Marathi Recipe : मिक्स_व्हेजी_सूप मुलांनी सगळ्या भाज्या खाव्यात असं वाटतं ना..! मग नोट करा ही रेसिपी मुले ही पितील अगदी आवडीने.

 #मिक्स_व्हेजी_सूप


मिक्स व्हेजी सूप


मुलांनी सगळ्या भाज्या खाव्यात असं सगळ्या आईंना वाटत असतं आणि त्यासाठी ती रोज काही ना काही क्लूप्ती करत असते. यातूनच तयार झाले 'मिक्स व्हेजी सूप'.


हे सूप खुप टेस्टी आणि मस्त लागते. होतेही पटकन.. रोज कुकर लावताना एका डब्यात घरी ज्या भाज्या असतील त्या बारीक फोडी करून घातल्या की जेवणात मस्तपैकी सूप आपण बनवू शकतो; यासाठी वेगळी मेहनत लागत नाही.


लाल भोपळा, दुधी भोपळा, या भाज्या मुलांना आवडत नाहीत त्यामुळे अशा भाज्या सूप करताना वापरल्या की मुलांच्या पोटात जातात. मुलांना कळतदेखील नाही आणि आपल्यालाही एक वेगळं समाधान मिळतं.


कधी त्यामध्ये गाजर, कधी टोमॅटो तर कधी बीट घालायचे यामुळे सुपला छान कलर येतो आणि सूप थीक देखील होते. सूप तयार होत असताना अर्धी वाटी कॉन घातलेत तर मुले एकदम खुश होतील. मी सूप मध्ये कॉन घालते त्यामुळे एरवी भाजीसाठी नकारघंटा वाजवणारी माझी मुलगी सूप मात्र रोज आवडीने पिते.


तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या भाज्या वापरून सूप बनवून बघा सुपच्या चावीतील फरक तुमच्यादेखील लक्षात येईल. हे सूप एक वर्षाच्या बाळाला देखील तुम्ही अगदी आरामात देऊ शकता. मुलांसाठी करणार असाल त्यावेळी भाज्या शिजवताना त्यात एक बटाटाही घाला म्हणजे त्यांच्यासाठी हे सूप म्हणजे पोटभरीचा एक उत्तम पर्याय होईल.


मात्र घरातील मोठ्यांना कोणाला डायबेटीस असेल तर त्यांच्या सूप मध्ये बटाटा, कॉन कधीतरी वापरा कारण बटाटा, कॉन यात साखरेचे प्रमाण मुळातच जास्त असते. चला तर मग पाहुयात याची साहित्य आणि कृती.



• मिक्स व्हेजी सूप साठी लागणारं साहित्य ⤵️


• गाजर 1

• बीट अर्धे

• फ्लॉवर अर्धी वाटी

• लाल भोपळा अर्धी वाटी

• दुधी भोपळा अर्धी वाटी

• टोमॅटो 1







• मिक्स व्हेजी सूप बनवण्याची कृती ⤵️


1. प्रथम गाजर, बीट, दुधी भोपळा, लाल भोपळा यांची सालं काढावीत आणि त्यांचे बारीक तुकडे करावेत.


2. फ्लॉवर स्वछ धुवून बारीक चिरून घ्यावा. टोमॅटो अर्धा कापून त्यातील बी काढून टाकावे.


3. या सर्व भाज्या कुकरच्या डब्यात घालून त्या बुडतील इतपत पाणी घालावे व एक शिट्टी घ्यावी.


4. कुकरची वाफ गेल्यावर टोमॅटोची साल काढावी व सर्व भाज्या मिक्सरच्या भांड्यात एकजीव करून घ्याव्यात.


5. तयार झालेली पेस्ट एका पातेल्यात काढून घ्यावी. आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालून दाटसर करून घ्यावे.


6. पातेले गॅस वर ठेवून त्यात मीठ व मिरपूड घालावी, आवडत असतील तर कॉर्न घालावेत


7. एक उकळी आली की गॅस बंद करून गरमागरम व्हेजी सूप सर्व्ह करावे.







• कशी वाटली रेसिपी..

• आवडली का..


• मग तुम्ही बनवा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.


• आणि हो रेसिपी आवडल्यास जरूर शेअर करा.. पण माझ्या नावासहित.


• कारण साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.


धन्यवाद! 🙏🏻

©सौ. सुचिता वाडेकर..✍🏻️










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या