Letter to God : प्रभूस पत्र...

'प्रभूस पत्र...'

© सौ. सुचिता वाडेकर... ✍










प्रिय प्रभू,
साष्टांग दंडवत ! 🙏

खूप दिवसांपासून मनात होते तुला पत्र लिहायचे... आज तो योग आला. लहानपणापासून जसं मला कळायला लागलं तसं मी तुला वेगवेगळ्या मूर्तींमध्ये पाहिलं...

राम असो, कृष्ण असो, गणपती असो, महादेव असो, विठू माऊली असो, साई असो किंवा स्वामी समर्थ असो. संकट समयी तुझा धावा केला की तू धावून येतोस... म्हणजे लढण्याची शक्ती देतोस... माहीत आहे मला.





मी देखील अनेकदा हा अनुभव घेतलाय याचा. बऱ्याचदा ऐकलंय... जशी श्रद्धा तशी अनुभूती आणि हे खरं देखील आहे बरं ! जो तुझं अस्तित्व मानतो अशा प्रत्येकाला तू कोणत्या ना कोणत्या रूपाने भेटतोस... प्रत्येकाच्या मनात तू आहेस, फक्त तुझी रूपे वेगवेगळी आहेत. जसे की झाडाचं खोड,मूळ एकच असते मात्र त्याला फांद्या अनेक असतात.




तुला एक मनापासून विचारावसं वाटतं...

मनात अनेकदा विचार येतो की हि जन्म-मृत्यूची साखळी तू का बरं बनवली असशील? हि प्रथ्वी, हे ग्रह तारे, हे अंतरिक्ष, पृथ्वी वरील जीवसृष्टी, वेगवेगळे अगणित प्राणी, कीटके, त्यांच्या प्रजाती आणि मुख्य म्हणजे मनुष्यप्राणी का बरं बनवला असशील?

या मनुष्यप्राण्याला तू बुद्धी दिलीस.. ज्याच्या जोरावर त्याने आजवर एवढी प्रगती केलीय, विज्ञानाचे चमत्कार केलेत.

वाचा दिलीस.. चांगले बोलण्यासाठी.. ज्याने फक्त मनुष्यप्राणीच बोलू शकतो. त्याद्वारे आपल्या भावना, विचार व्यक्त करू शकतो.





मन आणि भावना दिल्यास.. ज्यात तू सुख, शांती, आनंद, प्रेम, शक्ती, पवित्रता आणि ज्ञान हे सात गुणही दिलेस..

दृष्टी दिलीस हे सुंदर जग पाहण्यासाठी... कान दिलेस चांगल्या गोष्टी श्रवण करण्यासाठी...

हात-पाय दिलेस काम करण्यासाठी...आणि सोबत वीतभर पोटही दिलेस हव्यासासाठी.

पण या हव्यासापोटी या साऱ्याचा(सात गुण) हळूहळू ऱ्हास होऊन त्याची जागा राग, लोभ, मंद, मोह, मत्सर, द्वेष, अहंकार यांनी घेतलीय.

खून, चोऱ्या मारामाऱ्या, फसवणूक, भ्रष्टाचार, बलात्कार, आत्महत्या, या सगळ्यांना जणू उत आलाय...

सगळीकडे नुसता भ्रष्टचार बोकाळलाय. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही... परीक्षेत पास व्हायचे असेल... एखादे काँट्रॅक हवे असेल... नोकरी हवी असेल.... साधे ड्रायव्हिंग लायसन काढायचे म्हटले तरी खिसा गरम केल्याशिवाय काम होत नाही. या भ्रष्ट झालेल्या यंत्रणेमुळे लाच देऊन सुटणारा गुन्हेगार राजरोस हिंडताना दिसतोय.. मात्र यात भरडला जातोय तो फक्त सामान्य माणूस... ज्याच्याजवळ लाच देण्यासाठी पैसे नाहीत.

सर्वसामान्य शेतकरी ज्याचे आख्खे कुटुंब त्याच्या शेतीवर अवलंबून आहे... ती शेती कसण्यासाठी आज त्याच्याकडे पैसे नाहीत, पिकवलेल्या त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही.

या शेतकर्यापेक्षा त्याचा माल विकत घेणारे व्यापारी दलाल मात्र बक्कळ पैसे कमावताना दिसतात. कष्ट करून प्रामाणिकपणे शेती करणारा शेतकरी मात्र दुर्लक्षिला जातोय.

स्वतःच्या आणि बायकापोरांच्या पोटाची खळगी भरण्याऐवढेही पैसे आपण कमवू शकत नाही याची लाज वाटून शेतकरी आत्महत्या करू लागलाय... श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत चाललाय. पहातोयस ना तू हे सगळं... मग गप्प का आहेस?

कोवळ्या कळ्यांना उमलण्याआधीच चुरगळले  जातेय आणि हे पाप करणारा बलात्कारी राजरोस हिंडताना दिसतोय... मुलगी आहे म्हणून कोवळ्या अर्भकांना या जगात येण्याआधीच मारले जातेय... पण माणूस हे का विसरतोय की हे जीवन जे तो जगतोय ते एका स्त्रीने त्याला जन्माला घातले आहे म्हणून.

प्रभू, आता हे कुठेतरी थांबायला हवं असं मनापासून वाटतं रे. विचार करशील याचा...

एकीकडे नितीमूल्यांचा ऱ्हास होत असताना दुसरीकडे विज्ञान प्रगतीची कमान उंचावत आहे, विज्ञानाचे चमत्कार अचंबित करत आहेत. 22 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चंद्रयान-2 अवकाशात यशस्वी झेपावले माहीत आहे ना तुला.

मानवाने केलेली हि विज्ञानाची प्रगती तूच तर घडवून आणलीस... तूच त्याची निवड केलीस, तूच त्याला ज्ञान दिलेस, तूच मानवाकडून वेगवेगळे शोध लावून घेतलेस... तूच त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केलीस... का..?... कशासाठी..? हे कोडं नाही कळलं रे कधी.

कधी-कधी वाटतं, 'हि सृष्टी एक रंगमंच आहे आणि आपण आहोत या रंगमंचावरील फक्त प्यादी'. पण मला नाही वाटत की जे वाईट घडते आहे तेही सर्व तू घडवतोस... मग हे सर्व पाहून तू गप्प तरी का बसतोस..? का नाही वेळीच शिक्षा करत..?

हे शरीर नाशवंत आहे... जन्माला आलो तेव्हा बरोबर काही आणले नव्हते आणि जातानाही बरोबर काही घेऊन जाणार नाही हे माहीत असून देखील प्रत्येकाला एवढा हव्यास का आहे..? मी, मला, माझं.. करून-करून भाऊ-भाऊ पक्के वैरी होत चाललेत... असं का?

कधी-कधी वाटतं की नको तो हव्यास, नको ते हेवे-दावे, नको ते कसले पाश, नकोत ती बंधनं... सगळं झुगारून टाकावं आणि बसावं तुझ्या चिंतनात.. शांत आणि निमग्न होऊन जावं... जिथं फक्त तुझंच अस्तित्व असेल.

पण हे काही काळापुरतंच घडतं रे... पुन्हा ये रे माझ्या मागल्या... आहेच... असे का घडते बरे?

प्रभू, तुझी हि लीला अगाध आहे, नसमजणारी आहे. प्रत्येकजण जन्माला येतो ते त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार... म्हणून संत महात्मे(ज्यांना तुझं अस्तित्व जाणवलंय) सांगतात की चांगले कर्म करा.

प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना या त्याच्या पूर्व कर्मावर अवलंबून असतात आणि वर्तमानातील कर्मावर त्याचे पुढील जीवन अवलंबून असते.

प्रत्येकाचा हा जमाखर्च एवढा चोख कसा काय ठेवू शकतोस तू..? कसं जमतं रे तुला?... याचे खूप आश्चर्य वाटते आणि कुतूहलही.

"देवा अंत नको पाहू आता..."
तू खूप ग्रेट आहेस माहित आहे मला आणि म्हणूनच तुला एकदा प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे....

भेटशील मला...?
मी वाट पाहीन... 🙏🙏

तुझी वेडी,
सुचिता 😊


• कसा वाटला ब्लॉग...
• आवडला का... 

• ब्लॉग आवडल्यास कमेंट करा. 
• फॉलो करा. 

धन्यवाद ! 🙏 

©सौ. सुचिता वाडेकर...✍️



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या