही आठवीत गेल्यावर आम्हा मुलींना गाईड आणि मुलांना स्काऊट हा विषय होता. त्यावेळी आम्हाला श्रमदान करावे लागे मग आमचे सर आम्हाला गावातील पद्मावती देवी मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यासाठी घेऊन जात असत, एका तासात सर्व परिसर अगदी स्वच्छ होऊन जात असे.

       तसेच खरी कमाई साठी एक दिवस शाळेतच गाईडच्या सर्व मुली आणि आमच्या बाई बटाटे वडे बनवायचो आणि दुपारच्या सुट्टीत स्टॉल लावला जायचा, अर्थात हेड्सरांच्या परवानगीने. आम्हा मुलींना कामं वाटून दिली जायची आणि स्टॉल लावणार असल्याची सूचना आदल्या दिवशी सर्व वर्गांमध्ये दिली जायची. त्यामुळे दुपारच्या सुट्टीत स्टॉल लावला कि अर्ध्या तासात सर्व वडे संपून जायचे.वडे विकल्यावर जमा झालेली खरी कमाई पाहून खूप आनंद व्हायचा.

        अशी ही माझी शाळा जीने मला माझ्याही नकळत मला खूप काही दिलं. आज तिच्याविषयी वाटणारी कृतज्ञता शब्दातून व्यक्त झाली. 

• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

•  Suchita's Recipe या FB पेजला भेट द्या.. आवडल्यास Like करा... फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 

© सौ. सुचिता मिलिंद वाडेकर (टपळे)...✍️


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या