Slum Area : आणि झोपडपट्टी बोलू लागली (झोपडपट्टीचे मनोगत)

 

Slum Area : Photo from Google




Slum Area : आणि झोपडपट्टी बोलू लागली…

झोपडपट्टीचे मनोगत


©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️


काही दिवसंपूर्वीची गोष्ट..


मी माहेरी गेले होते त्यावेळी माझी भाची(मीरा) मला म्हणाली, "आत्या, तू झोपडपट्टी बघितलीस?"...


"का गं.. असं का विचारतेस?" मी.


त्यावर मीरा म्हणाली," आम्हाला झोपडपट्टीवर लिहून आणायला सांगितलंय, पण मला कळतच नाही की मी काय लिहू?"


"मी झोपडपट्टी बघितलीच नाही.. मग काय लिहू मला कळत नाहीये". मीरा.


खरे तर झोपडपट्टी कशी असते हे मीदेखील प्रत्यक्ष बघितलेले नव्हते पण दूरदर्शन वरील बातम्यांमध्ये, सिनेमा मध्ये तसेच मुंबईला जाताना तिचे ओझरते दर्शन मात्र झाले होते.


डोंगरमाथ्यावर दिसणारी पत्र्याची छोटी-छोटी दाट घरे बस मधून ट्रेन मधून जाताना पाहिली होती... त्यावेळी तेथील बकालपणा, अस्वच्छता पाहून खूप किळस वाटली होती... आणि कसे रहात असतील हि लोकं इथे..? असा प्रश्नही पडला होता... एवढाच काय तो झोपडपट्टीशी संबंध.


त्या रात्री स्वप्नात चक्क झोपडपट्टी आली आणि माझ्याशी बोलू लागली. सुरुवातीला मी घाबरले पण नंतर विचार केला की ती काय म्हणतेय ते तर ऐकुयात…


आणि झोपडपट्टी माझ्याशी बोलू लागली.


"काय गं, घाबरलीस मला पाहून." ती.


मी नुसती मान हलवली.


"सहाजिकच आहे, तू लाडकोडात वाढलेली, फ्लॅटमध्ये राहिलेली, गरिबी काय असते तुला नाही कळणार; पण मी ते जीवन रोज बघतेय, अनुभवतेय."


"आज दुपारी तू नाक मुरडलेलं पाहिलं आणि तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून आलेय." ती म्हणाली. 


"बोल की मग, ऐकतेय मी." मी.


माझे उत्तर ऐकून ती सुखावली आणि बोलू लागली.


"तुला काय सांगू.. खेड्यापाड्यातून, छोट्या-छोट्या गावातून लोकं पोटापाण्यासाठी शहरात येतात, कामधंदा शोधतात आणि इथे शहरातच राहतात. दिवसभर कष्ट करून रात्रीच्या विसाव्यासाठी घर शोधतात. पैशाअभावी मोठमोठया बिल्डिंगीमध्ये ते राहू शकत नाहीत मग ते माझ्यासारख्या झोपडपट्टीचा आश्रय घेतात. कमी पैशात त्यांना इथे भाड्याने खोली मिळते आणि कालांतराने ते इथेच स्थायिक होतात. इथे विविध राज्यातून आलेले लोक राहतात." ती म्हणाली.


"पण मग इथे केवढी अस्वच्छता असते, त्याचा या लोकांना त्रास नाही का होत?" मी.


"होतो ना…!  खूप होतो. पत्र्याची एवढीशी ती खोली, तोच हॉल, तेच किचन आणि आणि बेडरूमही तीच खोली. घराबाहेर आडोसा केलेले बाथरूम आणि सार्वजनीक टॉयलेट हाच काय तो त्यांचा संसार.


इथे सांडपाण्याची सोय नीट नसते, त्यामुळे सर्वत्र नुसती दुर्गंधी पसरलेली असते. दिवसभराच्या कामाचा शीण घालवण्यासाठी हि लोकं मग व्यसनांना जवळ करतात; त्यामुळे अनेक प्रकारचे रोग या लोकांना झालेले आढळतात."


"पोटासाठी छोटी छोटी मुलेही काम-धंदा करतात; त्यामुळे शिक्षण नाही. गुंडगीरी अन मारामारी तर रोजची चालू असते. 

यांचं हे रोजचं जीवन पाहून खूप वेदना होतात गं मनाला... पण काय करू, सगळं पाहून देखील गप्प बसण्याखेरीज मी काहीही करू शकत नाही."


"मी आवाज उठवला तर अनेक संसार उघड्यावर पडतील, अनेकांचे पोटापाण्याचे काम जाईल. खरं सांगायचं झालं तर या शहराची आर्थिक व्यवस्थाच कोलमडेल."


"ती कशी काय बरं...!" मी.


"आता बघ हं... हि लोकं काम करतात म्हणून कंपन्या, मार्केट, विविध बाजार यांची उलाढाल होतेय. या कष्टकरी लोकांमुळे तर अनेक उद्योगधंदे चालू आहेत; तसेच शहराची, राज्याची पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था तग धरून आहे."


"आज विविध शहरात अनेक झोपडपट्ट्या दिसतात. या झोपडपट्ट्या नसत्या तर काम करणारा कामगार वर्ग कुठे राहिला असता, त्याला गावी परत जावं लागलं असतं. मग तुमच्या सारख्या उच्चभ्रू लोकांना काम करण्यासाठी माणसे कुठून मिळाली असती?"


"जसे की ड्रेनेज साफ करणे, रस्ते सफाई, नाले सफाई, कामवाली बाई, कामगार वर्ग, मालवाहतूक करणारे, भाजीवाले असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्यावर उच्चभ्रू लोकांचे जीवन अवलंबून आहे."


"आज हि लोकं कष्ट करतात म्हणून उच्भ्रू लोकं ताठ मानेने जगतात."


"पटतंय का तुला माझं म्हणणं..." ती.


तिच्या या बोलण्यावर मी अवाक झाले होते.


ती जे सांगत होती ते मला देखील पटत होतं. झोपडपट्टी आहे म्हणून हि लोकं राहू शकतात, पण झोपडपट्टीच नसती तर हि लोकंही नसती, मग प्रत्येकाला आपापली कामं स्वतःची स्वतःच करावी लागली असती.


"हो गं, पटतंय मला, पण तरी सुद्धा त्यांच्या शैक्षणिक समस्या, आरोग्य विषयक समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत असे मनापासून वाटते." 


"यासाठी शासनदेखील 'झोपडपट्टी पुनर्वसन योजना' राबवत आहे." मी.


ती मनापासून हसली आणि म्हणाली, "चल, निघते मी आता... पहाट व्हायची वेळ झाली, सगळे उठायच्या आत मला गेलं पाहिजे" असे म्हणून ती अदृश्य झाली.


मी मात्र थक्क झाले. मन, भावना, विचार करण्याची क्षमता आणि ते विचार बोलून व्यक्त करण्यासाठी वाचा देवाने फक्त मानवालाच दिली.


पण अशा निर्जीव वस्तूंमध्ये जान आली आणि ती बोलू लागली तर...? कसे असतील तिचे विचार..? काय काय दुःख ती पहात असेल..? याची कल्पना येते.


मौनसंवाद..! तुम्ही कधी निर्जीव वस्तूंशी संवाद साधला आहे का..? 


नाण्याची दुसरी बाजू जशी आपणाला दिसत नाही तसे प्रत्येक घटनेलादेखील दुसरी बाजू असतेच की... मात्र ती प्रत्येकाला पाहता यायला हवी.


मुलांनो तुम्ही देखील अशाच एखाद्या निर्जीव वस्तूशी कधी संवाद साधलात का..?


नसेल तर जरूर साधा आणि बघा त्याचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला देखील कळेल. फोन, टीव्ही, मोबाईल, टेबल, खिडकी, लोप पावलेली वाडा संस्कृती, अगदी तुमचा आवडता पेन, वहीशी किंवा जुन्या दफ्तराशी जे तुम्ही वापरत नाही.. अशांबरोबर संवाद साधा. बघा तुम्हाला काय उत्तर मिळते.


• कराल ना प्रयत्न..?


• आणि झोपडपट्टीचे मनोगत तुम्हाला कसे वाटले हे सांगायला विसरू नका बरं..!


• मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतेय.



● लेख आवडला तर जरूर शेअर करा.. अर्थात माझ्या नावासहित..!


• साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या