Marathi Recipe : Masala Bhendi मसाला भेंडी तुम्ही कधी सोलर कुकर मध्ये बनवलीत का..?

 मसाला भेंडी

© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️





       पूर्वी आमच्याकडे सोलर कुकर होता, त्यात अल्युमिनियमचे काळ्या कलरचे चार चपटे डबे होते, दोन लहान दोन मोठे. या सोलरकुकर मध्ये आम्ही वरण-भात, भरलं वांगं, भरली मसाला भेंडी, भरली ढोबळी मिरची, भरला दोडका या भाज्या आवर्जून करायचो, तसेच शेंगदाणे भाजणे, रवा भाजणे, लाडूसाठी बेसन भाजणे आदी वरण भातासोबत इतर दोन डब्ब्यात ठेऊन द्यायचो.



सकाळी नऊ वाजता कुकर उन्हात ठेऊन द्यायचो दुपारी साडेबाराला जेवण तयार व्हायचे. या प्रिहिट झालेल्या कुकर मध्ये दुपारी एक वाजता केकचे बॅटर ठेऊन दिले की संध्याकाळी पाच वाजता सुंदर केक तयार व्हायचा. यात केलेला वरण-भात अतिशय सुंदर लागायचा आणि भाज्याही कमी तेलात चवदार व्हायच्या. त्यावेळी मसाला भेंडी करताना प्रत्येक भेंडीत मसाला भरून भेंडी करायचो.



       भेंडीत मसाला भरण्याचे काम बऱ्याचदा सासूबाई करायच्या. त्या खूप हुशार होत्या. न रागावता, गोड बोलून काम करून घ्यायच्या. एक-दोनदा त्यांनी भेंडी भरली, तिसऱ्या वेळी त्या म्हणाल्या, "ते काम राहू दे, नंतर कर. इकडे ये आधी, तुला भेंडी भरायला शिकवते". "इकडे बघ, अशी भरायची भेंडी, भर पाहू''. मग काय नवीनच होते, आमची स्वारी भेंडी भरायला बसली, नाही म्हणायची हिम्मतच नव्हती. मात्र अगदी गोडबोलून का होईना पण त्यांनी मला सगळं शिकवलं आणि माझीही जे आपल्याला येत नाही ते शिकण्याची तयारी असायची त्यामुळे जमलं.



       आज खूप वर्षांनी प्रत्येक भेंडीत मसाला भरून भेंडी बनवली. शिवाय आज रेसिपीसाठी वापरलेली भांडी देखील without oil cookware असल्यामुळे सोलर कुकरमध्ये केलेल्या भेंडीचा फील आला. भेंडीच्या मसाल्यात एक पळी तेल वापरले आणि भांडयाला तेलाचे ग्रिसिंग करून पाण्याचा हबका मारून नुसत्या वाफेवर भेंडी बनवली. तुम्ही थोड्याशा तेलावर फ्राय पॅन अथवा कढईतही मसाला भेंडी बनवू शकता. 


Marathi Recipe - Pav bhaji "पावभाजी" बिनाकांद्याची तुम्ही केलीत का कधी..? 

मसाला भेंडी..

साहित्य :


● भेंडी पाव किलो

● पाव चमचा हिंग

● पाव चमचा हळद

● लसूण 3 ते 4 पाकळ्या

● ओला नारळ अथवा डेसिकेटेड कोकोनट 

● दाण्याचा कूट अर्धी वाटी

● लाल तिखट 1 चमचा

● मीठ आवश्यकतेनुसार

● कोथिंबीर

● तेल 2 चमचे




मसाला भेंडी 



कृती :


प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन उभी चिरून घ्यावी लसूण बारीक ठेचून घ्यावा. एका प्लेटमध्ये हिंग, हळद, लसूण, ओला नारळ अथवा डेसिकेटेड कोकोनट, दाण्याचा कूट, तिखट,मीठ आणि कोथिंबीर घेऊन त्यात 2 चमचे तेल घालावे आणि सारण एकजीव करावे. हे तयार सारण प्रत्येक भेंडीत भरावे आणि फ्राय पॅन अथवा कढईत थोडे तेल घालून त्यामध्ये भरलेली भेंडी ठेवून वाफ आणावी. भेंडी खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. आपली भरली मसाला भेंडी तैयार !


पोळी, पालक पनीर आणि मसाला भेंडी.. ⤵️




Evening Breakfast : गरमा गरम 'बटाटे वडा' आणि गरमागरम 'वडापाव'


• रेसिपी आवडली का..


•मग तुम्हीही बनवणार नां..


•बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.


•रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा पण नावासहित कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे. 


धन्यवाद! 🙏🏻

© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या