उन्हाळ्याची सुट्टी…
#आठवण
पूर्वी म्हणजे आपल्या लहानपणी उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की खूप धम्माल मस्ती असायची. हि सुट्टी कधी संपूच नये असे वाटायचे. आत्या, आत्ते भावंड चुलत भावंड घरी यायची... घर नुसतं गजबजून जायचं. ऊस... चिंचा... बोरं... कैऱ्या... आंबे... नुसती धमाल असायची.
भांडी-कुंडी... कॅरम... पत्ते (पाच, तीन, दोन, बदाम सात, मेंडीकोट, गुलामचोर).... सापशिडी.... व्यापार... काचा कवड्या... लपाछपी हे दुपारच्या वेळात आजूबाजूच्या मित्र मैत्रिणी सोबत घरात बसून खेळलेले खेळ... गुरुनाथ नाईकांची (डिटेक्टिव्ह) वाचलेली पुस्तके जी काकांनी आणलेली असायची. आते भावंडांसोबत केलेलं दुपारचं, रात्रीचं जेवण.... त्याकाळी टीव्ही फारसा कोणाकडे नव्हताच आणि असला तरी दूरदर्शनचे कार्यक्रम लागायचे ते हि ठराविक वेळी.
या सुट्यांमध्ये आत्या, आई, आजी यांची उन्हाळकामांसाठी चाललेली धांदल... पापड... कुरडई... हाताने लाकडाच्या पाटीवर बनवलेल्या शेवया... आजीने केलेल्या तांदळाच्या सलपापड्या… बटाट्याचे वेफर्स... बटाट्याचा किस... सांडगे इत्यादी.
अशा अनेक उन्हाळकामात आम्हा मुलांनी आई, आजी, आत्याला केलेली मदत... या मदतीचे बक्षीस म्हणून मग रोज संध्याकाळी वेगवेगळ्या पदार्थांचे बनवलेल्या भोजनाची मेजवानी... कधी आत्याने बनवलेले डोसे आणि बटाट्याची भाजी... तर कधी आजीनं बनवलेला आमरस, सोबत तळलेले पापड, कुरडई.
आत्याच्या हातच्या गरम गरम पोळ्या खाण्यासाठी तर चढाओढ लागायची.... तर कधी आईने बनवलेला बटाटे वडा सांबर(आमटी)... तर एकदिवस दुधातील शेवया मिळायच्या.
Marathi Recipe : Sabudana Khichadi : खिचडीसाठी साबुदाणा भिजवण्याची एक सोपी पद्धत
दुपारच्या वेळात हळद मीठ लावून खाल्लेली कैरी... जांभळं... करवंद... आणि टिंग टिंग... वाजत येणारी कुल्फीची गाडी ज्याची रोज ठराविक वेळी अगदी आतुरतेने पाहिलेली वाट… आणि 1रु. तासाने भाड्याने चालवायला आणलेली सायकल. हे सारं... सारं आज आपण खूप मिस करतो.
आपण जगलेले हे बालपण या गोड आठवणींच्या रुपात आपल्यासोबत आहे पण आपल्या मुलांचे बालपण मात्र कुठेतरी हरवलेय असे वाटते. टीव्ही, मोबाईल, वेगवेगळे क्लासेस, समर कॅम्प यामुळे बालपणाची व्याख्याच बदलून गेलीय.
आज चार मुलं एकत्र दिसली तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि या मोबाईल मध्ये हि पिढी एवढी गुरफटलेली दिसते की टेबलावरून सुई जरी पडली तरी त्याचाही आवाज ऐकू येईल एवढी भयाण शांतता पहायला मिळते. असो.
काळ बदललाय तसं जगही बदललय मग आपण का मागे रहायचं... आपण ही आपला दृष्टिकोन बदलूयात आणि या नव्या पिढीला त्यांच्यासाठी जे उत्तम आहे ते देण्याचा प्रयत्न करूयात... जी काळाची गरज आहे.
B+ve…! माझ्या मुलीचा ब्लड ग्रुप आहे. 😄
◆ Evening Breakfast
● बटाटे वडा
◆ रेसिपी
● बटाटेवड्यांची भाजी...
साहित्य:
• उकडलेले बटाटे
• हिंग
• हळद
• कडीपत्ता
• हिरवं वाटण(हिरवी मिरची+आलं+ लसूण+जिरे)
• कोथिंबीर,
• मीठ आवश्यकतेनुसार
• तेल
कृती :
उकडलेले बटाटे फोडी न करता हाताने स्मॅश करून घ्यावेत. गॅसवर कढईत थोड्या तेलात हिंग, हळद, कढीपत्ता आणि हिरवं वाटण घालून परतून घ्यावे नंतर यात कुस्करलेला बटाटा, मीठ आणि कोथिंबीर घालावी आणि चांगले हलवून एक वाफ द्यावी. आपली बटाटे वड्यांची भाजी तैयार !
● वड्यांसाठीचे बॅटर…
साहित्य:
• बेसन पीठ
• हिंग
• हळद
• मीठ
• खाण्याचा सोडा
• पाणी
कृती:
बेसनपिठात हिंग, हळद, मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून दाटसर बॅटर तयार करून घ्यावे.
● बटाटे वडे…
कृती:
तयार केलेल्या बटाट्याच्या भाजीचे चपटे किंवा गोल गोळे बनवावेत आणि तयार केलेल्या बेसनपीठाच्या बॅटर मध्ये बुडवून गरम तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. आपले बटाटे वडे तैयार !
तयार झालेले बटाटे वडे तुम्ही सांबर सोबत सर्व्ह करा - "बटाटेवडा सांबर"
आणि पावा सोबत सर्व्ह करा - गरमागरम "वडापाव"
• सोबत तळलेली मिरची द्यायला विसरू नका.. 😊
• कशी वाटली रेसिपी..
• आवडली का..
• तुम्हीही try करा..
• रेसिपी आवडल्यास फॉलो करा, कमेंट करा.
• तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्वाची आहे.
धन्यवाद! 🙏🏻
© सौ. सुचिता वाडेकर…✍🏻️
0 टिप्पण्या