Marathi Recipe : "नाचणी लाडू" आरोग्यदायी नाचणीचे पोषक लाडू. वाचा नाचणीच्या सेवनाचे अनेक फायदे

 #नाचणी_लाडू

"आरोग्यदायी नाचणीचे पोषक लाडू"


Marathi Recipe : "नाचणी लाडू"

नाचणी हे तृण धान्य असून पचायला खूप हलके आहे, त्यामुळे आजारी व्यक्तींना शरीराची झीज भरून काढण्यासाठी आहारात नाचणीचा वापर केला जातो. कॅल्शिअमचा सर्वात जास्त स्रोत नाचणीमध्ये असतो हे आपल्यापैकी बऱ्याचजनांना ठाऊक आहे.


नाचणीच्या सेवानाचे फायदे ⤵️

नाचणी पित्तशामक, थंड, तृप्तीकारक आहे.. त्यामुळे हे लाडू उन्हाळ्यात केल्यास शरीराला थंडवा मिळण्यास मदत होते. कंबर खूप दुखत असेल तर नाचणीची पेज घ्यावी. नाचणी मध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असल्यामुळे नाचणीच्या सेवनाने खुबा, पाठीचा कणा, मनगट यांचं फ्रॅक्चरचे प्रमाण कमी होते.


मुलांना सुद्धा पुरेशा प्रमाणात कॅल्शिअमचा पुरवठा होणं आवश्यक असतं. कॅल्शिअममुळे हाडे आणि मसल्स strong बनतात. ज्यांच्या आहारात कॅल्शिअम भरपूर असते त्यांना मुतखड्याचा धोका कमी प्रमाणात होतो असे आधुनिक शोधकार्यात आढळून आले आहे.


मानवी शरीरात कॅल्शिअम हे हाडांमध्ये असते. जेव्हा शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा कमी पडतो त्यावेळी शरीर हाडांमधील कॅल्शिअम वापरण्यास सुरुवात करते अशावेळी ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. त्यामुळे रोजच्या आहारातून कॅल्शिअमचे सेवन होणे गरजेचे असते आणि यासाठी नाचणी हा उत्तम पर्याय आहे कारण नाचणी मध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असते.


हाडांचा अशक्तपणा, हाडं ठिसूळ होणं, हाडं खिळखिळी होणं हे आजार आजकाल दर दहा जणांपैकी एकामध्ये आढळतात. इतके हे आजार सर्वसामान्य होत आहेत. जीवनशैलीचं बदलतं स्वरूप या आजारांचं प्रमुख कारण आहे. हाडांचे आजार असणाऱ्यांना आहारात ‘नाचणी’ शिवाय दुसरा पर्याय नाही. 


नाचणीत कॅल्शियमबरोबरीने तंतुमय पदार्थाचं (फायबर) प्रमाण सर्वात जास्त असते. नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील शर्करेचं प्रमाण संतुलित राहतं. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने नाचणीसारखा दुसरा पुरक आहार नाही.. म्हणूनच लहान मुलांना नाचणी सत्व दिले जाते.


नाचणीत असणा-या कॅल्शियमच्या विपुल साठयामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे तसेच वाढती मुलं यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ देतात. या नाचणीचे सेवन वेगवेगळ्या प्रकारे करता येते जसे की... नाचणी सत्व, नाचणी भाकरी, नाचणीचे आंबील, नाचणी लाडू... इ.


हे नाचणी लाडू करायला एकदम सोपे आहेत  आणि लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वांच्या आवडीची रेसिपी. रोज एक जरी नाचणी लाडू प्रत्येकाने खाल्ला तरी शरीराची रोजची कॅल्शिअमची गरज भागू शकेल यात शंका नाही.


सोबतीला तूप आणि ड्रायफ्रूट वापरल्यामुळे या लाडूचे पौष्टिकतेचे प्रमाण आणखीनच वाढते. तर असा हा आरोग्यदायी पोषक नाचणी लाडू घरातील प्रत्येकाने रोज एक तरी नक्की खावा. 


"आरोग्यदायी नाचणीचे पोषक लाडू"



◆ साहित्य :


• नाचणी पीठ 2 वाटी


• पिठीसाखर 1 वाटी


• तूप 1 वाटी


• वेलची पावडर 1 चमचा


• ड्रयफ्रुट पावडर अर्धी वाटी



◆ कृती :


१. नाचणी पीठ तूप घालून खमंग भाजून घ्यावे. 


२. पीठ भाजत आले की डायफ्रुट पावडर व वेलची पावडर घालावी आणि गॅस बंद करावा. 


३. थोडे कोमट झाल्यावर यात पिठिसाखर घालावी व चांगले मिक्स करावे. 


४. आता तयार झालेल्या मिश्रणाचे लाडू वळावेत. 


५. आपले आरोग्यदायी पोषक नाचणी लाडू.... तैयार!



• कशी वाटली रेसिपी..

• आवडली का..


• मग तुम्ही बनवा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.


• आणि हो रेसिपी आवडल्यास जरूर शेअर करा.. पण माझ्या नावासहित.

• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या