लेकीस पत्र..
परवा माझ्या लेकीचा वाढदिवस होता.. आमच्याकडे आमचे सगळे कुटुंबीय एकत्र येऊन वाढदिवस साजरा करतो.. मग तो मुलांचा असो की मोठ्यांचा.. त्यानिमित्ताने एकत्र येणं महत्वाचं असतं. ते आनंदाचे क्षण मनात साठवता येतात आणि कॅमेऱ्यात बद्ध देखील करता येतात. तिने कुमार गटात प्रवेश केला त्यानिमित्त माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एक पत्र लिहिलं. ते पत्र आणि वाढदिवसाची काही क्षणचित्रे खास तुमच्यासाठी...
Letter to God : प्रभूस पत्र...
प्रिय आर्या,
अनेक शुभाशीर्वाद!!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा..!!! 💐💐
बघता बघता तू चौदा वर्षांची झालीस.. ही चौदा वर्ष कशी गेली कळलेच नाही आम्हाला. या चौदा वर्षात अनेक आनंदाचे क्षण तुझ्यामुळे आम्ही एन्जॉय करू शकलो. तू आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेस..
तुला एक सांगू.. ईश्वराने तुझी निर्मिती फक्त आमच्यासाठी केलीय. तुझा जन्म हा केवळ आमच्यासाठी झालाय असं मला नेहमी वाटतं. तूझ्या रूपाने आमच्या आयुष्यात एक परी आली आणि आमच्या आयुष्यातील पोकळी भरून निघाली. तू आमच्या आयुष्यात आलीस आणि कित्येक गोष्टी मला नव्याने समजल्या. एका स्त्रीला आई होण्याने पूर्णत्व येते असे म्हणतात ते पूर्णत्व तू मला दिलेस. आई म्हणजे नक्की काय? कशी असते आई? या माझ्या मनातील प्रश्नांना पूर्णविराम मिळाला.
आम्ही कधी तुझ्यावर चिडलो, रागावलो तरी ते तुझ्या काळजीपोटीच असते कारण तू उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं आम्हाला पाहायचं आहे.
तुला एक गोष्ट माहितीये.. तू दहा वर्षांची होतीस तोपर्यंत तुझ्या विश्वात माझं स्थान अगदी वरचं होतं. आई फक्त तुझीच असावी, तिच्यावर फक्त तुझाच हक्क आहे हे तुझ्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून ते नेहमी व्यक्त व्हायचं तेव्हा मी नेहमी सुखावून जायचे. जीवनातील सर्व सुख माझ्या पायाशी आहे असंच वाटायचं पण काळ कधी एकसारखा रहात नसतो.. तो सतत बदलत असतो. तसा तो बदललाही आणि तू कुमार गटात प्रवेश केला.
तुझं विश्व हळू हळू मोठं होऊ लागलं.. त्याच्या कक्षा रुंदवल्या.. मित्रमैत्रीणी, शाळा यांच्यासोबत तुझं नातं घट्ट होऊ लागलं. यात मी कुठेतरी हळूहळू मागे पडू लागले.. या गोष्टीचा सुरुवातीला मला खुप त्रास झाला.. माझं पिलू माझ्यापासून खुप दूर चाललंय हे पचवायला मला थोडा वेळ लागला पण काही काळाने यातून मी सावरले. तुझ्या वयाचा विचार करता तू बरोबर आहेस हे पटले आणि मी तुझी मैत्रीण होण्याचा प्रयत्न करू लागले.. बघुयात अजूनही तो प्रयत्न चालू आहे. तुझी मैत्रीण होता आले तर मी स्वतःला खुप भाग्यवान समजेन.
पक्षी देखील आपल्या पिलांना पंखात बळ येईपर्यंत साथ देतात.. एकदा का पिलाला स्वतःचे स्वतः उडता येऊ लागले की तेही निश्चिन्त होतात. माणसाचेही तसेच आहे. मुले मोठी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहीपर्यंत आई बाबांना देखील मुलांची काळजी असते. मला खात्री आहे तू देखील एक दिवस उंच भरारी घेशील त्यावेळी आमची मान अभिमानाने उंचावेल. तुला तुझी इकीगाई लवकर मिळो हिच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना! 🙏🏻
आम्ही तुझ्यावर मनापासून खुप प्रेम करतो. तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा..!! 💐💐
विजयी भवं..! यशस्वी भवं..!! सफलतामूर्त भवं..!!!
आमचे आशीर्वाद, आमचं प्रेम आणि आम्ही सदैव तूझ्या पाठीशी आहोत.
Love u बेटा.. 😘😘
तुझी आणि फक्त तुझीच,
आई ❤
@सौ. सुचिता वाडेकर.. ✍🏻️
21. 04. 2023
0 टिप्पण्या